अच्युत आठवले आणि आठवण

हुश्श! ‘अच्युत आठवले आणि आठवण’ ही कादंबरी मी संपवून खाली ठेवली शेवटी. अर्थात ती मी काय एका दमात संपवली अश्यातला भाग नाही. ती छोटीशीच कादंबरी आहे. पण नेटाने वाचावी लागली हे मात्र खरे. मकरंद साठे यांची ती कादंबरी. मकरंद साठे मला आधी माहीत होते ते नाटककार म्हणून. त्यांची काही नाटके मी पहिली होती. उदाहरणार्थ चौक, सूर्य पाहिलेला माणूस. त्यांचे मराठी नाटकाच्या इतिहासावर असलेले ३ खंडीय कृती ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. ती कृती अर्थात ह्या कादंबरीच्या नंतरची.

ही कादंबरी विविध अंगाने वेगळी आहे. विषय जरी साधा आणि नेहमीचा असला तरी, त्याची मांडणी, आणि स्मृती अथवा आठवण या विषयासंबंधी केलेली विधाने तिला वेगळी ठरवतात. तर त्याची गोष्ट काय आहे? तर ती अच्युत आठवले नावाच्या एका गृहस्थाची कथा आहे. त्याने एक खून केलेला असतो. त्याला शिक्षा होवून तो कोठडीत बंद असतो. थोडेसे या कोठडीबद्दल. ती तुरुंगातील नाही तसेच मनोरुग्णालयातील देखील नाही. लेखक त्याला काय म्हणतो ये मुळातून सांगणे आवश्यक आहे-‘…त्याला म्रेझन मध्ये आणले होते. म्रेझन म्हणजे mental hospital आणि prison यांच्या मधील संस्था…आपल्याकडे त्याचे नाव(मनोरुग्णालय आणि तुरुंग या अर्थी) मनोरंगाश्रम ठेवावे का मानंग ठेवावे या बद्दल भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये वाद झाला होता…. ‘. हे थोडेसे उपरोधात्मक/विनोदी आहे हे सांगायला नको. असे असले तरी, अमेरिकेसारख्या देशात बरेचसे मानसिक रुग्ण हे तुरुंगात दाखल होतात, कारण तेथे असलेली व्यवस्था. असो. त्याला अशा ठिकाणी का ठेवले आहे याचे उत्तर नंतर मिळते-त्याला स्मृतीभ्रंश झालेला असतो, त्याला काही मानसिक आजार आहे असा निष्कर्ष काढला गेला असतो. तर कादंबरीत काय आहे, तर अच्युत आठवलेला जे काही आठवते(आणि आठवत नाही) त्याची ही कहाणी आहे. धर्माचे तत्वज्ञान, मनाचे तत्वज्ञान, किंवा विनोदाचे देखील तत्वज्ञान जसे असते, तसे स्मृतीचे अथवा आठवणीचे तत्वज्ञान(Philosophy of Memory) असते का मला माहीत नाही. पण मकरंद साठ्यांनी ज्या प्रकारे आठवणी, स्मृती या विषयाकडे पहिले आहे, ते नक्कीच त्याकडे जाणारे आहे असे वाटते.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रसिद्ध नाटककार गो पु देशपांडे यांचा अभिप्राय आहे. त्यात ते म्हणतात, ‘…त्यांच्या आयुष्याच्या निरर्थकत्वाची कहाणी आहे…त्याच प्रमाणे ही कादंबरी कालविचार मांडते. आपल्याला आठवते ते काय असते? भूत का वर्तमान का भविष्य? का तिन्ही?’ त्यांचे हे म्हणणे अगदी खरे आहे. इंग्रजीमध्ये ‘Back to Future’ नावाचा एक सिनेमा होता. तो थोडा science fiction च्या अंगाने असला तरी, कालाच्या भिंती तोडून गेल्यावर जे काही होवू शकते ते त्यात दाखवले आहे. तसेच काहीसे ह्या कादंबरीत झाले आहे असे म्हणता येईल, पण अर्थात science fiction त्यात नाही. संगणक, त्याचा वापर ह्या गोष्टी आहेत, पण ती काही विज्ञान कादंबरी नक्कीच नाही. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणातील एक  वाक्य पाहा-‘संगणक आणि अमेरिका आपल्या स्मृती ढवळून काढतात. स्मृतीची व्याप्ती अजून वाढवतात. आपली स्मृतीशक्ती कमी पडली, तर संगणक त्यांची स्मृती उपलब्ध करून देतात. स्मृतीना वेगळा अर्थ प्राप्त करून देतात. या अंगाने संशोधन करायला हवे’. म्हणजे हे भविष्यात घडू शकणाऱ्या काही गोष्टीकडे थेट निर्देश आहे असे म्हणावेसे वाटते. यासारखा काहीसा प्रकार आपण काही इंग्रजी चित्रपटातून पहिला आहे. उदा. Total Recall, Inception वगैरे. अमेरिकेतील एमआयटीचे मज्जातंतूशास्त्रज्ञ(neuro-scientist)  रामिरेझ एके ठिकाणी म्हणतात, “I see a world in which we can reactivate any kind of memory that we like. I also see a world where we can erase unwanted memories”

काही दशकापूर्वी हिंदी चित्रपटातून ‘यादगाश खो जाना’ आणि ‘फिरसे वापस आना’ सारख्या धक्कातंत्राचा सर्रास वापर होई. ह्या कादंबरीत देखील अच्युत आठवलेची स्मृती गेल्यासारखी आहे(transient global amnesia), पण हिंदी चित्रपटाचे तंत्र न वापरता थोडी तत्वज्ञानात्मक तसेच मनोविकारशास्त्राच्या अंगाने त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मला तत्वज्ञान तसेच मानसशास्त्र/मनोविकारशास्त्र यात रस आहे, मी मानसिक आरोग्य क्षेत्रात Schizophrenia Awareness Association(SAA) तर्फे स्वमदत गट(self help support group-SHSG) देखील चालवतो. यामुळे ह्या पुस्तकात आलेल्या ह्या विषयांची चर्चा रंजक वाटली. आणखी एक उदाहरण पहा: ‘….माणूस खुपच भविष्याबद्दल विचार करायला लागला की स्वतःतून बाजूला होवून बाहेरून विचार करायला लागतो. तो त्रयस्थ नसतो. पण अशा वेळी स्वप्नात असल्यासारखा तो स्वतःलाच पाहू लागतो. लहान मुल कसे स्वतःलाच स्वतःच्या नावाने संबोधते तसे. आपोआप येणाऱ्या आठवणीचे तसेच असते. स्मृती म्हणजे केवळ भूतकाळाची पुनर्रचना नसते. ‘तेव्हा’चे ‘आता’ होते. ‘तेव्हा’तील चित्रे ‘आता’तील चित्रण स्पष्ट करत असतात. एक सुसंगत चित्र तयार करत असतात….’ यावर आणि अशा अनेक स्मृतीशी निगडीत विधाने आहेत त्याबद्दल आणखी विचार मंथन होण्याची आवशक्यता आहे. विचार, भावना आणि कृती यात ताळमेळ नसणे ही मानसिक आजाराची एक साधी व्याख्या आहे. तसे काहीसे अच्युतच्या बाबतीत झाले आहे असे दाखवले आहे. आणि त्यामुळे कादंबरीत दिसणारी जीवनाबद्दलची निरर्थकता यामुळे आली असे वाटते.

लेखकाने या कादंबरीतून स्मृती, आठवण आणि त्या संबंधित अनेक विषय यांना स्पर्श केला आहे. मी सहज गुगलवर या विषयावर शोधले असता बरेच संदर्भ मिळाले. एक मात्र नक्की, त्याचा काही प्रमाणात अभ्यास करता येईल, ज्या मुळे हा विषय आणखी समजायला मदत होईल. जाता जाता, सकाळीच वर्तमानपत्रात वाचले की उद्या(सप्टेंबर २१) World Alzheimer’s Day आहे, आणि त्या निमित्ताने पुण्यात ‘अस्तु’ हा चित्रपट, जो या विषयीच आहे, दाखवला जाणार आहे.

Update on Oct 29, 2015:

मी काही दिवसापूर्वी, digital amnesia बद्दल वाचले होते. इंटरनेट आणि मोबाईलमुळे आपण गोष्टी लक्षात ठेवणेच विसरत चाललो आहोत असे असे वेगवेगळे रिपोर्ट्स सांगतात. एकूणच मानवी आठवण/स्मृती क्षमता यावर आजच्या युगात काय परिणाम होत, तसेच आपला मेंदू कसा adapt होत आहे,  आहेत याची माहिती समजावी म्हणून हा खटाटोप.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s