बाजीराव मस्तानी सिनेमाच्या निमित्ताने

सध्या आपल्या इथे दूरचित्रवाणीवर वेगवेगळया वाहिन्यांमध्ये TRP साठी युद्ध(channel war) सुरु आहे असे दिसते. ज्या दिवशी सोनी वर द कपिल शर्मा शो नव्या स्वरूपात सुरु होणार होता, त्याच दिवशी, किंवा त्याच वेळेस, पूर्वी ज्या कलर्स वाहिनीवर द कपिल शर्मा शो असे, त्यांनी बहुचर्चित बाजीराव मस्तानी हा सिनेमा प्रसारित केला. काही महिन्यांपूर्वीच तो चित्रपटगृहातुन प्रदर्शित झालेला आणि त्याच्या भोवती निर्माण झालेले वादंग, चर्चा, पेल्यातील वादळ यामुळे तो गाजला. WhatsApp वरून देखील कधी गंभीर चर्चा, तर कधी टिंगल टवाळी स्वरूपात चर्चा, असे सगळे घडले होते. त्यावेळेस मी काही तो पाहू शकलो नव्हतो. म्हणून तो पहायावास बसलो. जेमतेम तासभर तो पाहू शकलो. मला तरी तो काही विशेष रुचला नाही. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटातून नेपथ्य विशेष असते. या चित्रपटात देखील ते तसे आहेच, यात काही वाद नाही. हॉलीवूडच्या तोडीचे ऐतिहासिक चित्रपट का इथे होवू शकत नाही हे कळत नाही. विषय तर जबरदस्त होताच, वेगवेगळे ऐतिहासिक घटनांचे पदर होते, पण तसा परिणाम काही साधू शकला नाही.

काही वर्षांपूर्वी ई टीव्ही मराठी वर श्रीमंत बाजीराव पेशवे ही बाजीरावावरील मालिका सुद्धा, नितीन देसाई यांच्या नेपथ्यामुळे गाजली होती. ती मालिका अधून मधून पहायचो, आणि तशी ती बरीच इतिहासाला धरून होती, आणि लोकांना ती रुचली देखील होती. प्रसिद्ध इतिहास संशोधक निनाद बेडेकर ह्यांनी तिला मार्गदर्शन केले होते. अंगद म्हसकर नावाचा कलाकार त्यात बाजीराव झाला होता. त्याही आधी स्मिता तळवलकर यांनी पेशवाई नावाची मालिका केली होती, तीही चांगली होती. ती अर्थात्त एकुणात पेशवाई या विषयावर होती. आणि त्याही आधी म्हणजे १९८६च्या सुमारास राऊ ही मालिका देखील, मृणाल कुलकर्णी, रविंद्र मंकणी आणि इतर कलाकार यांच्या मुळे चांगलीच गाजली होती.  या सिनेमाच्या निमित्ताने एक दोन चांगल्या गोष्टी झाल्या. प्रसिद्ध लेखक, समीक्षक द. ग. गोडसे यांचे मस्तानी मस्तानी हे जुने पुस्तक परत प्रसिद्ध करण्यात आले, ते पुस्तक बरेच प्रसिद्ध झाले. मीही ते विकत घेतले. हे पुस्तक बरेच अभ्यासपूर्ण, आणि अस्सल कागदपत्रांच्या आधारे लिहले आहे. त्याबद्दल कधीतरी परत लिहीन. मस्तानीचे वशंजही पुण्यात आले आणि त्यांच्या बद्दल लोकांना समजले. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील लोक नव्या उत्सुकतेने शनिवारवाड्याला आवर्जून भेट देवू लागले. तसेच महाराष्ट्रातील पैठणीला देखील चांगलीच मागणी निर्माण झाली आहे. हेही नसे थोडके! पुण्याजवळ शिरूर तालुक्यातील पाबळ येथील  मस्तानीची समाधी देखील अशीच गर्दी खेचत असावी. प्र. के. घाणेकरांच्या ‘सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या’ ह्या पुस्तकाचा हात धरून, मी १०-१२ वर्षांपूर्वीच तेथे मस्तानीची समाधी पाहायला गेलो होतो. त्यावेळीच तिची अवस्था वाईट होती. तेथे चार बुरुज असलेली एक वास्तू(गढी) आहे, दगडी बांधकाम असलेली मशीद आहे आणि समोरच एक समाधी सुद्धा दिसली, जिची अवस्था काही ठिक नव्हती. पाबळच्याच संजय घोडेकर यांचे मस्तानीवर एक चांगले पुस्तक नुकतेच आले आहे.

जरी आपल्याकडे ऐतिहासिक नाटकांची परंपरा असली तरी बाजीरावावरची नाटकं विशेष झालेलो दिसत नाही. एक शून्य बाजीराव म्हणून एक खानोलकरांचे नाटक आहे, पण त्याचा विषय वेगळा आहे.  प्रसिद्ध नाटककार शिरवाडकरांनी लिहिलेले दुसरा पेशवा हे त्याच्या वरील अजून एक नाटक. दुसरा पेशवा म्हणण्याचे कारण तो साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या काळातील दुसरा पेशवा. तसा तो मराठा साम्राज्याचा एकुणात सातवा/आठवा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळ तयार केले, त्यात पेशवा हे मुख्य पद, तो पंतप्रधान, प्रमुख. ह्यानेच शनिवारवाडा बांधला. शिवाजीच्या काळात रायगड ही राजधानी होती, नंतर ती सातारा येथे गेली, पण जसे जसे पेशव्यांचे स्थान वाढत गेले, पुणे आणि शनिवारवाडा हेच मराठी साम्राज्याचे सत्ताकेंद्र बनले.

परवाच बाजीरावाची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आणि आजच वर्तमानपत्रात वाचले की, या वर्षीच्या वसंत व्याख्यान मालेत देखील बाजीराव आणि निजाम संबंध या विषयावर भाषण झाले. असेही वाचण्यात आले की बाजीरावाची मध्यप्रदेशात रावेर येथे असलेल्या समाधीलाच जलसमाधी मिळणार आहे. नर्मदा नदीवरील धरणाच्या पाण्याचा फुगवटा रावेर पर्यंत पोहोचणार आहे. त्याबद्दल थिंकमहाराष्ट् पोर्टल वर एक लेख आलेला आहे. काहीतरी करून या समाधीचे जतन करायला हवे. उदा. नव्या जागी, ह्या फुगवट्याच्या पाण्याजवळ, जर त्याचे संग्रहालय, documentary, अशा स्वरुपात हा वारसा जपला पाहिजे. नाहीतर एवढा मोठा पराक्रमी योद्धा नामशेष होवून जाईल. शिवरायांनी स्वराज्य स्थापले, तर बाजीरावाने साम्राज्य स्थापले, असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते, त्या बाजीराव पेशव्याबद्दल एवढे तरी केलेच पाहिजे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s