चक्रीवादळ

चक्रीवादळ ही प्रभाकर पेंढारकर यांचे सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. त्यांची रारंगढांग सारखी एक-दोन पुस्तके पूर्वी वाचली होती. पेंढारकर हे भारतीय सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन मध्ये काम करत. त्यांचे वडील भालजी पेंढारकर हे तर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक. १९७७ मध्ये जेव्हा आंध्र प्रदेश मध्ये प्रलयंकारी चक्रीवादळ आले, त्यावेळेस प्रभाकर पेंढारकर यांना तेथे चित्रीकरणासाठी जावे लागले. त्यावेळेस त्यांना आलेले अनुभवावरून हे पुस्तक त्यांनी २००५ साली म्हणजे जवळ-जवळ २५ वर्षानंतर लिहिले. ह्या चक्रीवादळात ३० हजाराहून जास्त लोक मरण पावले.

चक्रीवादळ भारतातील अंतर्गत भागात खूप कमी लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेला असेल, तरी आपण चित्रपटातून, आणि वर्तमान पत्रातून या संबंधी बातम्या वाचत असतो, आणि काही काळानंतर विसरूनही जातो. अमेरिकेसारख्या देशांत, जेथे अशा घटना नित्याने होत असतात, तेथे याबद्दल बरीच जागृती आहे. माध्यमे देखील विस्तृत माहिती पुरवत असतात. मी काही वर्षापूर्वी अमेरिकेत असताना हे अनुभवलेले आहे. अशा वादळांचे प्रकार, त्यांना नावे ठेवण्याची पद्धत हे सर्व समजून घेण्यास रोचक आहे. काही वर्षापूर्वी अंदमान निकोबार मध्ये जी त्सुनामी आली आणि त्यामुळे झालेला विध्वंस अजून ताजा आहे. चक्रीवादळ काय किंवा इतर नैसर्गिक आपत्ती काय, मानवाला विशेष काही करता येत नाही. फक्त अशी आपत्ती होण्याआधी जास्तीत जास्त लवकर माहिती कळावी, जेणेकरून बचावासंबंधी काम करता येवू शकते.

या सर्व पार्श्भूमीवर मला ह्या पुस्तकाचा विषय वेगळा वाटला. त्याबद्दल थोडेसे येथे. १९७७ मधील नोव्हेंबर मध्ये समुद्रात त्सुनामी आली, आणि त्याचा परिणाम म्हणून आंध्र मधील मछलीपट्टण आणि आजूबाजूचा परिसर चक्रीवादळात सापडला. १९७७ साली वादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा अजून पूर्णपणे सक्षम नव्हती, आजच्या सारखी अद्ययावत दळण-वळण व्यवस्था नव्हती, त्यामुळे सरकारी यंत्रणा उशिरा कार्यान्वित झाली आणि, त्याचे परिणाम भयंकर झाले. या सर्वाचे लेखकाने वर्णन केले आहे. सामान्य लोकांचा संघर्ष, कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी, अश्या वादळातून निकाराने पुढे सुरक्षित ठिकाणी घेवून जाणारा रेल्वे इंजिन चालक, समुद्रातील माल-वाहतूक करणाऱ्या जहाजाच्या कप्तानाने, अक्राळ विक्राळ लाटांशी सामना करताना दाखवलेले असामान्य धैर्य, त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वाची माहिती यात आहे.

नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतर, समाज कसा त्याला तोंड देतो, पुनवर्सन कसे होते, त्या घटनेतून आपण काय बोध घेतो, हे खूप महत्वाचे आहे. जपान सारख्या देशाचे उदाहरण आपल्या डोळ्या समोर आहेच. १९७७ मधील या आपत्तीमध्ये रामकृष्ण मठाने, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही खूप मोठे काम केले त्याची माहिती आहे. तसेच एका अमेरिकन संस्थेकडून फ्रेड क्युनी(Fred Cuny) याने केलेले अतिशय वेगळ्या पद्धतीचे काम याची देखील माहिती आहे. फ्रेड क्युनी याने पुनर्वसनासाठी घरे/झोपड्या बांधताना अशी वैशिष्ट्यपूर्णपणे बांधली ती चक्रीवादळात तोंड देवून उभी राहू शकतील. पुस्तकात त्या घरांची काही रेखाटने देखील दिली आहेत. हा १९९७ मध्ये रहस्यमय तऱ्हेने नाहीसा झाला, का मरण पावला हे समजले नाही. त्यावर एखादे पुस्तक किंवा चित्रपट होवू शकतो.

तर असे हे पुस्तक, अशी ही कादंबरी. एक असे कथानक नाही, प्रमुख अशी व्यक्तिरेखा नाही. आलेल्या अनुभवांचे, माणसांचे चित्रण त्यात आहे. प्रभाकर पेंढारकर यांची ती फिल्म पहिली पाहिजे. तसेच १९९० मध्ये किल्लारी मध्ये झालेला भूकंप, तसेच २००४ मधील अंदमान निकोबार त्सुनामी यावर काही पुस्तके किंवा फिल्म्स आहेत का हे पहिले पाहिजे, तसेच या पुढे अशी एखादी आपत्ती आल्यास भारताची कितपत तयारी आहे हे देखील पहिले पाहिजे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s