सात सक्कं त्रेचाळीस

प्रसिद्ध लेखक किरण नगरकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीबद्दल बरेचदा मी ऐकले आणि वाचले होते. ही त्यांची कादंबरी ४०-४५ वर्षापूर्वीची. पहिली आवृत्ती १९७४ची. त्याची तिसरी आवृत्ती २०१४ मध्ये निघाली. ती मी विकत घेतली आणि वाचायलाही सुरुवात केली, पण फार प्रगती नाही झाली. काही दिवसापूर्वी त्यांच्या Ravan trilogy(Ravan and Eddie, The Extras, Rest In Peace) मधील तिसरी कादंबरी Rest In Peace प्रसिद्ध झाली आणि त्याबद्दल Indian Express मध्ये वाचले. मी परत ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कडे वळालो. ही कादंबरी तिच्या फॉर्मबद्दल, खुलेपणाबद्दल प्रसिद्ध आहे, खरे तर ही एक, कोसलासारखी महत्वाची कादंबरी आहे असे मानतात. जसे कोसला कादंबरीबद्दल ‘कोसलाबद्दल’ हे पुस्तक आहे, ज्यात कोसलाच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे, तसा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ बद्दल मला तरी माहीत नाही.

वेगळे शीर्षक

आता ही कादंबरी वाचताना ४०-४५ वर्षापूर्वीचा काळ, आणि पार्श्वभूमी त्यावेळच्या मुंबईची हे कायम लक्षात ठेवावे लागते. तो काळ आणि मुंबईची त्यावेळची पार्श्भूमी ही आधी बऱ्याच कादंबऱ्यात आली आहे. मी कादंबरी परत वाचायला सुरु केली तेव्हा ती मी परत पहिल्यापासून सुरुवात केली. त्यांचे मनोगतही परत वाचले. कादंबरीचे शीर्षक वेगळे आणि लक्षवेधक आहे. ते कादंबरीतील एका प्रसंगावरून प्रकाशकाने सुचवले. तो प्रसंग असा आहे की, मुख्य व्यक्तिरेखा(कुशंक) शाळेत असताना शिक्षक त्याने लिहिलेले साताचे चुकीच पाढे पाहून त्याला सुनावतात-सात सक्कं त्रेचाळीस असे खोटे(चुकीचे) का लिहिले आहे? हेच वाक्य शीर्षक म्हणून का निवडले ह्याला उत्तर नाही. असेच दुसरे कुठलेतरी निवडले असले तरी चालून गेले असते, मला वाटते, पुढच्या आवृत्ती साठी-म्हणजे जर ती निघणार असेल तर, प्रकाशकाने ह्या पुस्तकाचे उचित शीर्षक काय असावे याची एक स्पर्धा घ्यायला हरकत नाही.

किती कथानकं?

कादंबरीत बरीच छोटी छोटी कथानकं येत राहतात. पण सगळ्यात समान धागा आहे तो कुशंक. प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे चित्रपटाचे तंत्र वापरले आहे असे मान्य केले आहे, पण ते जाणून बुजून नाही. तसेच आजकाल चित्रपटात सुद्धा असा ट्रेंड आहे जेथे वेगवेगळ्या ३-४ कथा एकत्र बांधून दोन-अडीच तासांचा चित्रपट तयार करायचा(मी तसे चित्रपट खूप नाही पहिले. एकच आठवतो आहे-‘गंध’, ज्यात सोनाली कुलकर्णी, मिलिंद सोमण वगैरे होते). असे काहीसे ह्यात झाले आहे. पार्श्वभूमी आहे मुंबईची, ती पण ४० वर्षापूर्वीची, जी इतर लेखकांच्या कादंबऱ्यातून देखील आली आहे, जसे जयवंत दळवी, भाऊ पाध्ये वगैरे. गुन्हेगारी जग, जगण्यातील असाह्यता, लाचारी, गरिबी, लांडी-लबाडी, दुःख, वेदना याचे दर्शन त्यातूनही झाले आहे. प्रस्तावनेतही त्यांनी ते मान्यही केले आहे, आणि मुंबई ही अनेक रिंग असेलेली एक सर्कस आहे असेच ते मानतात.

भाषा आणि शैली

आणि कादंबरीची भाषा काय आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी असे ठायी ठायी येत राहते. म्हणजे एखादे वाक्य असे नाही, तर पानेच्या पाने, परिच्छेद दुसऱ्या भाषेत आहेत.  माझ्या माहितीत तरी अशी २-३ भाषा असलेली कादंबरी वाचनात नाही. ‘कोसला’ मध्ये जसे ‘उदाहरणार्थ’ हा शब्द वापरला आहे, तसे नगरकरांनी ‘पेटंट नॉनसेन्स’ असा शब्द-प्रयोग वापरला आहे. त्यातील व्यक्तिरेखांची/पात्रांची नावे सुद्धा हटके आहेत. उदा. कुशंक, आरोती, प्रचीन्ति वगैरे. अशी नावे का वापरली आहेत, माहीत नाही. नगरकरांना विचारले पाहिजे. भाषा अतिशय बोल्ड, भडक आहे(लक्षात ठेवा १९७४ची कादंबरी आहे, खरेतर ती त्यांनी १९६७ साली लिहायला सुरुवात केली असे ते प्रस्तावनेत म्हणतात). शिव्यांचा मुक्तहस्त वापर आहे. मानवी मनाच्या अस्थिर अवस्थेचे, असह्यातेचे वर्णन अतिशय दाहक आहे. ओबड धोबड स्त्री देहाचे वर्णन आहे, तसेच मनात कसे विचारामागून विचार येत राहतात-निरर्थक, वासनायुक्त, असंबंध, तसेच यात वर्णनं येत राहतात . काही काही ठिकाणी तर असे वाटत राहते की, लेखक त्याला वाटत असलेली गरळ बकाबका ओकातोय की काय.

पुस्तकात मधे मधे काही चित्रं आहेत, ती चित्रकार प्रभाकर कोलते यांची.  त्यांचे प्रयोजन काय हे कळत नाही. बऱ्याच ठिकाणी प्रसंगानुरूप इंग्रजी चित्रपट, कादंबऱ्या, लेखक, गाणी यांचे उल्लेख येत राहतात. मला वेगवेगळ्या पुस्तकातून, आणि चित्रपटातून(विशेषतः जुन्या, classic) आलेले असे उल्लेख, संदर्भ जमतील तशे गोळा करण्याची सवय आहे. त्यावरून त्या वेळच्या समाजमनाची थोडीफार उकल होते असे मला वाटते(आता उदाहरणार्थ, मी मानसिक आजार ह्या क्षेत्रात थोडेफार काम करत असल्यामुळे, मला मानसिक आजार ह्या विषयसंबंधीचे काय लिखित उल्लेख आहेत तसेच दृश्य माध्यमातून काय आणि कसे दाखवले आहे ह्या बद्दल रुची असते)

आणखीन एक गमतीशीर उल्लेख. कादंबरीत एका वळणावर कुशंक एका हॉस्पिटल मध्ये रिसर्च करतो. ‘तू’ त्याला त्या रिसर्चचे प्रोग्रामिंग करून देवू का असे विचारते. ‘तू’ ने प्रोग्रामिंगचा कोर्स केलेला असतो आणि ती काही करणानिमित्त पंच ऑपरेटरचे काम करत असते. मी स्वतः संगणकशास्त्र शिकलेले असल्यामुळे हे उल्लेख तसेच १९७४ मधील  ह्या कादंबरीत मुंबईच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळेही,  मला गमतीशीर वाटले.

हे पुस्तक का वाचावं?

हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटले की काय आहे यात, काय समजले, किंवा नाही समजले. एकतर ती कुशंक नावाच्या प्रामुख्याने मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीची प्रेम-प्रकरणे, जी सर्व-सर्वच्या असफल आहेत-का तर त्याला धड नोकरी नाही, पैसा कमावण्याचे साधन नाही, जीवनात आर्थिक स्थैर्य नाही. हे साधारण सूत्र आहे. हे पुस्तक वाचावे प्रामुख्याने त्याच्या शैली साठीच. अशी मी तरी अजून मराठी आणि इंग्रजी कादंबऱ्यात पहिली नाही. तिसऱ्या आवृत्तीत लेखकाची प्रस्तावना आहे. ती आधी वाचल्यामुळे थोडीशी मदत होते. त्यात त्यांनी कादंबरीचा जन्म, समीक्षेचा इतिहास वगैरे गोष्टी नमूद केल्या आहेत, त्या नक्कीच तो काळ समजायला मदत करतात.  त्यांची Cuckold ही इंग्रजी कादंबरीही माझ्या यादी मध्ये आहे. पाहुयात कसे जमते ते वाचायला.

जयवंत दळवी यांनी ‘ठणठणपाळ’ मालिकेअंतर्गत ह्या पुस्तकाबद्दल/किरण नगरकरांबद्दल  अतिशय बहारदार रीतीने त्यांनी लिहिले आहे.  ते शक्य झाल्यास मिळवून वाचा असे सांगून थांबतो.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s