खेळघर

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ असे लांबलचक आणि संपूर्ण असे नाव असलेल्या लेखकाचे खेळघर हे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्याबद्दल थोडेसे येथे.

ही कादंबरी म्हणजे एका सेवाभावी संस्थेचा, तसेच ती निर्माण करण्याऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा लेखाजोखा आहे. समाजात प्रत्येक पिढीत कोणीतरी असे असते जे समाज बदलण्याचा विचार करून काहीतरी वेगळे करण्यासाठी झटत असतात. आणि त्याबद्दल लिहीत असताना, एक विचित्र योगायोग होत आहे. आज महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी. टीव्हीवर बेन किंग्सलेचा गांधी हा सिनेमा सुरु आहे. गांधीजीनी देखील हाच प्रयोग करून, पुढे स्वातंत्र्य चळवळीत त्याचे रुपांतर केले.

तर, ती व्यक्ती म्हणजे माधव कऱ्हाडकर, आणि ती संस्था म्हणजे खेळघर. कादंबरी सुरु होते ती त्याच्या मुलीच्या, मैत्रेयीच्या, प्रवासातील घटनांनी. तिचा प्रवास असतो तो सारंगपाडा ह्या गावाला, जेथे खेळघर निर्माण झालेले असते. ती तरुण मुलगी अभिनयाच्या क्षेत्रात असते, आणि स्वतंत्र विचारांची, आजच्या युगातील स्त्रीचे ती प्रतिनिधित्व करते आहे. ज्या मैत्रेयीने आयुष्यभर तिच्या पित्याचा तिरस्कार केला आहे, ती त्याला भेटायला जात आहे. ती तेथे गेल्यावर, तिला समजते की त्याचे निधन झाले आहे. यानंतरची कादंबरी म्हणजे, तिने माधवच्या रोजनिशीच्या माध्यमातून खेळघरचा समजावून घेतलेला इतिहास, त्यातून तिला समजलेला तिचा पिता, आणि पुढे खेळघरसाठी काम करण्याचा निश्चय यापर्यंत येतो.

माधव हा डाव्या विचारसरणीचा, अस्वस्थ, आणि काहीतरी बदल घडवण्यासाठी धडपडत असलेला, कार्यकर्ता आहे. पण त्याला पुरागमित्व देखील हवे आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचे निमित्त होवून तो तिची बाजू घेतो, पण त्यासाठी त्याला पहिली पत्नी (जिच्या बरोबर त्याचे खटके उडत असतात, संबंध दुरावलेले असतात) आणि लहान मुलगी मैत्रेयी ह्यांना सोडून जावे लागते. आणि त्यानंतरचा प्रवास हा खेळघरच्या निर्माणाच्या दिशेने सुरु होतो. त्याच्या संकल्पनेतील खेळघर म्हणजे एक अशी वसाहत, असा समाज, जो मुक्त आहे, पुरोगामी आहे, स्वावलंबी आहे, निसर्ग-नियमांच्या बरोबर जाणारा, पर्यावरणाचा विचार करणारा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आपलेसे करणारा, व्यक्ती-व्यक्तीचा सन्मान करणारा आहे, विचारसरणीच्या अवतीभोवती असलेले नीती-नियम पाळणारा आहे. मी काही वर्षापूर्वी तमिळनाडू येथील पुडुचेरी (Pondicheri) गेलो होतो. तेथे महर्षी अरविंद यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले गाव Auroville आहे. खेळघर ही कल्पना त्यासारखीच वाटली. कादंबरीचा पट खुपच मोठा आहे, आणि ते साहजिक आहे. वैचारिक प्रवास, जडणघडण दाखवताना मोठ्या काल-पटलाचा विचार करावा लागतो. आणि येथे तसेच झाले आहे. कित्येक विषयांवर मंथन, विचार येथे येत राहते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, स्वावलंबन, इच्छामरण(euthanasia), नर्मदा धरण आंदोलन, स्त्री-मुक्ती आंदोलन, माहिती-तंत्रज्ञान क्रांती, मार्क्सवाद, सुधारित शेती आणि ग्रामीण विकास, धार्मिक मुलतत्ववाद आणि इतर बऱ्याच विषयावर चर्चा दिसते, आणि ते सर्व वाचताना, समजावून घेताना दमछाक होत राहते.

खेळघर संकल्पना प्रत्यक्षात येत असताना, त्याला जोडत गेलेल्या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे मतभेद, यश, अपयश, याचेदेखील वर्णन कादंबरीत येते. तसेच मैत्रेयीला देखील या सर्वातून प्रेरणा मिळून, आणि तिला समविचारांचा साथीदार, ऋत्विक मजुमदार, मिळतो खेळघर, आणि ह्या टप्प्यावर येवून कादंबरी थांबते.  हे दोघेही खेळघरचे काम पुढे एकत्र नेण्याचा निर्णय घेतात. मैत्रेयी आणि ऋत्विक यांच्या संवादाच्या विषयाच्या दरम्यान स्त्री-मुक्ती, तसेच बंगाल मधील विनोदिनी दासी हिच्या आयुष्याचा संदर्भ येतो, त्या निमित्ताने बालगंधर्व, आणि गोहरबाई कर्नाटकी यांच्या संबंधाचा विषय निघतो. पुस्तकात गोहरबाईचा उल्लेख गोहारजान असा आला आहे, तो चुकीचा आहे. रहमत तरीकेरी यांच्या अमीरबाई कर्नाटकीवरील कन्नड पुस्तकाचा मी केलेल्या मराठी अनुवादात याचे अधिक तपशील मिळू शकतील. १९३०-४० च्या दशकात उदय पावलेल्या गोहरबाई आणि अमीरबाई भगिनी होत्या, आणि त्या बिळगी भगिनी नावाने प्रसिद्ध आहेत.

महराष्ट्रात अशा पुरोगामी विचारसरणी असलेल्या व्यक्तींची तसेच संस्थांची मोठी परंपरा आहे. ह्या कादंबरीच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपातका होईना, त्यांच्या एकूण जडणघडणीचा प्रवास उलगडला गेला आहे असे म्हणता येईल.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s