आगुम्बे, किंग कोब्रा आणि अरण्यकांड

मी काही वर्षापूर्वी कर्नाटकात उडुपी येथे गेलो होतो. देवदर्शन झाल्यावर, उडुपी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहून बेंगळुरूला जाण्याचा आमचा बेत होता. उडुपी पासूनच जवळच आगुम्बे(Agumbe) हे सह्याद्री पर्वतातील शिखर आहे. आम्हाला डोंगरापलीकडे असलेल्या शृंगेरी येथे जायचे होते. सह्याद्री पार करून पलीकडे जायचे असल्यास तो डोंगर ओलांडून जावे लागते. आगुम्बेचा परिसर, तेथील जंगल अतिशय घनदाट आहे. येथे इतका पाऊस पडतो की, या ठिकाणाला दक्षिणेचे चेरापुंजी असे म्हणतात. त्या डोंगरातून एक घाटरस्ता देखील जातो, जो अतिशय अवघड आहे. घाटातून सूर्यास्त अतिशय रम्य दिसतो, आणि ते पर्यटकांचे आकर्षण आहे. कर्नाटक चित्रपट सृष्टीतील गेल्या पिढीतील सुपर-स्टार राजकुमार याच्या कन्नड चित्रपटातून आगुम्बेचे मनोहारी चित्रण बऱ्याच वेळेला पहिले होते. त्याच्या एका चित्रपटातील एक गाणे(आगुम्बेया प्रेम संजेया) तर आगुम्बेचे वर्णनच करते. एकूण काय तर मी ह्या आगुम्बेच्या प्रेमातच पडलो आहे.

पण आत्ता आगुम्बे आठवयाचे कारण, मला मिळालेले एक मराठी पुस्तक. नाव आहे अरण्यकांड, लेखक आहेत अनंत मनोहर. ती एक कादंबरी आहे, आणि तेही, एका नागिणीची king cobra ची, आणि सगळे घडते आगुम्बेच्या जंगलात. प्रस्तावना वाचली आणि पुस्तक मी लगेच घेतले. प्रस्तावना वाचून मला दोन आश्चर्याचे धक्के बसले. एक तर नागावर अशी कादंबरी अशी पहिली नव्हती. दुसरा, कथानक घडते ते आगुम्बे ह्या माझ्या आवडीचे ठिकाण, असलेल्या ठिकाणी घडते. लेखकाने आगुम्बे आणि परिसरात भटकंती केली आहे, तेथील लोकांशी ते बोलले आहेत, वेग-वेगळे संदर्भ अभ्यासले आहेत. प्रमुख कल्पना किंग कोब्रा आणि मानव यात काय नाते आहे. नाग अथवा नागीण डूख धरतो/धरते, पाठलाग करतो वगैरे आपण हिंदी/मराठी चित्रपटातून पाहिलेले असते. असे होते का किंवा होवू शकते का असा प्रश्न पडत असतो. ह्याचे उत्तर सर्प कुळातील प्राण्यांची गंधज्ञानशक्तीवर हे आहे, जे या कादंबरीत दाखवले आहे.

पहिल्या प्रकरणातील पहिलेच वाक्यच कादंबरीचे प्रमुख पात्र काय आहे हे दर्शवते. ते वाक्य असे आहे: तिच्या डोळ्यावर सारा आला होता. समोरचे, अगदी दोन हातावरचेही तिच्या लालसर डोळ्यांना ओळखू येत नव्हते. देहावर कात धरायला लागल्या पासून तिने तिची सर्व भिस्त तिच्या गंधज्ञानशक्तीवर ठेवेअली होती’. आपण जसे जसे कादंबरी वाचत जातो, तसे तसे जंगलाचे वर्णन, त्यातील वेगवेगळया प्राण्यांचे वर्तन, तेही प्रामुख्याने त्यांचे माजावर येणे, निसर्ग आणि ऋतूप्रमाणे होणारे बदल याचे भरपूर आणि सविस्तर निवेदन येत राहते. जंगलातील माकडांचे तर अतिशय सविस्तर वर्णन वाचून मला तर व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर या पुस्तकाची वारंवार आठवण होत होती. माकडांप्रमाणे हत्ती, हरणे, ससे, अस्वल, तरस, रानकुत्री, वाघ, बिबळ्या यांच्या जीवनकर्माचे, प्रजनन उत्सवाचे, स्वभावविशिष्ट्यांचे बहारदार वर्णन लेखकाने केले आहे. त्यामुळे जंगल हेचं दुसरे प्रमुख पात्र. आगुम्बेचे जंगल माझ्या डोळ्यासमोर सारखे येत होते. अर्ध्या पुस्तकापर्यंत प्रमुख पात्र आणि विषयवस्तू असलेल्या नागराणी बाबतीत विशेष काहीच घडत नाही, काही अपवाद सोडल्यास-जसे नागराणी माजावर येते आणि, नागाबरोबर मिलन होते, आणि काही दिवसानंतर ती अंडी टाकते. By the way, मराठीत ‘माजणे’ किंवा ‘माजला आहे का’ असा वाक्य प्रचार आहे, तो ह्या प्राण्यांच्या माजावर येणे(म्हणजे तारुण्यात आल्यावर विरुद्धलिंगी जोडीदाराबद्दल आकर्षण निर्माण होवून वर्तन जसे सैरावैरा होते) यावरून आला आहे की काय अशी शंका येते.

जंगलातील जीवन, आजुबाजू असलेल्या गावातून लोक कसे जंगलावर अवलंबून असतात, तसेच छोट्या मोठ्या तस्करीच्या घटना, अधिकारी आणि इतर यात असलेले हितसंबंध वगैरेचीही माहिती मिळत राहते. नागराणीची अपत्ये, त्यातील एक मुख्य नर ज्याचे नाव सैतान आणि त्याची वाढ, आणि जीवनक्रम दाखवला आहे. अमेरिकेतून काही लोक ह्या किंग कोब्राची तस्करी करण्यासाठी आगुम्बेमध्ये येतात, आणि सैतान कसा त्यांचा नायनाट करतो हे दाखवले आहे. पण जखमी झालेल्या सैतानाला मुंग्या कशा खावून नष्ट करतात याचेही वर्णन आहे. किंग कोब्रा हा जगातील असा सर्प आहे जो फक्त बचाव करण्याकरता हल्ला करत नाही, तर एकूणच आक्रमक सर्प आहे. Franc Buck च्या पुस्तकाचा(Bring Them Back Alive) यात उल्लेख आहे. Franc Buck बद्दल व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकातून वाचले होते. लालू दुर्गे यांनी त्याच्या ह्या पुस्तकातील आणि आणखी एका पुस्तकातील काही कथांचा/लेखांचा अनुवाद त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यात किंग कोब्रावर एक लेख आहे.

एकूणच वनकथा असलेल्या ह्या कादंबरीत किंग कोब्रा, आगुम्बेचे जंगल जीवन यासाठी हे पुस्तक जरून वाचनीय आहे. भारतात आगुम्बे येथे किंग कोब्रा आहे हे मला माहीत नव्हते. किंग कोब्राची तर बरीच माहिती यात मिळते, जसे, ‘king cobra is gifted with unusual intelligence and sense of awareness’. हे पुस्तक वाचून एक विचार माझ्या मनात चमकून गेला की या पुस्तकाचे कन्नड मध्ये भाषांतर करावे. कारण कथा कर्नाटकात घडते, जवळ जवळ सगळी पात्रे तेथीलच आहेत. पाहुयात कसे काय जमते ते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s