धुक्यातून लाल ताऱ्याकडे

मागील महिन्यात, आमच्या भागात, म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. त्यानिमित्त संमेलनाचा आतापर्यंतचा इतिहास, आणि संमेलनाध्यक्ष यांची माहिती असलेली पुस्तिका प्रदर्शित झाली. ती चाळत असता, वि. द. घाटे, अनंत काणेकर यांची देखील माहिती मिळाली. मला मी नववी दहावी मध्ये असताना आमच्या मराठी पाठ्यपुस्तकात असलेल्या त्यांच्या धड्यांची आठवण झाली. मानाने उचल खाल्ली, आणि मी अनंत काणेकारांची काही पुस्तकं मागवली. ५०-६० वर्षापूर्वी प्रकाशित झालेली, २५-३० रुपयांची ती छोटीशी पुस्तके म्हणजे लघुनिबंधांचे संग्रह, एक प्रवास वर्णन होते. प्रवास करणे आणि प्रवास वर्णने वाचणे बऱ्याच जणांना आवडतात. अनंत काणेकरांच्या १९४० च्या आसपास युरोप आणि सोविएत रशिया येथे केलेल्या प्रवासाचे वर्णन असलेले त्या पुस्तकाचे नाव आहे ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’. त्याबद्दल इथे लिहावे म्हणून हा प्रपंच. साहित्य संमेलनाबद्दल देखील लिहायचे आहेच पण नंतर कधीतरी.

त्यांनी हे पुस्तक रोजनिशी स्वरूपात लिहिले आहे. त्याला एक कारणदेखील आहे. त्यांचा प्रवास हा बोटीतून झाला. लक्षात घ्या दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास युरोप आणि रशियाचा बोटीने प्रवास करणे म्हणजे कित्येक दिवसांचा प्रवास. बोटीवरून केलेल्या प्रवासाचे वर्णन वाचून एक-दोन गोष्टींची आठवण मला झाली. मी देखील काही वर्षांपूर्वी लक्षद्वीप येथे जाण्यासाठी बोटीने ५-६ दिवस प्रवास केला होता. दिवस रात्र बोटीवर, वर आकाश, खाली पाणी यांची सोबत, त्यात वर बोट लागणे हे प्रकार, हे सर्व परत आठवले. तसेच विश्राम बेडेकर यांची सुप्रसिद्ध कादंबरी रणांगण याची देखील आठवण झाली. त्यात देखील साधारण त्याच काळाचा संदर्भ आहे, आणि सारे कथानक बोटीवरच घडते.

पुस्तकाला शं. वा. किर्लोस्कर यांची छोटीशी प्रस्तावना आहे, आणि लेखकाचे मनोगत देखील आहे. मनोगतामध्ये रोजनिशीच्या स्वरूपात हे प्रवास वर्णन का लिहिले आहे याची मीमांसा आहे. साधारण २०० पानी पुस्तकात, बराचसा भाग रशिया प्रवासाबद्दल आहे. सुरुवातीला मुंबई ते लंडन ह्या बोटीवरून केलेल्या प्रवासाचे वर्णन, भेटलेले वेगवेगळे लोक आपल्याला त्या काळात घेवून जाते. त्यांची Conte Verde नावाची इटालियन बोट होती.  वेगवेगळया जाती-धर्माचे, देशांचे प्रवासी यांचे बहारदार वर्णन आहे, तसेच, बोटीवरील इटालियन कर्मचारी आणि त्यांच्या मनावरील कम्युनिस्ट पगडा याचा आलेला अनुभव, आणि इटलीच्या ताब्यात असलेल्या मासावा बंदारात झालेला बोटीचा थांबा आपल्याला त्यावेळच्या जगाच्या इतिहासात घेवून जातो. त्यानंतर सुएझ कालव्यातून बोट जावून पोर्ट सैय्यद काही तासांसाठी थांबली, आणि तेवढ्यात कैरोची धावती भेटीचे वर्णन आहे. शेवटी व्हेनिस शहरात बोटीचा प्रवास संपला. आणि मग पुढे व्हेनिस ते लंडन ह्या  रेल्वे प्रवासाचे वर्णन आहे.

20160301_055905

लंडन वास्तव्या दरम्यान आलेले अनुभव आणि त्यांना दिसलेले त्यावेळचे लंडन हे वाचणे मनोरंजक आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी त्यांना Parliament Hill Road परिसरात दिसलेल्या street corner meetings बद्दल माहिती आहे. तेथील वक्त्यांना Tub Thumpers म्हणतात. त्याचा इतिहास येथे बघता येईल. एका कार्यक्रमात भोर संस्थानाचे, जमखींडी संस्थानाचे राजे भेटल्याचे, तसेच प्रसिद्ध लेखक मुल्कराज आनंद यांची भेट याचे संदर्भ आले आहेत. Hippodrome theater मध्ये Bernard Shaw चे Candida हे नाटक बघितल्याचे वर्णन आहे, त्यात Cavalcade फेम अभिनेत्री Diana Waynard चे काम आहे. अनंत काणेकर हे स्वतः नाटककार होते आणि त्यांची नाट्यमन्वंतर ही नाटक कंपनी होती. त्या दृष्टीने त्यांनी लंडन मधील Left Theater चे कॉम्रेड स्लेटर(Comrade Montagu Slater) यांना भेटले आणि त्यांची मुलाखत घेतली.

यानंतर लंडन वरून लेनिनग्राड(आताचे Saint Petersburg) असा एका रशियन बोटीवरून झालेला प्रवास, त्यावरील अनुभव याचे धमाल वर्णन येते. भाषेचा प्रश्न, कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव, जर्मनी मधील Kiel Canal मधून जाताना निर्माण झालेला तणाव याचे सगळे अनुभव एका वेगळ्या विश्वात घेवून जाते. रशिया कम्युनिस्ट देश असल्यामुळे, तेथील प्रत्येक घरात Red Corner किंवा Lenin Corner नावाचा भाग असतो तेथे, लेनिनचे चित्र किंवा पुतळा असतो, आणि लाल फडक्याची कमान असते, अशी माहिती मिळते. आणि त्या रशियन बोटीवरदेखील असा Red Corner होता. North Seas हा समुद्र Kiel Canal मधून पार करून बाल्टिक समुद्रात आल्यावर रात्री बोटीवरून दिसणाऱ्या White Nights चे रोमांचक वर्णन देखील येते. लेनिनग्राड मध्ये पोचल्यावर तेथील स्थलदर्शन, Alexei Tolstoy ने लिहिलेले Peter I हे नाटक Alexandrisky theater मध्ये पाहिल्याचे वर्णन मजेशीर आहे. पुढे मॉस्कोला रेल्वेने ते गेले. रशियन रेल्वे मध्ये hard class आणि soft class असे दोन वर्ग असतात ही माहिती मिळते. मॉस्को मध्ये देखील रंगभूमी, साहित्य यासंबधी असलेली स्थळे त्यांनी पहिली. रंगभूमीचे संग्रहालय Bakhrushin Museum पहिले त्याचे वर्णन येते(मला वाटते त्यांनी चुकून Pokrovsky Museum असे संबोधले आहे). रशियन लेखक Sholokov याच्या And Quiet Flows the Don कादंबरीवर आधारित असलेले संगीत नाटक त्यांनी Bolshoi Theater मध्ये पहिले. मॉस्को मधील, त्यावेळच्या(१९९३५ च्या आसपासची ) आधुनिक भूमिगत रेल्वेची देखील माहिती आली आहे. त्यावेळची साम्यवादी परिस्थिती, आणि अशी आधुनिक भूमिगत रेल्वेचे जग असा विरोधाभास पाहून लेखकाला ‘Your socialism is still underground’ या वाक्याची आठवण येते. मॉस्को आर्ट थिएटर मध्ये Checkov चे Cherry Orchard  हे नाटक, आणि त्यात Checkov पत्नीने(Madame Chekova) केलेले पाहायला मिळाले, असे नमूद केले आहे. त्यावेळेस अपघाताने त्यांची ओळख अमेरिकन चित्रपट अभिनेता Paul Robeson ची ओळख होते. Moskova-Volga canal चे बांधकाम ते तेथे असताना चालू होते, ते पाहायला मिळाले, आणि, त्यामुळे मॉस्को शहर हे पाच समुद्रांचे बंदर ठरणार होते. त्याकाळी रशियात रविवार हा सुट्टीचा दिवस नसे, तर, प्रत्येक पाच दिवसानंतर सहावा दिवस सुट्टीचा(Rest Day), असा प्रकार असे, तो त्यांना अनुभवायला मिळाला. The Theater of the Young Spectators या नाट्यगृहात The Days of the Turbins आणि The Pickwick Club ही नाटके पहिली. नुकतेच Michail V. Vodopyanov नावाच्या एका वैमानिकाने उत्तर ध्रुवावरून monoplane नेले होते. त्यानेच लिहिलेले The Dream ने नाटक, त्याच्या special effects सह लेखकाला पाहायला मिळाले.
Vakhtangov Theatre मध्ये Lev Slavin चे The Intervention हे नाटक पहिले आणि त्या अनुभवाचे वर्णन वाचायला मिळते. हे सर्व वाचल्यानंतर रशियन रंगभूमी आणि तिच्या इतिहासावरती एखादे चांगले पुस्तक मिळवायला पाहिजे. लेखकाने मॉस्को मध्ये आणखीन एक वेगळे संग्रहालय पहिले. ते म्हणजे Anti God Museum. ते Anti-Religious Museum असावे असे वाटते. त्या वेळेस रशियात परमेश्वर विरोधी, धर्म विरोधी चळवळ सुरु होती, त्याचे ते निदर्शक असावे. आत्ता काय स्थिती आहे याची मांहिती मिळत नाही. Palace of Soviets ह्या प्रस्तावित भव्य-दिव्य इमारतीचे पाया भरणीचे काम लेखकाने पाहिल्याचा उल्लेख आहे, पण ती कधीच पूर्ण झाली नाही.

रशियाच्या मुक्कामानंतर लेखक रेल्वेने जर्मनी आणि फ्रान्स मध्ये जातात, त्याचे थोडेफार वर्णन आले आहे. एक-दोन गोष्टी बद्दल सांगतो. त्यांना Paris मधील Pneumatic Letters नावाची मजेशीर गोष्ट समजली. पोस्टाच्या शाखा ह्या भूमिगत ट्यूबने जोडल्या गेल्या आहेत, ज्यातून हवेच्या दाबाने पत्र पाठवले जाते. पत्र तातडीने मिळण्यासाठीची ही व्यवस्था. ही व्यवस्था अर्थातच आता नाही, १९८४ मध्ये बंद झाली. दुसरी गोष्ट त्यांनी नमूद केली ती अशी की लेखक ज्या PEN International(PEN म्हणजे Poets, Essayists, Novelists ) संस्थेचे सभासद होते तिचे अधिवेशन भरले होते, त्याबद्दल माहिती आली आहे. आणि शेवटी, फ्रान्स मधून Jean Laborde नावाच्या बोटीने, कोलंबो पर्यंत येवून, पुढे भारतात, धनुष्यकोडी येथपर्यंत त्यांनी केलेल्या प्रवासाचे वर्णन येते.

भारत रशिया मैत्री, १९६०-७० च्या दशकात राजकपूरचे रशियात प्रसिद्ध असलेले चित्रपट, तेथील अजरामर साहित्य, झारची जुलमी राजवट, साम्यवादाचा उदय आणि भारतात त्याचा झालेला परिणाम, अमेरिका-रशिया शीत युद्ध(cold war), अंतराळसंशोधनात त्यांनी मारलेली भरारी, चेर्नोबील अणु दुर्घटना, यामुळे रशिया आपल्या थोडाफार ओळखीचा असतो, पण त्याच बरोबर भाषा माहीत नसल्यामुळे, आणि इतर गोष्टीमुळे बरेचसे गुढ असते. रशियाबद्दलचे प्रवास वर्णन मराठी मी तर पहिल्यांदा वाचले आणि तेही इतके जुने. अनंत काणेकर जेव्हा रशियाला गेले होते, त्याच्या वीसच वर्षे आधी तेथे क्रांती होवून, साम्यवादी सरकार आले, आणि तेवढ्या कालावधीत त्यांनी केलेली प्रगती, काणेकरांना दिसली. हे सर्व वाचताना आपल्याला रशियाच्या विविध अंगांची, इतिहासाची ओळख होते.

 

2 thoughts on “धुक्यातून लाल ताऱ्याकडे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s