दोड्डाटा

गेल्या काही वर्षापासून सुदर्शन रंगमंच नावाचे प्रायोगिक नाटकांसाठी, इतर कलाप्रकारातील प्रयोगांसाठी पुण्यातील संस्था छान काम करते आहे. त्याच प्रकारची अजून एक संस्था म्हणजे आसक्त कलामंच. त्यांच्या ‘रिंगण’ ह्या अभिनव संकल्पनेतून त्यांनी कादंबरी अभिवचन, नाटकाचे अभिवाचन यासारखे उपक्रम राबवले आहेत. काल त्यांनी कर्नाटकातील दोड्डाटा ह्या लोकनाट्य प्रकारावर प्रकाश गरुड यांनी केलेल्या संशोधनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम सादर केला. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो,  त्याबद्दल थोडेसे. वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून मला वाटले की दोड्डाटाचाच प्रयोग होणार आहे. कारण मी पूर्वी यक्षगान सारखे प्रयोग कन्नड संघाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुण्यात पहिले आहेत. पण तेथे गेल्यावर समजले की प्रकाश गरुड यांच्या संशोधनावर कार्यक्रम आहे.

मला महाराष्ट्र आणि कर्नाटकतील भाषेचे अनुबंध, कलेतील अनुबंध, तसेच एकूणच संस्कृतीमधील अनुबंध याबद्दल आस्था आहे. मी माझ्या ब्लॉग वर त्याबद्दल बरेच लिहिले आहे. रहमत तरीकेरी यांनी लिहिलेले अमीरबाई कर्नाटकी या गतकाळातील गायिकेचे कन्नडमधील चरित्र मी मराठीत आणले. वि भा देशपांडे, नाडकर्णी या नाट्य-अभ्यासकांनी नाट्य-क्षेत्रामधील या देवाणघेवाणीबद्दल बरेच लिहिले आहे. मी स्वतः काही कन्नड नाटकं कर्नाटकात पहिली आहेत. दोड्डाटा(Doddata) याचा शब्दश: अर्थ आहे मोठा खेळ. म्हणजेच छोटा खेळ असला पाहिजे आणि तो आहे, त्याला म्हणतात सण्णाटा(Sannata). तसेच बयलाटा, म्हणजे उघड्यावरील खेळ(outdoor performance). दोड्डाटाला आणखी एक प्रती शव्द आहे तो म्हणजे हिरेआटा. हिरे म्हणजे थोरला. आणखी एक कलाप्रकार म्हणजे कृष्ण पारिजात, जो प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

प्रकाश गरुड हे गरुड सदाशिवराव यांचे नातू आहेत. गरुड सदाशिवराव हे सुरुवातीच्या काळातील कन्नड नाट्यक्षेत्रातील, म्हणजे कंपनी थिएटर काळातील एक मोठे नाव. त्यामुळे नाट्यकलेचा वारसा त्यांना मिळाला. प्रकाश गरुड आणि त्यांची पत्नी रजनी यांनी कन्नड नाट्यक्षेत्रात बरेच काम केले आहे. धारवाड मध्ये कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाशी संबंधित संस्था ते चालवतात. त्यांना IFA(India Foundation for Arts) कडून दोड्डाटा वर संशोधन करायला त्यांना मिळाले. ह्या लोककलाप्रकारांच्या  इतिहासावर आधी बरेच काम झाले आहे. गेल्या २०० वर्षात दोड्डाटा हा कलाप्रकार उगम पावला. प्रकाश गरुड यांना रस होता तो आता काय परिस्थिती आहे हे पाहण्यात, तसेच त्यांचा विकास का खुंटला आहे हे जाणण्यात. त्यात त्यांनी उत्तर कर्नाटकातील विविध भागात जाऊन त्यांनी, सध्या हयात असलेल्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे त्यांचे काही कार्यक्रम रेकॉर्ड केले. ते त्यांनी प्रेक्षकांना कार्यक्रमादरम्यान दाखवले. त्यांना दिसले असे की दोड्डाटा असो, किंवा इतर कलाप्रकार असोत, त्यांना आजच्या युगात उतरती कळा लागली आहे. यक्षगान हा कलाप्रकार जसा शिवराम कारंत यांच्या प्रयत्नांमुळे जिवंत राहिला, तसे येथे होत असतना दिसत नाही. ह्या लोककला प्रकारातील कलाकार अशिक्षित, किवा खालच्या वर्गातून आलेले असत. आपली शेतीसारखी आणि इतर काम करता करता थोडे फार ही कला शिकून, ते ही सादर करत. पुढची पिढी तयार करण्याचे प्रयत्न खुपच तोकडे आहेत असे दिसले.

त्यांनी दोड्डाटा आणि सण्णाटा यातील फरक देखील स्पष्ट केला. वापरले जाणारे संगीत, वेशभूषा, यात तो फरक आहे. भक्ती पंथांच्या(जसे कि वैष्णव, शैव, लिंगायत) प्रभावामुळे सादर होणारे विषय कसे आले याबद्दल त्यांनी विवेचन केले. ते म्हणाले की स्वातंत्र्यापूर्वी उत्तर कर्नाटकात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची(जसे की पेशवे आणि त्यांचे सरदार, त्यानंतरचे संस्थानिक) होती. त्यांनी ह्या कलेला विशेष उत्तेजन दिले नाही. थोडाफार आश्रय मिळायचा तो गावातील जमीनदार लोकांकडून. आता कुळे आणि जमिनदारी नष्ट झाली असल्यामुळे तोही आश्रय खुंटीत झाला. तसेच त्यांनी असेही एक निरीक्षण नोंदवले की आधुनिक काळातील ज्या नाटकांनी(उदा. हयवदन, जोकुरस्वामी इत्यादी) लोककलेचे फॉर्म वापरले, ते मुख्यत: यक्षगानाच्या स्वरूपाचे होते. त्यामुळे देखील दोड्डाटा आणि सण्णाटा या लोककलेचे मुख्य प्रवाहात येणे म्हणावे तसे झाले नाही.

त्यांचे सादरीकरण इंग्रजी मध्ये होते. शेवटी अजित जोशी यांनी त्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रामायणापेक्षा महाभारतावर ह्या लोकनाट्यांचे विषय का बेतले असतात हे विषद केले. प्रकाश गरुड यांनी सादर केलेला विषय महत्वाचा होता, संशोधन आणि दस्तऐवजीकरण देखील महत्वाचे आहे, पण ते म्हणावे तेवेढे प्रभावी पणे प्रेक्षकांपर्यंत पोहचले नाहे असे जाणवत राहिले. भाषेची अडचण असावी असे वाटले. रजनी गरुड यांना तर त्यांचे अनुभव कथन करायला अवकाश मिळालाच नाही. काही वर्षांपूर्वी बेंगळुरू येथे गेलो असता, जानपदा लोका(Janpada Loka) नावाचे, कर्नाटका जानपदा परिषत्तु ह्या संस्थेचे, लोककला संग्रहालय पाहायला गेलो होतो, तेथे विविध कर्नाटकातील विविध लोककलाप्रकार, त्यांचा इतिहास, हे पहायला आणि अनुभवायला मिळाले होते, त्याची ह्या निमित्ताने आठवण झाली. कर्नाटकात साजत होणारा मैसुरू दसरा महोत्सवात विविध जिल्ह्यांची संस्कृती दाखवणारी जम्बो सवारी(Jumbo Savari) नावाची मिरवणूक असते. त्यात बऱ्याचदा दोड्डाटा आणि सण्णाटा आणि इतर कलाप्रकारांचे सादरीकरण असते. आशा एवढीच आहे, ते कलाप्रकार फक्त संग्रहालय आणि अश्या मिरवणुकीतुनच फक्त दिसू नयेत!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s