मुशियन वाड्मय

चिं वि जोशी यांचे नाव घेतले की चिमणराव आणि गुंड्याभाऊ आठवतात, दूरदर्शन वरील त्यांच्यावरची मालिका आठवते, दिलीप प्रभावळकर यांनी रंगवलेला चिमणराव आठवतो. जुन्या काळातले ते प्रसिद्ध विनोदी लेखक तर होतेच, पण पाली भाषेचे अभ्यासक होते, ते बडोदा संस्थानात पुरातत्व विभागात काम करत असत. मराठीत विनोदी लेखक म्हटले की पु ल देशपांडे आठवतात. त्याआधी आचार्य अत्रे होते, त्याही आधी कोल्हटकर आणि चिं. वि जोशी होते. त्यांच्या लेखनातून जुन्या काळचे(जवळ जवळ शतकापुर्वीचे) पुणे  दिसते, त्याकाळची माणसे, त्यांचे स्वभाव विशेष, गुण दोष, आणि त्यावर त्यांनी केलेल्या कोट्या, विडंबन आणि एकूण चित्रण मनोरंजक आहे. त्यांची चिमणरावारील  पुस्तके तर प्रसिद्ध आहेतच, पण इतर पुस्तके जशी Manual of Pali, जातककथा ही देखील प्रसिद्ध आहेत.

त्यांचे वायफळाचा मळा हे वेगळे पुस्तक एके दिवशी हाती लागले. त्यांनी ७०-८० वर्षापूर्वी लिहिलेले लेख त्यात आहेत. प्रस्तावना आणि अनुक्रमणिका का कोणास ठाऊक, शेवटी आहे, १९५७ ची आवृत्ती आहे. हे लेख म्हणजे लघु-निबंध आहेत. त्यातील एक लेख आहे ‘मुशियन वाड्मय’. त्याबद्दल थोडेसे लिहावे म्हणून हा ब्लॉग. मुशियन वाड्मय म्हटले की वाटते? रशियन वाड्मय असे वाटते ना? मुशिया असा काही देश आहे का, रशिया सारखा? लेखात त्यांनी मुशिया या कल्पनेतील देशाच्या वाड्मयाचा विडंबनात्मक परिचय  करून दिला आहे. त्यांनी रशियन वाड्मयाचा समाचार घेतला आहे हे उघड आहे. पण का?

हा ७०-८० वर्षापूर्वीचा लेख आहे. त्या काळी रशियन वाड्मय मराठी आणण्याची लाटच होती. मला आठवते, प्रवदा प्रकाशनने प्रसिद्ध केलेली पुस्तके मिळत, ती स्वस्तही असत. त्यांनी प्रस्तावनेत ह्या लेखाबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात, ‘…मराठी वाड्मय अगदी गचाळ आहे आणि त्यामानाने इतर कुठल्याही भाषेतील ग्रंथसंपत्ती अधिक श्रेष्ठ आहे हे ठासून सांगण्याचे कित्येक परधार्जिण्या लेखकांस आणि वक्त्यांस वेडच लागलेले असते….सगळ्यात आजतागयात विचारांची उसनवारी रशियाच्या आकालेतून करण्याकडे महाराष्ट्राची प्रवृत्ती आहे…वास्तववाद हे एक वेड भारतीय वाड्मयात परकीय वाङ्मयाच्या अनुकरणाने पसरत चालले आहे….तथापि कित्येक वेळा वास्तववादाचा अतिरेक करून कलेची आणि रंजक्तेची कशी दीनवाणी अवस्था करून टाकण्यात येते ते मुशियातील नाटकाच्या द्वारे दाखवण्याचा मी यत्न केला आहे’ हे त्यांचे म्हणणे अजूनही किती खरे आहे, हे समजते. आता फक्त रशियाच्या जागी अमेरिका आहे.

लेख अगदी बहारदार आहे. मुशिया हा चिमुकला देश म्हणे झेको-स्लोव्हाकिया आणि ठोको-स्लोव्हाकिया यामध्ये आहे! त्यांनी त्या देशातील अर्थशास्त्रज्ञाचे(प्रो. झाम्बक, डॉ. झकमारोस्की!) विचारांची ओळख करून दिली आहे. त्या देशाच्या इतिहासाबद्दल ही सांगितले आहे, आणि तेथील इतिहासकार इतिहासाकडे कसे पाहतात, तर म्हणे इतिहास हे वस्तूस्थितीच्या पायावर उभारलेले शास्त्र नसून, ती एक ललित कला आहे.याचाही रोख उघड आहे. त्यानंतर इतर प्रकारच्या वाड्मयाची ओळख करून दिली आहे. कथावाड्मयात मुशियाने क्रांती केली आहे. पाल्हाळयुक्त कादंबरी-युग संपून, म्हणे,दीर्घ कथा, लघुकथा, लघु लघु कथा यांचे युग आले आहे. त्यांनी दिलेली लघु लघु कथा तर अतिशय विनोदी आहे. लैंगिक आणि कामभावना प्रचुर कथा वाड्मयाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याकालच्या पाश्चात्य वाड्मयात येणारे असे लेखन, तसेच काही ठिकाणी बहिण-भाऊ यामधील प्रेम संबंध, विवाह जसे काही भारतात नव्हते असे मानणाऱ्यांना त्यांनी टोला मारला आहे. मुशियन कवितेबद्दल ही त्यांनी मजेशीर लिहिले आहे. ते म्हणतात, ‘…दुसरा एक कवी प्याव्हिस्की हा ईश्वरविषयक व गुढ कल्पनात्मक कवने रचण्याबद्दल नावाजलेला आहे…त्यांचा अर्थ कवीला स्वतःलाच कळत नाही’.

मुशियन कादंबरी वाड्मयाची देखील त्यांनी खिल्ली उडवली आहे. हाडोव्हीच कोणी लोकप्रिय कादंबरीकार याच्या ‘केव्हा?’ या कादंबरीचे बहारदार वर्णन केले आहे. एकच मसाला देतो-..’अशी खळबळ मुशियाची राजधानी पागलबर्ग येथील प्रत्येक घरात त्या दिवशी उडालेली होती…थेरेसाच्या मनोभावाचे पृथक्करण त्याने एखाद्या रसायनशास्त्रज्ञाप्रमाणे काळजीपूर्व आणि बिनचूक केले आहे. मानसशास्त्रातील गुढ प्रमेये लेखकांस करतालामलवत पेलता आले आहे…’  दोस्तोव्हकीच्या(Fyodor Dostoevsky) काही कादंबऱ्यातून आलेले समाजाचे, मानवाचे भयाण आणि दीर्घ चित्रण आणि त्याचे समर्थन कसे Freud च्या मानसशास्त्राच्या प्रमेयानुसार बरोबर आहे हे त्यावेळी सांगितले जायचे. त्याची ही सरळ सरळ खिल्ली आहे(तो कितपत बरोबर आहे किंवा नाही हा भाग वेगळा).  रंगभूमीबद्दलही त्यांनी एका काल्पनिक नाटक पाहण्याच्या अनुभवावरून आपले मत त्यांनी प्रदर्शित केले आहे.

ते लेखात एके ठिकाणी ट्रान्सलेटोग्राफ(Translatograph) अश्या यंत्राचा भाषांतर करण्यासाठी वापर केला आहे असे लिहितात. हे ही मजेशीर आहे आणि आजच्या युगात Google Translator सारखी सुविधा आली आहे, हे पाहून त्यांच्या ह्या कल्पनाशक्तीची गम्मत वाटते.

तर एकूण काय, हा लेख मुळातून वाचायला हवा, आणि त्यांचे म्हणणे आजही, आजच्या सामाजिक परिस्थितीत किती तंतोतंत खरे आहेत हे समजते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s