गांधारी

हा ब्लॉग महाभारतातील गांधारी बद्दल नाही, तर मी नुकात्याच वाचलेल्या ना धों महानोर यांच्या छोट्याश्या कादंबरीबद्दल आहे. काही दिवसापूर्वी असाच एका पुस्तक प्रदर्शनात गेलो असता हे पुस्तक माझ्या हाती लागले. ना धों महानोर आणि कादंबरी हे वाचून जरा चमकलो. त्यांनी कादंबरी देखील लिहिली आहे हे माहीत नव्हते. ते कवी आहेत, आणि त्यांच्या शेतीजीवनावरील तसेच निसर्ग कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचे काही ग्रामीण आणि स्त्री जीवनावरील कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

ही १९७३ मधील कादंबरीला मराठवाड्यातील, जो पूर्वी निजाम राजवटीखाली होता, एका गावाचा संदर्भ आहे. ह्या गावाचे नाव आहे गांधारी. कादंबरीला गांधारी असे शीर्षक का दिले याची उत्सुकता होती मला. सुरवातीलाच हे एक खेडे आहे असा त्रोटक संदर्भ येतो. इंटरनेटवर थोडी शोध शोध केल्यानंतर आपल्याला कळते की गांधारी नावाचे अंबड तालुक्यात, जालना जिल्ह्यात एक गाव आहे. त्याच नावाची नदी देखील आहे. तर ही कादंबरी त्या गावाची कहाणी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे कादंबरी आहे १९७३ मधील, पण काळ चितारला आहे १९४८ मधील आणि त्यानंतरचा काळ. भारत स्वतंत्र झाला, तसेच लगेच हैदराबादच्या निजाम राजवटीचा बिमोड करून तो भाग भारतात आला. त्या सुमारास गांधारी या खेड्यात काय उलथ पालथ होते याची ही कथा. आणि पहिल्याच परिच्छेदात मला तरी वाटते कादंबरीचा सारांश येतो. ते लिहितात:

“गांधारी. छोटीशी नगरी. महाभारतातील राणी गांधारीसारख्याच नशिबाची. राजयोगी. दुर्दैवी. निजामी फाशातून सुटताना नेमकं गांधारीचंच नशीब दगडाचं. निजामीतून सुटताना शेवटच्या दंगली लढ्यात कित्येक लढले. मुक्तीसेनेने जीवाचे रान केले. प्राण कुरवंडी झाले. स्वातंत्र्य मिळाले. फारच थोडी गावे दुर्दैवी. गांधारी सारखी. ज्यांच्या सगळ्या इभ्रती टांगल्या गेल्या. अगदी सगळ्यांनी पराकाष्ठा करूनही निजामीतील भोग, नंतरच्या काळात आलेल्या महाभागांनी घातलेले भोग. तिच्याच साम्राज्यातला विलास आणखी दुर्विलास डोळे असून पाहता येत नाही.””

Gandhari Na Dho Mahanor

मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु झाल्या नंतर, निजामाने त्याच्या राज्यातील प्रजेवर अतोनात अत्याचार करण्यास सुरुवात केली. हे गाव देखील त्यातून सुटले नाही. त्यातून ते निभावून जाते. बरेच गावकरी त्यांची शेतीवाडी, गाव सोडून दुसरी पोटापाण्यासाठी जातात. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हळूहळू परतात. आणि गावाच्या राजकारणात, समाजकारणात एक एक बदल होत जातात. त्याचा आलेख कादंबरीत येतो. काही दिवसात ग्रामपंचायत निवडणूक होते, कोणीतरी कोणालातरी हरवून सरपंच होतो. सोसायट्या स्थापन होतात, गैरकारभार सुरु होतो. सरकारी अधिकारी, आणि त्यांची खाबुगिरी सुरु होते, सामान्य जनतेची पिळवणूक होते. एकूणच समाजाला कीड लागते. गावातला भागवत नावाच्या सरळमार्गी शेतकरी कसा गावाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो त्याचे चित्रण येते. कादंबरीत साहजिकच निजामी राजवटीमुळे प्रभावित झालेली उर्दू मिश्रित मराठी, हिंदी दिसते.

‘सुरुवातीचा मजकूर’ नामक प्रस्तावनेत त्यांनी कादंबरीच्या लेखनाचा प्रवास सांगताना म्हटले की त्यांना भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी हे सांगितले आहे, आणि कारण असे लिहिले आहे की त्या कादंबरीशिवाय कोणीही रूपं आणि बांधणी मोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण ह्या कादंबरीत तर तसे काही विशेष त्याबाबतीत वेगळेपण नजरेस येत नाही. भागवत ही व्यक्तिरेखा म्हणजे स्वतः महानोरच असावेत असा कयास करता येतो. कारण त्याचे शेतीवरील प्रेम, सदानकदा शेतावर असणे, थोड्या वेगळ्या विचारांचा ही भागवत नावाची व्यक्तिरेखा आहे. कादंबरी एक आख्खे प्रकरण तमाशा, संगीत बारी, त्यातील एक नृत्यांगना, आणि भागवताच्या मित्राचे तिच्यावर आणि तिचे त्याच्यावर निर्माण झालेले प्रेम याबद्दल आहे. महानोर हे अजिंठ्याजवळचे पळसखेड गावचे. त्यांना अगदी लहानपणीच संगीत बारी, तमाशा जीवन जवळून पाहायला मिळाले आहे असे त्यांनी कुठेतरी नमूद करून ठेवले आहे. त्याच्या आणि ह्या प्रकरणाचा संबंध त्यामुळे जोडता येतो. कादंबरी मध्येच थांबली असे मला वाटून गेले, प्रमुख व्यक्तिरेखांचे पुढचे आयुष्य, जीवनक्रम असे जाते, गावात आणखीन काय बदल होत जातात, हे अजून चितारला आले असते. निशिकांत ठकार यांनी केलेल्या या पुस्तकाचे हिंदी भाषांतर खुपच प्रसिद्ध झाले आहे असे समजले-एका लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.  पण मराठीतले हे मूळ पुस्तक तितकेसे प्रसिद्ध झालेले दिसत नाहीत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s