अण्णा भाऊ साठे आणि रशिया

कित्येक वर्षापासून असलेली भारत रशिया मैत्री ही जरी काही राजकीय हेतुमुळे निर्माण झालेली एकेकाळची गरज होती. तसेच भारतातील साम्यवादी, कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक त्यावेळच्या सोविएत रशियाकडे आकृष्ट झालेले दिसतात. रशियात झालेली १९१७ मधील क्रांती, कामगारांचे आलेले राज्य, ह्या सर्व गोष्टी भारतातील पुढाऱ्यांना रशियाकडे खेचित होत्या. लेनिनने साकार केलेले मार्क्सचे तत्वज्ञान कसे असेल, तेथील नवीन संस्कृती कशी असेल हे पाहण्यास अनुभवण्यास बरीच मंडळी त्या दृष्टीने रशिया प्रवास करीत. महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे जे प्रसिद्ध साहित्यिक, क्रांतिकार, हे ही कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली आले होते आणि त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला होता, हा इतिहास आहेच. त्यांनी तर दुसऱ्या महायुद्धात सोविएत जनतेने केलेल्या पराक्रमामुळे भारावून जाऊन स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिला होता. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या रशियन भाषेतदेखील अनुवादित झाल्या होत्या. अण्णा भाऊ साठे यांनीही रशियाचा प्रवास केला होता. त्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तक देखील लिहिले होते(नाव-माझा रशियाचा प्रवास). मी काही दिवसांपूर्वी अनंत काणेकर यांच्या रशिया प्रवासावरील पुस्तकावर येथे लिहिले होते.

अण्णा भाऊ साठे १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारतभरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले अनुभव याविषयी जरा लिहावे म्हणून हा ब्लॉग-उद्योग.

ते दिल्लीहून पालम विमानतळावरून ‘चितोड की रानी’ नावाच्या विमानाने उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पोचले. त्यावेळी विमानांना नावे असत? आहे की नाही गमतीशीर माहिती? पुढे तेथून मॉस्कोला दुसऱ्या विमानाने गेले. मॉस्कोवरून लेनिनग्राडला रेल्वेने गेले. त्यांनी त्या रेल्वे प्रवासाबद्दल असे लिहिले आहे-‘एका कंपार्टमेंट मध्ये दोन पलंग, स्वच्छ गाद्या, उशा, चादरी, नळ, कंगवा, साबण, पावडर, रेडियो म्हणजे सारंच! शिवाय प्रवाश्यांची देखभाल करायला एक बाई होती….मला तो प्रवास कसासाच वाटला. मला बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली. ती गर्दी, तो कोलाहल, ती धावपळ…’ आणखीन एक गम्मत त्यांना दिसली. एक तरुण स्त्री गादीत खिडकीत बसली होती, तिच्या तान्ह्यासाठी एक छोटासा पाळणा होता. त्या बद्दल ते लिहितात-‘…कारण हाच बालनागरिक मोठेपणी आपल्या मातृभूमीसाठी शंभरदा मरणार याबद्दल सोविएत संघराज्याला खात्री होती’. काही वेळात म्हणे डब्यात रेल्वेचा एक गडी वेगवेगळया दारूच्या बाटल्या घेवून आला आणि रशियन भाषेत त्याबद्दल सांगू लागला, आणि काय हवे आहे ते विचारू लागला. असे जर भारततल्या रेल्वेत असते तर काय झाले असते असा विचार करून, आणि हसून त्यांनी त्याला वाटेला लावला!

लेनिनग्राड मध्ये त्यांना प्रोफेसर ततियाना म्हणून कोणी भेटल्या, ज्यांनी रशियन-मराठी शब्दकोश केला होता. आचार्य अत्रे यांनी साठेंकडे त्यांच्यासाठी एक पत्र दिले होते, जी त्यांनी त्या बाईना दिली. लेनिनग्राड मध्ये त्यांनी विंडसर राजवाडा, त्यातील लेनिनची खोली पहिली, १९४२ मध्ये युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे स्मारक पहिले. लेनिनग्राड मध्ये त्यांनी एक सिनेमा पहिला, ज्याचे वर्णन त्यांनी असे केले आहे, की तो 3-D सिनेमा असावा असे मला वाटते.

त्यांनी मॉस्को पाहिल्याचे जे वर्णन केले आहे त्या प्रकरणाचे शीर्षक आहे ‘लाल ताऱ्याखाली. मॉस्को मध्ये प्रसिद्ध रशियन लेखक गॉर्की याच्या नावाच्या राजमार्गावरून ते फिरले, त्याचे वर्णन येते. मॉस्को मध्ये मध्ये त्यांनी ठिकठिकाणी सिगरेटची राख टाकण्यास सोय आहे असे त्यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे, त्यावरून रशियन लोकात सिगरेटचे व्यसन किती होते/आहे ह्यास पुष्टी मिळते. रशियात कलाकारांना किती मान आहे ह्याचे त्यांना पदोपदी दर्शन झाले. काम आणि कला या दोघांवर रशियन जनता सारखेच प्रेम करते. त्यांनी बोल्शोविक नाट्यगृहात दगडाचे फुल नावाचा ओपेरा पहिला.

त्यानंतर ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले. स्टालिनग्राडवरून एक दिवसाचा विमान प्रवास करून जावे लागले. ते लिहितात, बाकू हे रशियातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे-मॉस्को, लेनिनग्राड, खार्कोव, आणि बाकू. त्यांनी पहिले की बाकू मध्ये संपन्नता आहे. अझरबैजानची हे मुस्लीम घटक संघराष्ट्र आहे, असे असून सुद्धा खनिज तेलाच्या समृद्धीमुळे, आणि तेथील लोकांच्या अपार कष्टामुळे, संपन्नता आहे, असे त्यांना आढळले. बाकूपासून जवळच एके ठिकाणी त्यांनी सामुदायिक शेती पहिली. रशियात त्यांना जीवनात कुठेही विसंगती आढळली नाही. खेडी, शहर यात काही फरक दिसला नाही. बऱ्याच ठिकाणी यंत्रांचा वापर दिसला, जसे की दोन रुबल्स टाकले की शरबत देणारे यंत्र त्यांनी त्यावेळी पहिले.

त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ते ताश्कंद येथे गेले, जी उझबेकीस्तानची राजधानी आहे.उझबेकीस्तान हे बरेचसे वाळवंटी प्रदेश आहे, तरी सुद्धा ऑक्टोबर क्रांती नंतर, त्यांनी झपाट्याने प्रगती केली. ताश्कंद मध्ये त्यांनी दिलाराम नावाचे एक नाटक पहिले असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर  ते दिल्लीस परतले.

अण्णा भाऊ साठे स्वतः कामगार वर्गातून आलेले, समाजवादी चळवळ जवळून पाहिलेले, त्यांना साहजिकच त्यावेळचा क्रांतीनंतरचा रशिया त्यांना मनोहारी वाटला, त्या पासून त्यांनी नक्कीच प्रेरणा घेतली असणार. पुस्तकात ते एके ठिकाणी म्हणतात, ‘मॉस्को पहावे संध्याकाळी, लेनिनग्राड पहावे दिवसा, स्टालिनग्राडचा मर्दपणा युद्धात, तर बाकूचे सौंदर्य रात्री’. हे सर्व अनुभवायला तेथे जायलाच हवे! तर एकूण मला हे पुस्तक वाचनाताना खुपच मजा आली, काही दिवसापूर्वीच अनंत कणेकरांचे धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे त्यांच्या १९३६ च्या आसपास केलेल्या रशिया प्रवासाचे वर्णन वाचले होते. साठे जवळ जवळ ३० वर्षानंतर तेथे गेले. त्यांना दिसलेली रशियाची प्रगती आणखीनच झालेली एकूण वर्णनावरून दिसते.

 

 

 

Advertisements

3 thoughts on “अण्णा भाऊ साठे आणि रशिया

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s