पठारेंची स्वगते

रंगनाथ पठारे. मराठीतील अजून एक महत्वाचे लेखक. तेही शाम मनोहरांसारखे विज्ञानाचे प्राध्यापक. त्यांच्याबद्दल मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या ताम्रपट या महाकादंबरीच्या निमित्ताने ऐकले, वाचले होते. पण मी अशा महाकादंबरी बाबत जरा जपून असतो. त्यामुळे मी विशेष लक्ष देवू शकलो नाही. काही दिवसांपूर्वी मराठीतील ‘ऐसी अक्षरे‘ या पोर्टलवर त्यांचा एक विशेषांक वाचनात आला, जो नव्वदोत्तरी फिक्शनच्या संदर्भात होता. त्यात पठारेंच्या काही पुस्तकांचा उल्लेख होता. बुकगंगा वर त्यांची पुस्तके पाहिली, चाळली. त्यातील एक नामुष्कीची स्वगते, मी ते लगेच मागवले, त्याच बरोबर त्यांचे चोषक फलोद्यान, तसेच प्रत्यय आणि व्यत्यय हे देखील मागवले. त्यांच्या पुस्तकांची शीर्षके देखील वेगळीच असतात. स्वगते वाचून काढले, आणि आता त्याबद्दल लिहायला बसलो आहे.

ही कादंबरी आहे का, तर नाही. कथा संग्रह तर बिलकुल नाही. शीर्षकावरून आपण असा अंदाज करतो की हे आत्मचरित्र किंवा आत्मचरित्रपर असावे. तसेही नाही. तर प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र असे स्वगत आहे. इंग्रजीमध्ये त्याला stream of consciousness in narration(संज्ञा प्रवाह) असे म्हणतात. त्याला आगा पिछा नाही. नामुष्की का आणि कसली आहे? काही कळत नाही. नामुष्की म्हणजे असहायता, असे जर म्हटले तर थोडासा संदर्भ लागतो. स्वगतं ही थोडीफार परिस्थितीसमोर असहायता मान्य करणारी आहेत. वर्तमानाबद्दल मनाची भडभड आहे.

पुस्तकाच्या सुरवातीलाच त्यांचे निवेदन आहे. त्यात वाचकाला सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांना बहुतेक सगळे लिहिल्यानंतर वाचकांना ते दमवणारे, थकवणारे वाटेल असे लक्षात आल्यामुळे त्यांनी तसा इशारा दिला आहे. अशी लेखकाची कबुली कधी कुठे पाहण्यात आली नव्हती. जसे जसे आपण वाचत जातो, तसे तसे त्या इशाऱ्याचा अर्थ समजू लागतो. मोठ-मोठी वाक्ये, स्वगताचा फॉर्म असल्यामुळे मन मानेल तसे भरटकणे. संगणकशास्त्रात memory dump अशी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ तो घेताना संगणकाची स्थिती काय होती, ती नोंदवणे. प्रत्येक प्रकरण तसेच memory dump आहे असे वाटते. चिकाटीने पुस्तक वाचावे लागते. असेही वाटत राहते, की काय आपण वाचतो आहे. निवेदनाच्या पठारे इतक्या विषयांना, घटनांना स्पर्श करत जातात त्याची कमाल वाटते. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे एका विषयावरून दुसरीकडे उडी, कोलांटी उडी, लांब उडी असे सर्व दिसते!

पुस्तक १९९९ चे आहे. जवळ-जवळ दोन दशकं झाली. त्यावेळच्या काळाचे, राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांचे संदर्भ येतात. १९९१ नंतर भारतात मुक्त अर्थव्यवस्था, आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली. त्याबद्दल त्यांनी अगदी खुमासदार पद्धतीने लिहिले आहे. पुस्तकात १२ प्रकरणं आहेत. जवळ जवळ प्रत्येकात स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक व्यवहारासंबंधी आले आहे. एका प्रकरणात तर त्यांनी कमाल केली आहे. तांत्रिक संप्रदायात, अघोरी संप्रदायात फार पूर्वी प्रचलित असलेल्या पंचमकारयुक्त अशी कंचुकी प्रथेशी साधर्म्य असणारी घटना त्यांनी वर्णिली आहे, आणि तीही ‘स्त्री मुक्ती’ नावाच्या प्रकरणात. अशी प्रथा, आज तरी पांढरपेशा समाजात आहे असे वाटत नाही. प्रत्येक प्रकरणाचे त्यांचे विषय वेगळे आहेत. उदा. शोषण नावाच्या प्रकरणाचा विषय आहे सैनिक भरतीच्या वेळेस होणारी तरुणांची ससेहोलपट, त्यांचे शोषण. कॉर्पोरेट कुणबिकचा विषय आहे आजची शेती, त्यात कॉर्पोरेट जगताचा झालेला प्रवेश आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. सौंदर्य जबाबदारी इत्यादी नावाच्या प्रकरणात सुंदरता, सौंदर्य, तसेच देशातील सद्यस्थितीत असलेला विरोधाभास  याबाबतीत त्यांचे स्वगत आहे. प्रेमभाव प्रकरणाचा विषय आहे प्रेमभावना, वासना याबद्दल चिंतन. १९९९ चा काळ म्हणजे मुक्त-अर्थव्यवस्था, जागतिकीकरण वगैरे गोष्टी सुरु होवून ७-८ वर्षे झाली होती. हे पुस्तक त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आहे असे जाणवते. पुस्तकभर हरलेली मनोभूमिकेच्या, नामुष्कीचा प्रत्यय येतो, पण शेवट मात्र, अचानक, वर्तमानाशी लढण्याचा निर्धार व्यक्त करून होतो.

प्रत्यय आणि व्यत्यय या पुस्तकात रंगनाथ पठारे यांचा आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा संवाद आहे. त्यात या पुस्तकाबद्दल एक उल्लेख आला आहे. पठारे यांना कुठल्याश्या कार्यक्रमात आजच्या जमान्यातील एक तरुण मुलगी भेटली, आणि तिने त्यांना नामुष्कीचे स्वगत हे पुस्तक आवडल्याचे सांगितले, तसेच हे ही सांगितले की ती आणि त्यांच्या कॉलेज मधील काही जण ह्या पुस्तकातील कोठलेही एक प्रकरण घेवून त्याचे वाचन करतात, आणि त्यांना मजा येते. मला ते अगदी पटले. ह्या पुस्तकाचे जाहीर अभिवाचन करायला हरकत नाही. मोठी मोठी वाक्ये, तिरकस शैली, यामुळे नक्कीच श्रवणीय ठरू शकेल. पुस्तकाच्या सुरवातीला एक निवेदन आहे. ते निवेदन अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात पुगेत साऊंड भागात(Puget Sound area) सुक्वामिश(Suquamish) या मूळ निवासी जमातीच्या(native American, Red Indian) प्रमुखाचे आहे. १८५१ मध्ये जेव्हा अमेरिकेत राज्यकर्ते मूळ निवासी लोकांची जमीन येन केन प्रकारेण गिळंकृत करत होते, तेव्हा, प्रमुखाने(Chief Seattle) नामुष्कीने, असाहयपणे केलेले हे निवेदन. हे निवेदन अलास्कामध्ये झालेल्या १९७९ मधील पर्यावरणसंदर्भातील परिषदेत आले होते(Alaska Future Frontier Conference). आणि हे पर्यावरणाशी निगडीत अतिशय परिणामकारक(world’s most profound statement) निवेदन आहे असे म्हटले जाते. हे देखील प्रतीकात्मकच आहे असे म्हणावे लागेल, कारण त्यांची जागतिकीकरण आणि देशीवाद या विचारांशी निगडीत आहे. मूळ इंग्रजी मला येथे सापडले. Brexit सारख्या घटना जागतिकीकारण विरोधी आणि देशीवादी आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक जर वाचले तर आणखीनच relevant वाटते.

काही दिवसांपूर्वी शाम मनोहरांचे कळ हे पुस्तक वाचले होते. ते आणि पठारे, यांची पुस्तके अशीच शैली, फॉर्म, शीर्षके, त्यांना जे सांगायचे आहे ते, विज्ञानाचे संदर्भ, या बाबतीत समान वाटतात मला. त्या पुस्तकाबद्दलही लिहीन कधीतरी असाच.

Update: परवा रविवारच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण(खाऊजा) वर्षे झाल्या निमित्ताने विशेषांकात बरेच लेख आले होते. रंगनाथ पठारे यांचे नामुष्कीची स्वगते त्यावर प्रतिक्रिया म्हणून हे पुस्तक एकमेकांशी निगडीत आहे असे परत एकदा वाटले वाटले. खाऊजाचे समाजावर झालेले परिणाम या विषयावर कोणी मराठी लिहिले असेल तर वाचायला आवडेल.

Advertisements

2 thoughts on “पठारेंची स्वगते

  1. हे भारी आहे..तसंच दुःखाच्या कोंबालगतचा प्रवास…दिवे गेलेले दिवस…तूफान लेखक!!!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s