पुण्यातील टेकड्या

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे  आहे. आपण पुणेकर याबाबतीत नक्कीच सुदैवी आहोत की पुण्याच्या चारही बाजूने टेकड्या आहेत, पुणे आणि आसपासच्या भागातून ३-४ नद्या वाहतात. खरे पहिले तर ह्या टेकड्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या आजूबाजूच आहेत. अर्थात बंगळूरूसारखे तलावांचे जाळे पुण्याला नाही. मी सह्याद्रीत भटकणारा माणूस, पुण्यातील टेकड्यांवर आपल्यासारखाच मी देखील जात असतो अधून मधून. आणि ह्या टेकड्यांची परिस्थिती सध्या तितकीशी चांगली नाही. त्याबद्दल लिहावे म्हणून हा ब्लॉग.

मला वाटते मी जर सर्वप्रथम कोठल्या पुण्यातील टेकडीवर  गेलो असेन तर ती, नाही पर्वती नाही, तर ती आहे दुर्गादेवी टेकडी. हो, पर्वती नाही, कारण बऱ्याच पुणेकरांची पहिली आणि आवडती टेकडी म्हणजे पर्वती. दुर्गादेवी टेकडी ही निगडी भागातील ही टेकडी. मला वाटते मी दहावीत असताना, आमच्या शाळेतर्फे तेथे वनीकरणाचा कार्यक्रम होता. तेव्हा सर्वप्रथम गेलो होतो. आणि तेथे अजूनही नियमितपणे जात असतो, तिचे हिरवेगार रूप पाहून प्रत्येक वेळेला आम्ही मुलांनी लावलेली झाडे आठवतात. टेकडीवरून बऱ्याचदा मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील जा-ये करण्याऱ्या गाड्या दिसतात. दुर्गादेवीची मंदिर तेथे आहे, तसेच पायथ्याला एक मनोरंजन केंद्र-अप्पू-घर आहे.

पर्वतीवर तर कित्येक वेळेला गेलो आहे. त्याबद्दल विशेष काही नाही. ती अशी टेकडी आहे जी आपल्याला पुण्यातून फिरताना कायम दिसत राहते. पेशवेकालीन मंदिर आहे, संग्रहालय आहे. पावसाळ्यात हिरवीगार, तर उन्हाळ्यात काळी ठिक्कर दिसते. बाहेरगावावरून पुण्यात आलेल्या पाहुण्यांना पर्वती पाहायची असते, इतकी तिची महती पसरली आहे. पण पर्वतीच्या बाजूला असलेली झोपडपट्टी तेथे नको असावी असे वाटत राहते.

तळजाई आणि वाघजाई ही टेकड्यांची जोडगोळी विस्तीर्ण, हिरवी वनराई असलेली आहे. काही वर्षापूर्वी वनविभागाने पर्वती पाचगाव वनउद्यान तेथे विकासीत केले आहे, त्यामुळे तेथे फिरायला छान वाटते. तेथे भरपूर मोर देखील आहेत. एक-दोन वर्षात पुणे महापालिकेने तेथे रस्ते, आणि इतर चांगली कामे केली आहेत.कोथरूड परिसरात असलेली वेताळ टेकडी(वेताळबाबा मंदिरामुळे नाव), तेथे असलेल्या पायवाटांमुळे सकाळी फिरणाऱ्या लोकात प्रसिद्ध आहे. तेथे जुनी सध्या वापरात नसलेली खाण देखील आहे, तिचा उपयोग प्रस्तरारोहणाच्या तंत्राचा सराव करण्यासाठी बरेच जण करतात.चतु:शृंगी टेकडी सुद्धा बरीच प्रसिद्ध आहे, ती देवीच्या मंदिरामुळे. तेथे रोपवे होणार आहे असे ऐकतो आहे. काही वर्षांपूर्वी चतु:शृंगी ते चांदणी चौक असा पिटुकला ट्रेक केला होता. तो हनुमान टेकडी, वेताळ टेकडी असे करत करत चांदणी चौकात जातो. पावसाळ्यात अथवा दिवाळीत करण्यासारखा छानसा ट्रेक आहे. वेताळ टेकडीवर Automotive Research Association of India(ARAI) चे मोठेसे कार्यालय आहे. हनुमान टेकडी तर फर्गुसन कॉलेजच्या मागेच आहे. तेथेही बरीच लोकं जात असतात. मी एकदा मुद्दाम तेथे गेलो होतो, तेव्हा काही लोकं पाण्याच्या बाटल्या घेवून आले होते आणि रोपांना, झाडांना पाणी टाकत होते. ते पाहून नक्कीच बरे वाटले. पुण्यात बऱ्याच संस्था आहेत ज्या टेकड्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास हातभार लावत असतात.

कात्रजपरिसरातल्या टेकड्या तर पुण्याची शान आहेत. कात्रजचा घाट, तेथील तळे, कात्रज ते सिंहगड हा ट्रेक मस्तच. महामार्गाने साताऱ्याच्या दिशेने जर पुण्यात येवू लागलो तर, कात्रज घाटातून पुण्याच्या असा काही नजरा दिसतो की त्याला तोड नाही. प्रत्येक वेळेला पुण्यातील concrete jungle वाढवलेले दिसते.  पुण्यात बाणेर भागातील टेकडी देखील विस्तीर्ण आहे, त्याच्या मागे असलेली पाषणची टेकडी, बिबवेबाडी भागात गुलटेकडी आहे, पण ती गुल झालेली आहे की काय कळत नाही, मी तरी अजून तेथे गेलो नाही. पण त्याच भागात आणखी एक टेकडी आहे, त्याच्यावर समारंभासाठी असणारे पार्टी हॉल आहे, तेथे गेलो होतो एकदा. पुण्यात अजून काही अश्या टेकड्या आहेत ज्या तितक्याशा माहीत नसलेल्या आहेत. हिंजवडीभागातील म्हातोबा टेकडी, येरवडा भागातील तारकेश्वर टेकडी, तसेच दिघी परिसरातील दोन टेकड्यांची जोडी. मी काही वर्षापूर्वी म्हातोबा टेकडीवर गेलो होतो. तेथे म्हातोबाची जत्रा आणि उत्सव जोरदार साजरा होतो. येरवड्यातील तारकेश्वर टेकडीवर देखील गेलो होतो, तेथेतर काही वर्षापर्यंत वाहतूक विभागाचे मोटार चालक चाचणी केंद्र होते. हडपसर भागात तुफान झोपडपट्टी असलेली राम टेकडी आहे, तेथे तर मी जाण्याचा धीरच करू शकलो नाहीये. खडकीभागातील रेंज हिल्स(Range Hills) ह्याला तसे का नाव पडले ते समजत नाही, कारण तेथे कुठलीही  टेकडीच नाही. वर म्हटल्याप्रमाणे, निगडी भागातील दुर्गादेवी टेकडीचा पलीकडे, देहूचा जवळ, भंडारा डोंगर आहे, तशी ती टेकडीच आहे. भंडारा डोंगर तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे.

तर अश्या ह्या पुण्यातल्या आणि आसपासच्या टेकड्या, पुण्याची शान असलेल्या. पावसाळ्यात तर त्यांचा नजरा आणखी खुलतो. विविध प्रकारची पक्षी, प्राणी सृष्टी, वनस्पतीसृष्टी(bio-diversity) तेथे नांदते आहे. पण ह्या टेकड्यांना गेल्या काही वर्षात दृष्ट लागली आहे. टेकड्यांवर प्रचंड प्रमाणात मानवी हस्तक्षेप, तसेच त्याच्या आसपास, अंगाखांद्यावरून बांधकामे होवून, दगडासाठी त्या बेफामपणे फोडून, त्यांचे लचके तोडले जात आहेत. ह्या टेकड्या म्हणजे पुण्याची प्राणवायूचे कारखाने आहेत. टेकड्यांना टेकड्याच राहु देत, तेथे जर मानवी हस्तक्षेप प्रमाणाबाहेर गेला तर अनर्थ होईल. नुकताच, म्हणजे, फेब्रुवारीमध्ये आपण World Heritage Week साजरा केला. ह्या टेकड्या पुण्याची वारसा स्थळेच आहेत, त्यांचे जतन केलेच पाहिजे. माझ्या घराच्या बागेत कांचनाचे झाड आहे, त्याच्या बिया मी गोळा केल्या आहेत, गेल्या १-२ वर्षामध्ये, त्या मी येत्या पावसाळ्यात ह्या टेकड्यांवर जाऊन विखुरणार आहे. तेवढाच छोटासा खारीचा वाटा. पुण्यातील ग्रीनहिल्स(GreeHills) या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संथेने पुण्यातील टेकड्यांच्या संवर्धनावर एक documentary बनवली आहे, ते येथे देऊन हा प्रपंच आता थांबवतो.

Advertisements

2 thoughts on “पुण्यातील टेकड्या

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s