पूर्वज

मला गतकालाबद्दल आकर्षण आहे. मी सारखा इतिहासात डोकावत असतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कशी झाली, त्या गोष्टीचा इतिहास काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने माझी नजर शोधक तयार झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. माझा हा ब्लॉगदेखील बऱ्याचदा आठवणी, स्मरण, जुन्या काळातील गोष्टी याविषयांच्या अवती भोवती  असतो.  किल्ल्यावरील पदभ्रमण त्यातूनच सुरु झाले. आणि त्यातूनच मला गोहरबाई कर्नाटकी, अमीरबाई कर्नाटकी यांच्या बद्दल समजले, आणि त्याची परिणीती मी कन्नड मधील अमीरबाई यांचे चरित्र मराठीत आणले. गेल्या शे-दीडशे वर्षातील मराठी नाटक, साहित्य, त्याकाळातील लोकांचे जीवन याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी येथे ६५० पेक्षा जास्त संस्थाने होती. त्याचा आणि व्यक्तींचा सुटा अथवा  एकत्रित इतिहास कुठे उपलब्ध नाही. चिं वि जोशी यांच्या काही पुस्तकातून काही वर्णन येत राहते. असेच गतकालातील व्यक्तीबद्दलचे कथारूप ललित लेखन असलेले पुस्तक नुकतेच हाती लागले, त्याचे नाव पूर्वज, आणि लेखक आहेत वि ग कानिटकर.

ह्या छोट्याश्या कथासंग्रहात सात कथा आहेत. मराठी नाटकाचे जनक विष्णुदास भावे, सर्कसवाले विष्णुपंत छत्रे, साहित्यिक हरिभाऊ आपटे, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध नट गणपतराव जोशी, मिरजेचे संस्थानिक पंतप्रतिनिधी परशुरामभाऊ पटवर्धन, गायक भास्करराव बखले, रावसाहेब मंडलिक या सात व्यक्तींच्या जीवनातील काही विशिष्ट घटनांवर आधारित या कथा आहेत. यातील बऱ्याच जणांची चरित्रे, आत्मचरित्र आधी प्रसिद्ध झाली आहेत. ज्यांनी ती वाचली आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती असते. असे असले तरी या कथा वाचनीय ठरतात. पुस्तकाचे शीर्षक तर समर्पक आहे. पूर्वीच्या काळातील व्यक्तींच्याबद्दल माहिती, गोष्टी त्यात आहेत. ह्या सात कथांबद्दल थोडेसे.

सांगलीचे विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे जनक. पहिल्या वाहिल्या नाटकाच्या पडद्यामागची ही कहाणी ही कथा साग्रसंगीत सांगते. त्याकाळी असलेल्या प्रथेनुसार नाटकात काम करणाऱ्याला, तसेच त्यात स्त्री-वेश घेण्याराला समजणे वाळीत टाकत असत. त्यामुळे आलेले पेल्यातील वादळ कसे चतुराईने सांगलीच्या राजाने शमवले हे ही कथा मजेशीर पणे सांगते. ह्या कथेच्या नट्यात्मकतेमुळे ही छानशी एकांकिका होवू शकते असे मला वाटते.

सर्कसवाले विष्णुपंत छत्रे हे देखील सांगलीचेच. त्यांनीच भारतात सर्कस सर्वप्रथम सुरु केली. त्याबद्दल ही कथा आहे. छत्रे यांच्या अंगी असलेली धडाडी, धैर्य, आपल्या स्वप्नांचा पाठपुरवा करण्याची जिद्द ह्याचे दर्शन ह्या कथेमधून होते.

साहित्यिक हरिभाऊ आपटे यांच्या संबंधी कथा येते ती त्यांच्या मेव्हणे गोविंदराव कानिटकर यांनी केलेल्या रवींद्रनाथांच्या गीतांजली काव्यसंग्रहाच्या मराठी भाषांतराच्या संदर्भात. हरिभाऊना त्यांचे भाषांतर पसंत नव्हते. पण त्यांना ते सांगावे कसे हा पेच पडलेला. त्यातच त्यांनी दुसऱ्याने केलेल्या भाषांतराला प्रस्तावना लिहिलेली होती. गोविंदरावांना हे समजल्यावर त्यांचा पारा चढला. त्यातच त्यांच्या पत्नी काशीबाई ह्या हरिभाऊ आपटे विशेष स्नेह. त्यांची मधल्यामधे झालेली ससेहोलपट, ह्या सगळ्या नाट्यावर ही कथा आधारित आहे. काशीबाई कानिटकर ह्या मराठीतील आद्य स्त्री कादंबरीकार. त्यांचे सरोजिनी बाबर यांनी लिहिलेले चरित्र आहे, त्यात ह्याचे काही तपशील मिळतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.

प्रसिद्ध नट गणपतराव जोशी यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल ही गोष्ट आहे. मला तर ही वाचताना नटसम्राट नाटकाची आणि सिनेमाची आठवण होत होती. त्या दोन्हीत हा भाग नाही, पण एकूणच रंगभूमी वरील प्रसिद् नटाच्या शेवटच्या दिवसात त्याची मनोवस्था कशी झाली आहे, हे समजते.

मिरज संस्थानाचे पंतप्रतिनिधी परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या जीवनातील दुसरा विवाह, आणि त्याबाबतचे संधीसाधू लोकांचे राजकारण प्रसंग आला, त्याच्या ही रोचक कथा आहे. संस्थानिकांच्या स्वैराचाराबद्दल त्यात त्यांनी विस्तृत लिहिले आहे.

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या उमेदीच्या काळातील प्रसंगावर ही कथा आधारित आहे. वडिलांचा रोष पत्करून गायन शिकायला घरातून बडोद्यास पळून गेलेले. तेथून ते अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटक मंडळीत स्त्री-भूमिका करायला म्हणून मुंबईत आले. तेथे त्याचे नाटक पाहून आणि गाणे ऐकून, त्याच्या वडिलांच्या मतामध्ये परिवर्तन होते. हे सर्व ह्या कथेमध्ये आले आहे.

रावसाहेब मंडलिक हे समाजसुधारक होते, त्याबद्दल विशेष माहिती मला नव्हती. ती या कथेमुळे कळली. त्यांनी मुंबईत नेटिव्ह ओपिनियन(Native Opinion) नावाचे वर्तमान पत्र सुरु केले होते. त्यांच्यावर दुसऱ्या विवाहाचा दबाव येत होता, तो त्यांनी कसा दृढनिश्चयाने मोडून काढला या बद्दल समजते. त्यांच्या बद्दल थोडा शोध घेतला तेव्हा गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या भरारी या त्यांच्यावरच्या पुस्तकाचा शोध लागला.

या सर्व कथा जरी कथा म्हणून असल्या तरी त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे माहिती असलेल्या चरित्रावरून त्या बेतलेल्या आहेत, तसेच तपशीलात नाट्य आणण्यासाठी विपर्यस्त बदल केलेले नाहीत. कथा वाचताना जर इतिहास जर थोडाफार माहिती असेल तर संदर्भ समजायला सोपे जाते असे मला वाटते. मी वि ग कानिटकर यांच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला, तर त्यांचा ह्याच विषयावरील अजून एक कथा संग्रह आहे. त्याचे नाव आणखी पूर्वज. त्यातही गतकाळातील आणखी ७ व्यक्तींच्या संदर्भात कथारूप ललित लेखन आहे. प्रसिद्ध इतिहासकार वि का राजवाडे, तारा गाणारीण, दादोबा पांडुरंग, बापूजी कुलकर्णी, दुसरा बाजीराव, शारदा गद्रे आणि सातवे ह रा पांगारकर. यातील तर मला राजवाडे आणि बाजीराव सोडून इतरांबद्दल माहितीच नाही. पुस्तक मिळवून वाचायला हवे केव्हा तरी.

ताजा कलम: हा ब्लॉग लिहिल्यानंतर काही मह्निन्यातच मला दिवाण जरमानी दास यांचे संस्थानिकांवरील पुस्तक मिळाले, त्यावाबद्दलदेखील मी ब्लॉगवर येथे लिहिले आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s