वाचनालये-संस्कृतीचे प्रतिक

चला, मराठीला, महाराष्ट्राला अजून एक ज्ञानपीठ नेमाडेंच्या रुपाने मिळाले-बऱ्याच वर्षांनी का होईना ते मिळाले शेवटी. त्यात परत मराठी साहित्य संमेलन येवू घातले आहे, तेही लांब पंजाबात घुमान येथे. त्यानिमित्ताने मराठी भाषा, लेखक, वाचक, एकूणच वाचन संस्कृती यावर चर्चा झडू लागली आहे. म्हणजे एकूणच साहित्याच्या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

या निमित्ताने पण आपण खरेच जर आत्मपरीक्षण केले आणि एकूणच पुस्तके तर वाचन, वाचन संस्कृती याबद्दल समाजात, सरकार मध्ये किती उदासीनता हे दिसून येईल. कुठलाही समाज जर प्रगतीशील आणि ज्ञानाधीष्टीत आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या समाजात वाचन, पुस्तके याबद्दल अपार प्रेम आणि आपुलकी दिसून येते.

मी काही वर्षापूर्वी अमेरिकेत कामा निमित्ताने गेले होतो आणि काही काळ तेथे वास्तव्य करून होतो. अमेरिका हा पुढारलेला तसेच संपन्न देश. त्यांनी अशी प्रगती साधली याचे प्रमुख कारण पुस्तकांना आणि वाचनाला मिळालेली प्रतिष्ठा. इतर सर्व गोष्टीपेक्षा, तेथे मला दोन गोष्टीचे कौतुक वाटले. प्रत्येक गावात सरकारी सार्वजनिक अशी सुसज्ज आणि मोठाली वाचनालये आहेत. बऱ्याचदा ती मोफत असतात. सदस्य एका वेळेला ५-१० पुस्तके घरी घेवून शकतात. सर्वाना आत मध्ये मुक्त प्रवेश, पुस्तके चाळण्यास, शोधण्यास प्रोत्साहन देतात. तेथील कर्मचारी हवी ती मदत अगदी हसत हसत करतात. वारंवार पुस्तके अगदी कमी किमतीत पुस्तके विकत असतात. सदस्यांकडून पुस्तके दान म्हणून घेतात, त्यातील नको असलेली पुस्तकेही जवळ जवळ मोफत उपलब्ध करून देतात. म्हणजे एकूणच वाचनाला आणि वाचनसंस्कृतीला अगदी पोषक वातावरण. दुसरी गोष्ट जी नजरेत भरली ती पुस्तकाची मोठ मोठाली दुकाने. जी अर्थात आपल्या इथेही आताशा सुरु झाली आहेत, नाही म्हणा.

उलट आपल्या इथे काय परिस्थिती आहे. सार्वजनिक आणि सरकारी वाचनालयात जरा जाऊन पहा. अंधारी, कोंदट अशी खोली. बऱ्याचदा पुस्तकापर्यंत प्रवेश नाही. पुस्तके शोधण्यास अतिशय अवघड अशी पद्धत. तेथील कर्मचारी म्हणजे काही विचारू नका. ज्यांच्या वागण्या आणि बोलण्यामुळे तेथे चुकून माकून जाणारा वाचक परत फिरकूच नये असे वर्तन. एकूणच इतकी अनास्था. कशी काय वाढेल वाचन संस्कृती? पुस्तके सुद्धा कशी-तर धुळीने माखलेली, जीर्ण. कुबट वास येणारी. कसा काय उत्साह ती घेवून वाचायला? ‘लोकप्रभा’ने गेल्या वर्षी महाराष्ट्रातील सरकारी आणि सार्वजनिक वाचनालयावर सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारी एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. कित्येक वाचनालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी तर जुगाराचे आणि पत्ते खेळण्याचे अड्डे तयार झाले आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील आणि पुरोगामी राज्याची. तर बाकीच्या ठिकाणी तर विचारायलाच नको.

पुस्तके लोकांपर्यत सहजपणे गेली पाहिजेत. तरच ती वाचली जाणार आहेत. सरकारी वाचनालयांना या बाबतीत अगदी मुळापासून काम करायला हवे आहे तरच परिस्थितीत सुधारणा होवू शकेल. नाही म्हणायला काही खाजगी वाचनालये अशी आहेत जे खरोखरचं चांगले काम करीत आहे-पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. आपण कायम पाश्चिमात्य देशांच्या नावाने त्याचं संस्कृतीच्या नावाने ओरड करत असतो, किंवा आपला समाज हा त्यांचे कित्येक बाबतीत अनुकरण करतो असे कायम बघत असतो. पण पुस्तके आणि एकूण वाचनसंस्कृतीच्या बाबतीत सर्वानी-समाजाने, सरकारने का त्याचे अनुकरण करू नये?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s