आपली पूर्वीची संस्थाने आणि संस्थानिक

मी फार पूर्वी Outlook Traveler या मासिकाचा वर्गणीदार होतो. बऱ्याचदा त्यात पूर्वीच्या संस्थानिकांच्या गावांची, राजवाड्यांची, किल्ल्यांची, तसेच तेथील पर्यटनाबद्दलची माहिती येत असे. एकदा त्यांनी एक भला मोठा नकाशाच त्यांनी दिला, जो भारतातील १९४७ मध्ये,  स्वतंत्र भारतात विलीनीकरण होण्यापूर्वी असलेली वेगवेगळी संस्थाने(princely states) यांचा होता. त्यावेळी ६५०च्या वर संस्थाने भारतात होती. त्यांच्या इतिहास, तसेच त्यांच्या विलीनीकरणाचा इतिहास आपल्याला थोडाबहुत माहीत असतो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी कार्य, तसेच मुत्सद्देगिरी यामुळे भारताची आणखी शकले होण्यापासून वंचित राहिळा, आपण देश म्हणून एकसंध राहिलो.काश्मीर संस्थान, तसेच निजामाच्या हैदराबाद विलीनीकरणाचा थोडा त्रास झाला खरा.

मी हा ब्लॉग लिहीत आहे, योगायोग असा की आज(१५ ऑगस्ट) खरे तर भारताचा ७०वा स्वातंत्र्यदिन आहे. बऱ्याच संस्थानांनी, तसेच संस्थानिकांनी, त्यांच्या काळात, आणि नंतरही, बरेच चांगले काम केले होते. जसे आपल्याला माहीत असलेले कोल्हापूर संस्थानाचे शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड इत्यादी. भारतातील शास्त्रीय संगीत देखील ह्या संस्थानिकांच्या आश्रयानेच पोसली गेली आणि वाढली, हे नक्कीच नाकारू शकत नाही. पण बहुतांशी संस्थानिक विलासी, दूरदृष्टीचा अभाव असलेले, तसेच ब्रिटिशांचे मंडलिक होते. संस्थानिकांबद्दल हे सर्व लिहिण्यास कारण असे झाले की मला काही दिवसांपूर्वी एक जुने इंग्रजी पुस्तक मिळाले. त्याचे नाव ‘Maharaja: The Lives, Loves and Intrigues of the Maharajas of India’. लेखक आहे दिवाण जरमनी दास. त्यात त्यांनी काही वेगवेगळया संस्थानिकांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या विलासी जीवनाचे वर्णन केले आहे. दास स्वतः कपूरथळा आणि पतियाळा संस्थानांच्या महाराजांच्या पदरी होते आणि त्यांचा अनुभव मोठा होता असे त्यांचे जीवन पाहिल्यास समजते.

तर हे पुस्तक तीन विभागात आहे. पहिला विभाग-Maharaja’s Private Life. यात ६० प्रकरणातून वेगवेगळया संस्थानिकांच्या विलासी जीवनाचे, त्यांच्या विक्षिप्त सवयींचे वर्णन केले आहे. कपुरथळा आणि पतियाळा संस्थानिकांच्या गोष्टी त्यात अधिक आहेट. वाममार्गी तांत्रिक साधनेचा आश्रय घेवून त्याच्या नावाखाली बाहेरख्याली वर्तणूक होत असे, पोहण्याच्या तलावात ४० स्त्रियांबरोबर रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात जलक्रीडा चाले, शाही विवाहासाठी वधू परीक्षेची माहिती येते. संस्थानिकांच्या परदेश दौरे, त्याची वर्णने, त्यांनी केलेले परदेशी स्त्रियांशी विवाह, तसेच परदेशी आणि ब्रिटीश अधिकारी जेव्हा त्यांच्या दरबारात येत तेव्हा घडत असलेले प्रसंग, रिती रिवाज याची माहिती येते. एकूणच राज्यकारभाराकडे दुर्लक्ष, स्वार्थ, ऐषोआराम आणि विलासात सर्वकाळ बुडालेले असे राज्यकर्ते, ब्रिटिशांच्या नीती पुढे शरणागती, त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य पुढे जात राहिले असेच म्हणावे लागले. १८५७च्या उठावानंतर ब्रिटिशांना फार मोठा धक्का बसला होता, त्यांनी हाय खाल्ली होती. त्यामुळे त्यांच्या कुटनीतीचा एक भाग म्हणून संस्थानिकांना वाटेल तशा सवलती, आणि सैल देऊन त्यांची मर्जी हासिल करण्याचा डाव होता. त्यामुळे संस्थानिक गाफील राहिले, प्रजेकडे दुर्लक्ष झाले, आणि आपल्याच मस्तीत ते राहू लागून निष्क्रीय बनले. पुस्तकातील २७२व्या पानावर दास लिहितात, ‘The policy of the Paramount Power was to give unlimited powers of administration to the rulers of the Indian States for making them the bulwark against the political aspirations of the people of British India. Divide and Rule was the motto of the Britishers and for this game of political diplomacy the Britishers were well-known…..In this transformation of outlook they became megalomaniacs and in this process they developed peculiar habits in their day-to-day life’. ह्या विभागातील शेवटचा लेख आहे The Cradle of Culture या नावाने, आणि तो आहे काश्मीरवर. गेल्या काही दिवसात, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर,  काश्मीर आणि प्रामुख्याने गिलगिट(Gilgit), बलुचिस्तान भागाचा उल्लेख येत आहे. ह्या लेखात काश्मीरची महती तर आहेच, आणि तसेच गिलगिट हा भाग ब्रिटीश साम्राज्याचा(पर्यायाने भारताचा) शिरपेचातील तुरा आहे(jewel in the crown of British Empire), आणि त्याला त्यांनी Gibralter of India असे देखील म्हटले आहे. ब्रिटीशांनी तो भाग डोग्रा संस्थानाकडे न जाण्यास नाना चाली खेळल्या.

दुसरा विभाग-Maharaja and Politics. यात ४ प्रकरणातून संस्थानिकाचे ब्रिटीश सरकार बरोबर असलेले संबंध, त्यांना आपल्या टाचेखाली राखण्यासाठी ब्रिटीशांनी योजलेल्या नाना युक्त्या, कुटनीती याची माहिती येते. उदा. ब्रिटीशांनी तोफेच्या सलामीची प्रथा महाराजांच्या सन्मानार्थ वेगवेगळया समारंभाच्या वेळी, सुरु केली. मिठावरील करवसुलीसाठी ब्रिटीशांनी कशी कुटनीती वापरली याचे मी वाचलेल्या एका पुस्तकात मी वाचले होते, त्यबद्दल मी येथे लिहिले होते, ब्रिटीशांनी भारतात घटनाचा सुधारणेसाठी तीन वेळेस गोलमेज परिषद (round table conference) बोलावल्या, त्यात वेगवेगळया संस्थानिकांच्या प्रतिनिधींना देखील आमंत्रण केले होते, त्यावेळच्या परिस्थितीची माहिती येते. तसेच ब्रिटीशांनी संस्थानिकांच्या समस्येची चर्चा करण्यासाठी Chamber Of Princes सुरु केले त्याची देखील माहिती मिळते. तसेच स्वतंत्र भारतात सामील न होण्यासाठी संस्थानांनी केलेल्या कुटनीतीची, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते सगळे प्रयत्न कसे खुबीने हाणून पडले,  याची देखील सविस्तर माहिती येते.

तिसरा विभाग-End of an Epoch.यात २ प्रकरणातून विभागाच्या शीर्षकाप्रमाणे ही सर्व संस्थाने खालसा झाल्यानंतर, नामशेष झाल्यानंतर, त्यावेळच्या राजांची, महाराजांची स्थिती काय झाली, त्यांनी पुढे काय केले याचे काही मासले त्यांनी दिले आहेत. उदा. काही जण भारत सरकारच्या कारभारात, मंत्रिमंडळात निवडून गेले, आणि वेगवेगळी पदे, विभाग सांभाळू लागले. त्यांना बदलत्या काळाची चाहूल लागली, आणि ते जमिनीवर आले अशी त्यांनी उदाहरणे दिली आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर असलेली टीप संस्थानिकांच्या बद्दल बरेच काही सांगून जाते-The book that set off shock waves throughout the country and rocked the citadels of today’s privy purse-holders. Naked exposure of the pageantry, debauchery and intrigue in the princely houses of Rajas, Maharajas, Nawabs, Nizams, and the Jams by a former Diwan. Even the Hippies, among, the avid readers, of books on Indian eroticism, will wince when reading this one.

मराठीतील प्रसिद्ध लेखक चिं. वि. जोशी ह्यांनी सुद्धा चिमणरावाचे चऱ्हाट या पुस्तकात रावसाहेब चिमणराव-स्टेट गेस्ट नावाची एक संस्थानिकाच्या हालाखीची तसेच बडेजावपणाची कथा लिहिली आहे. ते स्वतः बडोदा संस्थानाचे अधिकारी होते. त्यांना देखील संस्थानिकांना जवळून पाहता आले. वि. ग. कानिटकर यांच्या पूर्वज या लेखसंग्रहातही त्यांनी औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी यांच्या दुसऱ्या विवाहाची कथा रंगवली आहे. गंगाधर गाडगीळ यांची कादंबरी ‘एक होता राजा’ यात त्यांनी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्यावर त्यांनी लिखाण केले. ‘संस्थांनी माणसे’ हे अजून के पुस्तक नरेंद्र चपळगावकरांनी लिहिलेले, जे हैद्राबादचा निजाम राजवटीतील काही व्यक्तींची चित्रणे असलेले आहे. ह्या पुस्तकाबद्दल नतंर लिहिण्याचा विचार आहे.

दिवाण जरमनी दास यांचे हे पुस्तक ह्या इतर पुस्तकांच्या मानाने बरेच मोठे आहे आणि विविध महाराजांबद्दलचे अनुभव कथन करणारे आहे. त्यांनी याच विषयावर आणखीही काही पुस्तके लिहिली आहेत. महाराणी(‘Maharani: A Fabulous Collection of Adventures of Indian Maharanis and Royal Mistresses’) हे पुस्तक संथानिकांच्या राण्या-महाराण्या यांचे जीवन कसे होते हे सांगणारे आहे. ते मी अजून वाचले नाही. तुम्हाला काही ह्या विषयावर माहिती असलेली पुस्तके असतील तर जरूर कळवा. आजकाल आपण ह्या राजे, महाराजे, त्यांच्या वेगवेगळया गोष्टींचा अभिमानाने वारसा म्हणून पाहतो, लोकांना दाखवतो, पण त्या मागे बराचसा असा काळा इतिहास आहे हे बऱ्याचदा आपण विसरले गेलो असतो.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s