महेश केळूसकरांची ‘क्रमशः’

मी बऱ्याचदा वेळ मिळाला की पुण्यात पुस्तकाच्या दुकानात जात असतो. तसेच पुण्यात काही ठिकाणी जुनी पुस्तके अजूनही मिळतात, तेथेही चक्कर मारत असतो. काही महिन्यापूर्वी अश्याच एका फेरीत माझी नजर एका पुस्तकावर पडली. पुस्तक तसे नवीनच दिसत होते. पण त्याचे मुखपृष्ठ वेगळे होते. त्यावर बरेच काही लिहिले होते, घोड्यावर बसलेल्या एका व्यक्तीचे चित्र देखील होते. पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव मला त्या सगळ्यात शोधावे लागले. पुस्तकाचे नाव ‘क्रमशः’ आणि लेखक महेश केळूसकर. पुस्तक हातात घेतलं, पहिल्या पानावर आलो. तेथे अजून एक वाक्य दिसले, ते बहुधा पुस्तकाचे उपशीर्षक असावे जे असे आहे-बसत नाहीत या गोष्टी एकमेकींवर स्त्री-पुरुषांसारख्या फिट्ट. माझी उत्सुकता ताणली गेली. ते पुस्तक घेतले आणि एका दमात वाचून काढले

20160110_082841

ही एक छोटेखानी कादंबरी आहे. २०११ मध्ये मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केली आहे. मी घेतलेल्या पुस्तकावर ‘साहित्य संमेलन सासवड पुणे ४-१-२०१४’ असे मूळ बहुधा वाचकाने लिहिले होते. तर ह्या कादंबरीत मुख्य पात्र तो लेखकच आहे(तो म्हणण्याचे कारण निवेदन प्रथम पुरुषही आहे). तो एक कादंबरी लिहितो आहे, ज्यातील कथानक आणि रोजच्या घटना याची सरमिसळ होते, आणि त्यातून ज्या गमती जमती होतात, त्यातूनच ओघाने सामाजिक, राजकीय वास्तवाचा खरपूस समाचार घेतला गेला आहे. मुखपृष्ठावर लिहिल्या प्रमाणे या कादंबरीला काही ठराविक कथानक नाही. या प्रकारच्या लेखनाला magical realism असे त्यानीच संबोधले आहे. अश्या तऱ्हेचे लेखन पाश्चिमात्य साहित्यात सापडते, प्रामुख्याने मार्क्वेझ(Gabriel García Márquez), जे नुकतेच निधन पावले, यांच्या पुस्तकात सापडते. त्यांची एक-दोन पुस्तके माझ्याकडे आहेत, पण अजून वाचली नाहीत, त्यामुळे ह्या प्रकारच्या लेखनाबद्दल मी आणखीन जास्त काही लिहीत नाही, पण ह्या प्रकारच्या घाटाबद्दल मराठी जाणकारांनी लिहिले पाहिजे. पण मला पुस्तक धमाल वाटले.

तर कादंबरीची प्रकरणे एका पाक्षिकात क्रमशः प्रसिद्ध होत आहेत असे नमूद केले आहे. त्यामुळे आपल्या हातात असलेल्या पुस्तकात ठिकठिकाणी वाचक आणि प्रकाशन संस्थेच्या संपादकाबरोबर झालेला पत्र-व्यवहार दिसतो. त्या पत्रांना क्रमांक देखील आहेत. पु. शी. रेगे यांच्या ‘सावित्री’ ह्या अश्याच कादंबरीत प्रेमकथा पत्राद्वारे फुलवली आहे, त्याची आठवण झाली. पण ते साम्य फक्त पत्राचा वापर करण्यापुरतेच आहे. मध्येच ह्या पुस्तकावरील कथानकावर, पात्रांवर वाचकात चर्चा होताना दाखवली आहे. त्यांना सुद्धा क्रमांक आहेत. या सर्वातून, सामाजिक तसेच राजकीय व्यवस्थेवर, विविध विषयावर, समस्यावर चर्चा, भाष्य, मत-प्रदर्शन आहे. हेच प्रमुख उदिष्ट असावे असे वाटत राहते. तसेच तथाकथित नायक बाळू कासार नावाचा प्रथमदर्शनी वेडसर वाटणारा मनुष्य, निषेध नोंदवण्यासाठी घोड्यावरून मंत्रायालावर गेला आहे असे संदर्भ येत राहतात. याचा निर्देश प्रसिद्ध Cervantes च्या प्रसिद्ध Don Quixote या कादंबरीतील Don Quixote आणि त्याचा घोडा याच्याकडे असावा असे वाटत राहते.

आता अश्या रूढार्थाने कथानक नसलेल्या कादंबरीचा शेवट कसा करायचा? कुठे थांबायचे? आरंभबिंदू तर आहे, ज्यात, हा आपला धडपडणारा लेखक, एकटा सडाफटिंग असलेला, जो एका घरगुती खानावळीत दररोज जेवत असतो. त्याची उधारी थकलेली, तुंबलेली असते. त्या खानावळीचा मालक, एक पाक्षिक चालवत असतो! आहे ना विनोदी? त्याची थकबाकी चुकवण्यासाठी तो त्या पाक्षिकात ही जी काही तथाकथित क्रमशः छापली जाणारी कादंबरी लिहिण्याचे कबुल करतो. आणि ज्या दिवशी ही थकबाकी संपते, त्या दिवशी, पाक्षिकात लिहिण्याचे थांबतो, त्यामुळे ओघाने, माझ्या हातातील कादंबरी देखील संपली!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s