Presidential Estates in Delhi

मागील ब्लॉग मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आम्ही या वेळच्या सुट्टीमध्ये दिल्ली आणि इतर ठिकाणी जायचे ठरवले होते. मी यापूर्वी दोनदा दिल्लीला गेलो होतो. पण त्यावेळेस दिल्लीची मेट्रो, नवीन विमानतळ वगैरे गोष्टी झाल्या नव्हत्या. त्यामुळे मीही एकूणच दिल्लीच्या भेटीबद्दल उत्सुक होतो.

कसे जावे, काय काय पहावे, किती दिवस राहावे याचा विचार सुरु झाला. योगायोगाने आम्हाला असे समजले की, माझ्या पत्नीची एक मामे बहिण-मंजिरी दिल्लीत रहाते, आणि ती राष्ट्रपती भवन मध्ये काम करते असे समजले. तिचे राहण्याचे ठिकाण राष्ट्रपती भवनच्या अधिकारी/कर्मचारी वसाहतीमध्ये (Presidential Estates) आहे हे देखील समजले. आम्हाला दिल्लीच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी राहायला मिळणार यामुळे मी खुश झालो होतो.

मे मधील एका कडकडीत उन असलेल्या दुपारी आम्ही दिल्लीच्या विमानतळावर उतरलो. राष्ट्रपती भवन जवळ आम्ही अर्ध्या-पाऊण तासात पोहोचलो. तेथे गेल्यावर आम्हाला उमगले की हा उच्च सुरक्षा असलेले क्षेत्र आहे, त्यामुळे आत जायला आम्हाला बरेच दिव्य करावे लागले. ही वसाहत राष्ट्रपती भवनच्या पिछाडीस आहे. राष्ट्रपती भवन एका बाजूस राष्ट्रीय वनउद्यान आहे. खुद्द राष्ट्रपती भवन हे एका टेकाडावर(Raisina Hills) बांधले गेले आहे. १९११ मध्ये ब्रिटीश सरकारच्या गवर्नरचे निवास स्थान म्हणून ते बांधले गेले. १९१० साली ब्रिटीशांनी आपली राजधानी कोलकत्याहून दिल्लीस आणण्याचे ठरवले. त्यावेळी ब्रिटीश वस्तू-रचनाकार Edwin Landseer Lutyens याने नव्या दिल्लीची तसेच ह्या वस्तूची रचना केली.  आणि ज्या ठिकाणी आता Presidential Estates आहे, ते त्या काळी ब्रिटीश सैन्यासाठी राहण्याचे ठिकाण होते आणि तेथे गोदामे, घोड्यांच्या पागा वगैरे होत्या. आम्ही तेथे ४ दिवस मुक्काम केला. प्रशस्त आंगण, जिकडे तिकडे चीनाराची झाडी, मोठ-मोठाली बैठी घरे होती. भरपूर मोकळी जागा, मोठाले प्रशस्त अंतर्गत रस्ते असलेला परिसर होता.

दुसऱ्या दिवशी मी भल्या पहाटे बाहेर वसाहतीमध्ये फिरण्यास बाहेर पडलो. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती, ढगाळ वातावरण होते. काही मिनिटातच मला मोकळ्या जागीत २-३ मोर बगताना नजरेस पडले. तसेच काही पक्षी बेसूर आवाज करत असलेले दिसले, जे जंगली सातभाई होते असे नंतर कळाले. मोराचे आणि सातभाई पक्ष्यांचे जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न फसला. पुढे जुने पोस्ट ऑफिस दिसले. त्यावर जुने भले थोरले  घड्याळ होते. त्याचे इमारतीचे संवर्धनाचे काम चालू होते. पुढे वाचनालयाची बैठी इमारत दिसली. आमच्या घराच्या बाजूलाच राष्ट्रपती भवन संग्रहालय होते. आणखी पुढे गेल्यानंतर क्लब हाउस दिसले. सर्व बांधकाम लाल दगडांचे होते.

Presidential Estates Quarters

Presidential Estates Quarters

सांस्कृतिक भवन

सांस्कृतिक भवन

संग्रहालय

संग्रहालय

आम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी, अक्षरधाम मंदिराला भेट दिली. येताना मेट्रोने प्रवास केला. दुसऱ्या दिवशी दिल्ली दर्शनची बसने सहल केली. त्यात आम्ही लोटस टेम्पल, लाल किल्ला, कुतुब मिनार, राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेट परिसर, इंदिरा गांधी स्मृती केंद्र, पंडित नेहरूंचे घर, राजघाट वगैरे ठिकाणी गेलो. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आमचा दिल्ली भेटीचा विशेष कार्यक्रम होता ज्याची आम्हाला खूप उत्सुकता होती. राष्ट्रपती भवनची भेट, आणि संग्रहालयाची भेट. दोन्ही ठिकाणी जाण्यास आधी बुकिंग करावे लागते जे मंजिरीने आधीच केले होते. संग्रहालयात वेगवेगळया राष्ट्रपतीना विविध वेळेला मिळालेल्या भेट वस्तू, तसेच संग्रहालय ज्या ठिकाणी आहे(म्हणजे Presidential Estates), तो भाग पूर्वी कसा होता याचे प्रतिरूप तयार केले आहे, ते एका दालनात पाहायला मिळते. आतापर्यंतच्या राष्ट्रपतीचे मेणाचे पुतळे उभारले आहेत. दोन्ही ठिकाणी गाईड आपल्या बरोबर असतो आणि माहिती सांगत असतो. राष्ट्रपती भवनाचा इतिहास, बांधकाम, त्याची रचना याबद्दल बरीच रोचक माहिती मिळते. राष्ट्रपती भवनची You Tube वर एक छान फिल्म मी आदल्या दिवशी पहिली होती. राष्ट्रपती भवन परिसर तर भव्यच आहे. मी आणि आपण सर्वानी तो कित्येक वेळेला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या संचालनाच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळेस पहिले आहे. आतील वेगवेगळी दालने, बांधकाम, तो एकूण थाट वगैरे पाहून थक्क व्हायला होते. मुघल गार्डन, जे मागील बाजूस आहे ते देखील बघितले, पण त्याची रया गेली होती. जानेवारी ते मार्च मध्ये मुघल गार्डन, जे ट्यूलिप्स साठी प्रसिद्ध आहे, ते पाहायला मिळते. संग्रहालय जे Presidential Estates मध्ये आहे, त्यामुळे  सुरेक्षेच्या कारणामुळे, आधी एका गेटवर जाऊन security pass घ्यावा  लागतो आणि त्यानंतर त्यांच्या गाडीत बसवून संग्रहालयात आणले जाते, आणि परत नंतर गेटवर सोडले जाते.

रविवार, जो आमचा दिल्ली मधील शेवटला दिवस होतं, त्यादिवशी संध्याकाळी आम्ही जुन्या दिल्लीत गेलो. चांदणी चौक, जामा मस्जिद परिसर वगैरे हिंडलो. तेथील परिसर खव्वयेगिरीसाठी प्रसिद्ध आहे त्याचा ही थोडाफार अनुभव घेतला. जाता येता मेट्रोने प्रवास करण्याचा आनंद घेतला. रात्री घरी येताना परत इंडिया गेटला तेथील रोषणाई पाहण्याचा कार्यक्रम होता, पण तो रद्द केला. परवाच अशी बातमी वाचली की, चांदणी चौकातील एक जुने असे मिठाईचे दुकान बंद झाले. त्याचे नाव घंटेवाला हलवाई. ते दुकान म्हणे २२५ वर्षाहून अधिक जुने होते. ते पाहण्याचे राहून गेले याची रुखरुख लागून गेली.

राष्ट्रपती भवन परिसरात ४ दिवस राहिल्यामुळे एक वेगळाच अनुभव आम्हाला आमच्या दिल्ली भेटीत मिळाला. तसेच माझी पत्नी आणि तिची मामे बहिण मंजिरी या दोघी एकमेकांना २५-३० वर्षानंतर भेटत होत्या, तोही एक वेगळाच प्रसंग आणि आनंद होता. असे सर्व अनुभव मनात साठवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s