गावाकडची अमेरिका

खेड्यांकडे चला हा महात्मा गांधीनी दिलेला संदेश धुडकावत कित्येक वर्षे आपण शहरात राहतो आहोत. त्यामुळे झाले असे की लोकात आता ग्रामीण जीवनाबद्दल, पर्यटनाच्या दृष्टीने म्हणा, अथवा स्मरणरंजनाच्या दृष्टीने म्हणा ते आकर्षण वाढत चालले आहे. शहराजवळ, अथवा लांब कुठे तरी फार्म हाउस घेण्याची संस्कृती त्यामुळेच वाढली, तसेच शहरात आजकाल होणारे ग्रामीण उत्सव जसे भीमथडी जत्रा, याला होणाऱ्या गर्दीचे कारण देखील हेच आहे. मीही त्यातलाच. पण शहरातून राहून सुद्धा, मला ग्रामीण जीवन जरा जवळूनच पाहता आले असे म्हणायला हरकत नाही, त्याचे कारण सह्याद्रीत, किल्ल्यांवर, दऱ्याखोऱ्यातून माझी होत असलेली भटकंती. लहानपणीदेखील मी ते जवळून अनुभवले आहे. मी अमेरिकेत राहत असे, काही वर्षे. तेथेदेखील शहरी भाग आणि इतर प्रेक्षणीय स्थळे जवळून पाहिले. तसेच अधून मधून पर्यटन असेल, किंवा सहज कुतूहल म्हणून तेथील ग्रामीण भागदेखील पाहता आला.

शाळेत असताना आपण वाचलेले की अमेरिकेतील शेती पुढारलेली आहे, यांत्रिकीकरण झाले आहे. शेतकऱ्यांकडे मोठमोठाली शेती असतात, आणि मका, भोपळा, गहू यांचे भरघोस उत्पादन ते घेत असतात. पण मी १-२  वर्षापूर्वी अमेरिकेबद्दल वेगळेच पुस्तक वाचले होते. मी इतक्यात व्यंकटेश माडगुळकर यांचे पांढरी मेंढरे हिरवी कुरणे हे पुस्तक वाचत होते, ज्यात त्यांनी ग्रामीण ऑस्ट्रेलियाचे वर्णन केले आहे, त्याची आठवण झाली. म्हटले चला ग्रामीण अमेरिकेवरील ह्या पुस्तकावर थोडे लिहुयात. गावाकडची अमेरिका हे पुस्तक डॉ. संजय चौबळ यांचे. चौबळ हे व्यवसायाने पशु वैद्यकीय क्षेत्रात. आणि अमेरिकेत शिकले आणि तेथेच कामही करताहेत. त्यांना आलले अनुभव यात त्यांनी मांडले आहेत. सहज अनुक्रमणिकेवर नजर टाकले की लक्षात येते की त्यांनी ग्रामीण अमेरिकेचे किती विषय मांडले आहेत. उदा. शेतीचा इतिहास, फार्मवरील जीवन, कंट्री म्युझीक, अमेरिकेतील ऋतुचक्र, आधुनिक शेती आणि पशुसंवर्धन, वन्यप्राणी जीवन, ग्रामीण अमेरिकेच्या समस्या इत्यादी.

अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाचे मुख्य वैशिष्ट्य तेथील अफाट जमीन, निसर्ग, आणि तेथील ऋतूवैविध्य. त्यामुळे प्रचंड वैविध्य ग्रामीण भागात दिसते. त्यातच परत मूलनिवासी आणि त्यांचे जग, हे आणखीन वेगळेच.निसर्ग संपदेच्या दृष्टीने पहिले असता, त्यांनी जपून ठेवलेले तेथील national parks तर प्रसिद्धच आहेत. तेथील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती, जवळ जवळ सर्व कामे यंत्राद्वारे, तसेच शेळ्या मेंढ्यासाठी हजारो एकर चरण्यासाठी कुरणे, तेथील जर्सी जातीची दुध दुभती जनावरे, पाहून तोंडात बोट घालावेसे वाटते. ग्रामीण संस्कृती अजूनही दिसत राहते. दुसरे असे की तेथे जुन्या गोष्टी छान पद्धतीने जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. मी कॅलिफोर्निया मध्ये असताना एकदा घोस्ट टाऊन ट्रेल पाहायला गेलो होतो. त्या ट्रेल मध्ये तर मला ग्रामीण भागातून फिरावे लागले, आणि ती कशी असतात हे पाहता आले. कॅलिफोर्निया मध्येच Napa Valley नावाचा भाग जेथे द्राक्ष मळे आहेत तसेच वाईनचे कारखाने आहेत, तेथे गेलो होतो, ते सर्व आखीव रेखीव शेती पाहून गंमत वाटली होती. ऑरेंज काउंटी(Orange County) मध्ये असताना शहराच्या आसपास असलेला ग्रामीण भाग, तसेच तेथील flea market मध्ये दिसणारे ग्रामीण जीवन हे देखील पाहता आले. एके वर्षी तर मी सहज उत्सुकतेने अमेरिकेत एक पंचांग(almanac) घेतले जे शेतकऱ्यासाठी बनवले गेले आहे. उद्देश असा की काय बाबा शेतकऱ्यांसाठी माहिती यात असते, काय विषय असतात, हे जाऊन घेणे हा होता.

अमेरिकेत ८२% टक्के लोक शहरात राहतात, तर १८% टक्के जनता ग्रामीण भागात, छोट्या छोट्या गावातून राहतात. मिडवेस्ट(mid west) मधील राज्यांत जास्त ग्रामीण जनता आहे असे दिसते. पण जरी ग्रामीण भाग असला तरी, मागासलेला, अशिक्षित, पिडीत असे ते लोक नसतात, सर्वसाधारण समृद्धी त्यांच्या कडे असते. मोठमोठाली farms, ranches, barns त्यांच्याकडे असतात, गुरंढोरं असतात. यंत्र असतात, मोटर गाड्या असतात, जीन्स, बेसबॉल्सच्या टोप्या घालून त्यांचे काम चालू असते. अमेरिकेत लोकसंख्या कमी, त्यामुळे मजूर, कामगार जास्त मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचा स्वभाव स्वावलंबी असतो, ग्रामीण भागात तो आणखीनच जास्त होतो. ग्रामीण भागातील लोक तंबाखू वैगैरे सर्रास खातात, हेही निरीक्षण लेखक नोंदवतो. जंगली भागातील ग्रामीण जनता, शिकार देखील करते, ते काही प्राण्यांची शिकार करायला तेथे मान्यता आहे. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांची धार्मिकता, प्रसंगी परंपरागत कट्टरपणा, देवभोळेपणा ह्याचे देखील निरीक्षण नोंदवले आहे. Thanksgiving, Halloween सारखे सण देखील याच ग्रामीण संस्कृतीमधूनच आले आहेत. अमेरिकेतील माझ्या माहितीतील एक जण alpaca नावाच्या प्राण्यांचा फार्म आहे, जसे आपल्याकडे इमूपालन लोकं आजकाल करतात.हा उंट सदृश्य प्राणी आहे, जे लोकरीसाठी प्रसिद्ध आहे.

ग्रामीण अमेरिकेतील लोकसंस्कृती, लोककला याचाही जरा लेखकाने आढावा घेतला असता तर बहार आली असती. अमेरिकेतील जनता ही प्रामुख्याने युरोपियन वंशीय. त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशातील संस्कृती ३००-४०० वर्षांपूर्वी जी अमेरिकेत आणली ती सर्व लोकसंस्कृतीच होती. त्यांची गाणी, नृत्यप्रकार, गावठी खेळाचे प्रकार, सामाजिक उतरंड कशी असते, त्याचा तेथे कसा परिणाम दिसतो हे सर्व देखील समजून घेता आले असते. उदाहरणार्थ, मी पेनसिल्व्हेनियाचा ग्रामीण भागात Amish लोकं बघितले होते. त्यांची एक स्वतःची परंपरागत संस्कृती, पेहराव आहे, ती त्यांनी अजून जपून ठेवली आहे. ग्रामीण अमेरिकेतील संगीत(country music) याबद्दल त्यांनी एक प्रकरण लिहिले आहे ते नक्कीच रोचक आहे. काही दिवसांपूर्वी मी Jazz Music बद्दल एक कार्यक्रम पहिला होता त्याची आठवण झाली.  ग्रामीण भागातील लोकांचे प्राण्यांशी असलेले नाते हे देखील रोचक आहे. अमेरिकेतील लोकसंस्कृतीत अस्वल या विषयावर अरुण प्रभुणे यांचे एक पुस्तक मी वाचले होते, ते अर्थात मूलनिवासी(native Americans) लोकात असलेल्या प्रथांबद्दल जास्त होते. वन्यप्राण्यांच्या संदर्भातील प्रकरणात मूलनिवासीबद्दल लिहिले आहे. मध्ये The Revenant सिनेमा आला होता, त्यात त्यांच्या जीवनाचे प्रभावी चित्रण आले होते. त्यांनी तसेच अमेरिकेतील काही मासिक जी लोकांच्या गेल्या जमान्यातला आठवणीयाबद्दल आहेत, जसे, Reminisce Magazine त्यात बऱ्याचदा ह्या ग्रामीण जीवनाबद्दलच लोकांनी लिहिलेले असते.

अमेरिकेच्या शहरी झगमगाटाच्या पलीकडेही ग्रामीण(country side) असे जग आहे, जे शेती, पशु पालन अश्या पारंपारिक व्यवसायावर गुजराण करतात. त्यांची म्हणून स्वत:ची संस्कृती आहे, तसेच त्यांचे स्वतःचे असे प्रश्न देखील आहेत. प्रत्येक राज्यागणिक, प्रांतागणिक त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. हे सगळे वाचताना, त्यावाद्दल अधिक जाणून घ्यावे तसेच पुढच्या भेटीच्या वेळेस आणखी काही पैलू, आणि आणखी काही वेगळे अनुभव घ्यावे असते वाटत राहते.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s