पत्रांचे जग

पत्रांचे जग? म्हणजे काय, असे तुम्ही विचाराल! अहो, पत्र, म्हणजे letters, आणि आजच्या काळातील ईमेल. पूर्वीच्या काळी(म्हणजे अगदी फार पूर्वी नाही काय, गेल्या १५-२० वर्षांपर्यंत) लोकं एकमेकांशी, आप्त-स्वकीयांना पत्र पाठवून संवाद साधत असत. पोस्टाची कार्डे, चिठ्या, निळ्या रंगाची आंतर्देशीय पत्रे असा तो होत असे. मीही असा पत्र-व्यवहार केला आहे(हो, आता नाही, काही अपवाद सोडल्यास. कारण त्याची जागा ईमेल आणि इतर माध्यमांनी घेतली आहे). आणि ती अजून माझ्या जवळ आहेत. माझ्या वडिलांची त्यांना आलेली ४०-५० वर्षांपूर्वीची पत्र देखील आहेत. बऱ्याच घरांमध्ये पूर्वी आलेली पत्र ठेवायला एक तारेचा आकडा असे. ती आणि त्यात असलेली पत्र देखील माझ्याकडे अजून आहेत. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे मी नुकतेच पुस्तक वाचले. त्याचे नाव ‘सर्वमंगल क्षिप्रा बद्दल’. तो एक पत्रसंग्रह आहे. प्रसिद्ध पत्रसंग्राहक, संपादक आणि प्रकाशक हरिभाऊ मोटे यांचा तो पत्रसंग्रह आहे. ‘विश्रब्ध शारदा’ हा त्यांचा त्यांनी जमवलेल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे, आणि आता तो दुर्मिळही आहे.

WP_20160602_19_52_28_Pro

पत्रसंग्रह हा साहित्य प्रकार आत्मचरित्रांसाखाच गतकाळाकडे पाहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मी काही बरीच अशी पत्र संग्रह वाचले नाहीत. पण विश्रब्ध शारदा(तिसरा खंड जो कला या विषयावर आहे; पहिला समाज आणि साहित्य यावर आहे; तिसरा मला मिळाला नाही, जो महाराष्ट्रातील रंगभूमी या विषयावर आहे), जी ए कुलकर्णी यांची पत्रे(चारही खंड, आणि हे विविध खंड वेगवेगळया व्यक्तीना लिहिलेली पत्रांचे संकलन आहे), नरहर कुरुंदकरांची पत्रे इत्यादी वाचली/चाळली आहेत. इंग्रजीत देखील काही पत्रसंग्रह बरीच प्रसिद्ध आहेत, ती अजून मी वाचली नाहीत. जशी हेन्री मिलर, जॉर्ज ऑरवेल, पी. जी. वुडहाऊस सारख्यांची. मराठीत देखील अजून बरीच अशी पत्रांची संग्रहे आहेत, जसे सुनिता देशपांडे, पु. ल. देशपांडे, ग्रेस, ना. धों. महानोर, लोकहितवादी, ह मो मराठे यांची आणि अजून बरीच. जी ए कुलकर्णी यांचा पत्र व्यवहार तर प्रचंड होता, आणि त्यातून त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजतात. ही सर्व पत्रसंग्रहे समृद्ध करणारी असतात. भूतकाळात डोकावणारी, त्यातून शिकवणारी, तसेच भविष्याची चाहूल देणारी, गतकालाबद्दलचे छोटे मोठे संदर्भ पुरवणारी, दोन व्यक्तींमधील स्नेहाचे, वाद-विवादाचे दर्शन त्यातून देणारी, अशी ही पत्रे असतात.

माझ्या कॉलेजच्या दिवसात माझ्या परगावी राहणाऱ्या एक-दोन मावसभावांबरोबर माझा बराच स्नेह जमला होता. त्यांच्या बरोवर मी पत्र व्यवहार करायचो. ती देखील आहेत माझ्याकडे. तसेच माझ्या लग्नापूर्वी नियोजित पत्नीला लिहिलेली प्रेमपत्रे, मी अमेरिकेला गेल्यानंतर तीला लिहिलेली, तसेच आई वडिलांना लिहिलेली पत्रेही अजून आहेत माझ्याकडे. तेथून भारतात पत्र पाठवण्याच्या वेळी, अजूनही ते अमेरिकेतल्या पोस्ट ऑफिस मधील प्रसंग आठवतात. काही म्हणा ती पत्रांची जादू वेगळीच होती. मी काही भावनाविवश होऊन हे सारे लिहीत नाहीये, कारण जग बदलते आहे, बदलत होते, आणि पुढेही बदलणार आहे. ह्या पात्रांची जागा आता ईमेलने घेतली आहे, इतरही माध्यमे आहेतच. त्यामुळे पूर्वीची पिढी जशी पोस्टमनची पात्रांसाठी वाट पाहत, तसे, आता ईमेलची, प्रत्युत्तराची वाट पाहतो आपण, नाही का?

काही वर्षांपूर्वी मी पोस्टात गेलो होतो. एका कोपऱ्यावर आंतर्देशीय, पोस्ट कार्डे, पाकिटे विकणारे एक टेबल होते. मी त्यातील काही घेतली, आणि ती मी जपून ठेवली आहेत. पोस्टाबद्दल बोलतोय तर, जाताजाता तिच्या इतिहासाबद्दल एक गोष्ट सांगतो. प्रसिद्ध लेख रस्किन बॉंड याचे मध्ये एक पुस्तक वाचले होते त्यात ब्रिटीशांनी भारतात जेव्हा टपाल सेवा सुरु केली, तेव्हा पत्रे एका ठिकाणावरून दुसरीकडे पळत पळत पोहचवणारे लोकं(mail runner) नेमले होते, अशी गोष्ट नमूद केली आहे. कालौघात हे सर्व संपणार आहे, त्याची माझी आठवण म्हणून ती मी ठेवली आहेत! या जगात ईमेल येऊन देखील आता ४०हून अधिक वर्षे झाली आहेत. प्रसिद्ध, तसेच थोरा-मोठ्या लोकांचे ईमेलरूपी पत्रव्यवहार संग्रहरूपी यायला हरकत नाही, कारण जुन्या काळच्या पत्र-व्यवहाराने आता ईमेलरूपी पत्रव्यवहाराने घेतली आहे. मला तरी वाटते हे अर्ध सत्य आहे. बहुतांशी व्यावसायिक पत्र-व्यवहार हा ईमेलने होतो, हे नक्कीच खरे आहे. पण जो दोन व्यक्तींमधला भाव-भावनांचा, स्नेहाचा देवाणघेवाणरूपी व्यवहार होता, तो ईमेलद्वारे खुपच कमी वेळेला होत असावा असे म्हणायला जागा आहे, कारण तो व्हायला आता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, सारखी माध्यमे आहेत. त्यामुळे हे संचित आता लघुरूपी होत चालले आहे, तसेच काळाच्या ओघात टिकाऊ नाही, कारण सर्वसाधारणपणे आपण काही आपले संभाषण रेकॉर्ड करत नाही. अशा तत्काळ नष्ट होत चाललेल्या स्नेहाचा, भाव-भावनांच्या होऊ शकणाऱ्या संचिताचे कसे काय जतन करायचे हा प्रश्नच आहे.

Advertisements

2 thoughts on “पत्रांचे जग

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s