गो नी दांडेकर: आशक मस्त फकीर

प्रसिद्ध साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे, त्यानिमित्ताने पुणे आकाशवाणीत एक कार्यक्रम झाला आणि माझ्या काही आठवणींना उजाळा मिळाला.

गो नी दांडेकर हे खरे तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. गड-किल्ले, इतिहास हा तर त्यांचा आवडीचा विषय होताच. त्यांनी केलेली भटकंती, आणि त्यावर त्यांनी लिहून ठेवलेले आजही आम्हा भटक्या लोकांना उपयुक्त आहे. त्यांनी थोडी थोडकी नव्हे तर ९७ पुस्तके लिहिली. त्यांची काही पुस्तके मी वाचली आहेत, आणि ती अतिशय खिळवून ठेवणारी होती. उदाहरणार्थ, पवनाकाठचा धोंडी, पडघवली, माचीवरला बुधा, कोणा एकाची भ्रमणगाथा, स्मरणगाथा, रानभुली, महाराष्ट्र दर्शन, तसेच किल्ल्यांवरील त्यांची कित्येक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. उदा. दुर्गभ्रमणगाथा, दहा दिवस दहा दुर्ग इत्यादी.  दुर्ग-साहित्य हा प्रकार त्यांनीच सुरु केला असे म्हटले जाते. महाराष्ट्र दर्शन हे पुस्तक तर मला वाटते महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाबद्दलचे अत्र्यांच्या गावगाडा नंतरचे महत्वाचे पुस्तक आहे.

20160224_051633

त्यांना अनेक छंद होते. नाणी गोळा करणे, इतिहासातील पुराणवस्तू गोळा करणे, छायाचित्रण, अत्तरे गोळा करणे इत्यादी. मध्ये केव्हातरी पुणे आकाशवाणीवर उष:प्रभा पागे यांनी घेतलेली त्यांची एक जुनी मुलाखत प्रसारित झाली होती. त्यातही ते त्यांच्या छंदांविषयी भरभरून बोलले होते. त्यांनी गोळा केलेल्या ह्या सर्व वस्तूंचे संग्रहालय आहे का काय ते शोधायाला पाहिजे. गड-किल्ले पाहणे, आणि ते इतरांना दाखवणे, त्या बद्दल बोलणे हे तर त्यांना खूप आवडे.

गेल्या वर्षी मी जेव्हा सिमला मनाली भागात गेलो होतो, तेव्हा, भाक्रा नांगल धरण आणि  तो परिसर वाटेत लागला, तेव्हा त्यांच्या त्या विषयावरील आम्ही भगीरथाचे पुत्र कादंबरीची आठवण झाली. पवन मावळातील तुंग तिकोना परिसरात फिरताना हटकून पवना नदीकाठच्या त्या धोंड्याची आठवण होते. वीणा देव आणि विजय देव हे त्यांच्या काही पुस्तकांचे अभिवाचन करतात. त्याच्या त्यांनी ध्वनीमुद्रिका देखील बनवल्या आहेत. त्याही ऐकायला मजा येते. कर्नाळ्याच्या परिसरात गेले की त्यांच्या जैत रे जैत पुस्तकाची आणि चित्रपटाची आठवण येतेच. त्या त्या भागातातील त्या त्या व्यक्तीरेखा त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांचे नाट्यरुपांतर देखील झाले आहे आणि ती नाटके देखील बरीच प्रसिद्ध झाली आहेत.

वीणा देव यांच्या स्मरणे गोनीदांची या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, ते पुण्यातून तळेगाव येथे राहायला आले. त्यावेळी गांधीवधाच्या धामधुमीनंतर त्यांनी तो निर्णय घेतला. त्यावेळचे तळेगाव, अतिशय निसर्गरम्यच असणार. मी जेव्हा २०-२५ वर्षापूर्वी तेथे जायचो, तेव्हाच ते ठिकाण छान वाटे.  तळेगाव येथून मावळातील किल्ले आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळ असल्यामुळे, त्यांच्या दुर्गभ्रमंतीच्या छंदाला अगदी ते सोयीचे होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, तळेगावात त्यांचे एखादे स्मारक व्हायला हवे. काही वर्षापासून गोनीदांच्या स्मरणार्थ दुर्ग साहित्य संमेलन भरते आहे, ते नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यांचा नावाची वेबसाईट आहे, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या काही कार्यक्रमांचे footage देखील आहे, ते सुद्धा उपलब्ध व्हयला हवे. कार्यक्रमात त्यांनी गाडगे महाराज यांच्या हुबेहूब आवाजात केलेल्या कीर्तनाचे दुर्मिळ रेकॉर्डिंग ऐकवले गेले.

पुणे आकाशवाणी मध्ये काल झालेल्या कार्यक्रमाचे शीर्षक होते, गो नी दांडेकर-आशक मस्त फकीर. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसेच होते असेच म्हणावे लागेल.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s