पावसाळा-My Monsoon Memories

मी परवा सकाळी चहाचा कप हातात घेवून बाहेर पडणारा पाऊस न्याहाळत बसलो होतो. ह्या पावसामुळे, माझा ‘मॉर्निंग वॉक’ हुकला होता. मनात सहज पावसाची मी अनुभवलेली वेगवेगळी रूपं डोकावू लागली. मी तसा अनेक पावसाळे पाहिलेला माणूस आहे, त्यामुळे त्याबद्दल लिहूयात असे ठरवले!

मी लहान असताना, आम्ही चाळीत राहायचो. दोन खोल्यांच्या घरांना asbestosचे उतरते पत्रे होते. पाऊस सुरु झाला की, मिरवणुकीत ताशांचा जसा आवाज येतो, तसा ताड ताड आवाज येई. त्या पत्र्यांना पन्हाळी होती. पाऊस सुरु झाला की अख्ख्या चाळीसमोर त्या पन्हाळ्यातून पाण्याच्या धारा लागत. घरासमोर शहाबाद फरश्याचे अंगण होते. त्यावरून पाण्याचा मोठा ओहोळ वाहू लागे. मग आम्ही त्यात कागदाच्या बोटी करून सोडत असू. पहिल्या पावसाची, वळवाच्या पावसाची मजा आणि त्यात भिजत नाचण्याची मजा तर काही औरच. छप्पर गळण्याचा त्रास आम्हला कधी झाल्याचे आठवत नाही, पण भिंतीवर ओल मात्र चढे. गांडूळे दिसू लागत. पावसाळ्यात पवना नदीला पूर येत असे, आणि काठावर असलेले चिंचवडचे मोरया गोसावी मंदिर पुराच्या पाण्यात बुडून जाई. आम्ही सर्व ते पाहायला जात असू. मला आठवते बारावीत असताना पावसात आम्ही लोणावळा-खंडाळा, नागफणी येथे गेलो होतो. तिथला पाऊस आणखीनच वेगळा. कधी उन-पावसाचा खेळ, तर मध्येच धुके, डोंगरावर उतरलेले ढग असा सगळा माहौल असतो तेथे. असा ढगात हरवून जाण्याचा त्यावेळी पहिलाच प्रसंग होता.

पुढे कामाचा भाग म्हणून अमेरिकेत गेलो, तेव्हा तिथला पाऊस देखील अनुभवला. तिथे पाऊस थंडीच्या दिवसात पडतो. सुरुवातीला माझ्याकडे कार नव्हती. चालत/बसने प्रवास करायचो. जोरदार वाहणारे थंड वारे, त्यात हा असा पाऊस. मोठी तारांबळ उडे अश्या वेळेस. ही गोष्ट कॅलिफोर्नियात. तर पूर्वेकडे फिलाडेल्फियासारख्या शहरात पाऊस म्हणजे बर्फाचा पाऊस-भुरभूर होणारी बर्फवृष्टी.

philadelphia

तोही अनुभव वेगळाच. भारतात परत आल्यानंतर मला जेव्हा सह्याद्रीत डोंगर किल्ल्यावर भटकायचा नाद लागला.  पावसाळ्यातील दिवसातले सह्याद्रीतील डोंगरावर, तसेच किल्ल्यावरील सृष्टी सौदर्य, धबधबे, भन्नाट वाहणारा वारा मनसोक्त अनुभवायला मिळाला. तसेच गावा-खेड्यातून, डोंगर-दऱ्यातून राहणारे लोक ह्या वेडावाकडा पडणाऱ्या पावसाचा कसा सामना करतात हे जवळून पाहायला मिळाले. पडणाऱ्या पावसात डोंगरावरील, किल्ल्यांवरील ते काळे कातळ कडे आणखीनच काळेकुट्ट, भीषण दिसू लागतात. मावळात भटकताना भात शेतीच्या खाचरात अंगावर इरले पांघरून काम करणारे शेतकरी दिसतात. समुद्र-किनारी पावसाचे आणखीनच वेगळे स्वरूप असते. लांबवर पडत असलेला पाऊस नजरेस दिसतो. समुद्राला उधाण आलेले असते, जो मी बऱ्याच वेळेला गोव्यात, तसेच कोकणात पहिला आहे.

एकदा आम्ही पावसाळ्यात आंबोली आणि आसपासच्या परिसरात भटकायला गेलो होतो. २-३ दिवस पाऊस सोबत करत होता. तशा पावसात, आंबोलीच्या आसपास असलेल्या जंगलात गेलो होतो. ह्या दिवसात जळवांचा प्रादुर्भाव होतो, आम्हाला देखील जळवांनी हैराण केले होतो-सुरुवातीला त्याचे कौतुक वाटले होते, पण नंतर नंतर त्याचा त्रास होवू लागला होतं. आता पावसाळा देखील पर्यटनाचे स्वरूप परत करू लागला आहे, त्याचा काहीही करून उपभोग घ्यायचा अशी चंगळवादी वृत्ती वाढू लागली आहे. गर्दी, रांगा, बेफान वागणारे पर्यटक, त्यामुळे आजकाल, अशा सगळ्या वातावरणात बाहेर जाण्यापेक्षा मी घरात बसून त्याचा आनंद घेणे पसंद करतो. घरापुढे असलेल्या बागेतील झाडांवर सुगरण पक्षी आपली घरटी बांधताना दिसतात, ते न्याहाळत राहतो. घराची गोष्ट निघाली आहे म्हणून आठवले. आम्ही १० वर्षापूर्वी पिंपळे सौदागर भागात मध्ये राहायला आलो, तेव्हा आसपासचा भाग अजून तसा मोकळाच होता, पूर्वीची शेत-जमीन अजून तशीच होती. पावसात, तेथे, पाणी साचून, त्यात असलेल्या खूप साऱ्या बेडकांचा रात्रभर डराव डराव असा रागालाप ऐकू येत असे. घरामागे असलेल्या परसात गोगलगायी निघत.

काही वर्षापूर्वी ऐन जून मध्ये एका कार्यक्रमासाठी केरळ मध्ये गेलो होतो. केरळमध्ये भारतातील मान्सूनचा पहिला वाहिला पाऊस पडतो. तो मी तेथे अनुभवला.

weliynad

त्यावेळी मी कोची पासून जवळच वेलियनाड ह्या गावी, चिन्मय मिशनचे केंद्र आहे, तेथे होतो. हे केंद्र आद्य शंकराचार्य ज्या घरात जन्मले तेथेच आहे. तेथल्या पावसात भटकण्याचा वेगळाच अनुभव होता-तेथील उतरत्या छपरांची घरे, रबराची, तडा-माडाची झाडे, वेगळ्या धाटणीची मंदिरे, आणि पडणारा पाऊस-कधी जोराचा, तर कधी रिमझिम(तेथल्या १५ दिवसांच्या वास्तव्याबद्दल कधीतरी लिहायचे आहे). आजकाल बरेच जण मान्सूनचा मागोवा जात त्याचा अनुभव घ्यायचा असा पर्यटनाचा वेगळाच प्रकार निघाला आहे. मला मात्र ते जमेल असे वाटत नाही, त्या पेक्षा मी Chasing the Monsoon हे पुस्तक वाचून तो अनुभव घ्यायचे ठरवले आहे.

तर असे हे मी पाहिलेले पावसाळे!

Advertisements

3 thoughts on “पावसाळा-My Monsoon Memories

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s