बंगळूरूमधील कर्नाटक राज्योत्सव

कर्नाटक राज्य स्थापनेचा दिवस म्हणजे १ नोव्हेंबर आणि तो राज्योत्सव दिवस म्हणून राज्यभर साजरा होतो.  ह्या वर्षी कर्नाटक राज्य स्थापनेला ६० वर्षे झाली. मी त्या दिवशी योगायोगाने बंगळूरूमध्ये होतो, त्यामुळे मला कर्नाटकाच्या राजधानीत हा दिवस कसा साजरा केला गेला हे पाहायला मिळाले. त्याबद्दल येथे लिहतो आहे.

बेंगळुरूची परिस्थिती ही तशी थोडी मुंबईसारखी झाली आहे असे म्हण्याला हरकत नाही. मुंबईत जसे मराठी भाषेची, मराठी माणूस यांची गळचेपी कित्येक वर्षे झाली आहे, तसेच काहीसे बेंगळुरूचा बाबतीत गेल्या २५-३० वर्षात झाले आहे असे दिसून येईल. जसे जसे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र शहरात वाढू लागले तसे तसे शेजारील राज्यातून वेगवेगळे लोकं येऊन राहू लागले आणि त्यातून कन्नड भाषेची, स्थानिक कन्नड माणसाची गळचेपी सुरु झाली. हे सर्व सांगण्याचे कारण की ज्या तऱ्हेने शहरात स्थापना दिवस साजरा केला गेला ते सर्व पाहून त्यामागची ही पार्श्वभूमी आहे. तसेच नुकतेच घडलेले कावेरी पाणी वाटप प्रश्नाच्या संदर्भात घडलेल्या अप्रिय घटना, त्याच्याही आठवणी ताज्या होत्या. त्यामुळेही की काय, हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

सकाळी सकाळी आलेल्या इंग्रजी(The Hindu, Deccan Herald, Times of India) तसेच कन्नड(प्रजावाणी, विजय कर्नाटक) वर्तमानपत्रातून विविध लेख, इतिहास इत्यादी रकानेच्या रकाने भरून माहिती आली होती. तसेच दूरचित्रवाणी वाहिनांवर कन्नड भाषा, कर्नाटक राज्य यांची महती सांगणारी गाणी, चित्रपट यांची चालती होती. कन्नड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध नट राजकुमार यांची बरीच गाणी आणि चित्रपट ह्या विषयावर होती(राजकुमार ह्यांनी १९८० मधील कन्नड भाषेसाठी झालेल्या गोकाक आंदोलनात देखील सक्रीय सहभाग घेतला होता). बंगळूरू आकाशवाणीवर पुणे आकाशवाणी प्रमाणे दररोज सकाळी चिंतन हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. कर्नाटक राज्योत्सावाच्या निमिताने त्या कार्यक्रमात विविध विचारवंत महिनाभर कर्नाटक राज्य, कन्नड भाषा, याबद्दल आपले विचार व्यक्त करताहेत. मी ऐन दिवाळीत बेंगळुरू मध्ये असल्यामुळे काही कन्नड मासिकांचे दिवाळी विशेषांक घेतले. त्यात देखील कर्नाटक राज्य एकीकरण चळवळीचे प्रयत्न, त्याचा इतिहास, आणि उत्तर कर्नाटकातील जनतेचा असलेला सहभाग याबद्दल सविस्तर सांगणाऱ्या खास पुरवण्या आलेल्या मला दिसल्या. कर्नाटक राज्य स्थापन करण्यासाठी झालेला लढा, एकीकरण समिती, त्याचा इतिहास याबद्दल देखील मी कधीतरी लिहीन. १९५६ साली जेव्हा राज्य अस्तित्वात आले, तेव्हा त्याचे नाव मैसुरू हेच कायम ठेवले होते. पण १९७३ मध्ये कर्नाटक असे नामकरण करण्यात आले, त्याबद्दलची माहिती आली होती.

बंगळूरू मध्ये नातेवाईकांकडे आमचा मुक्काम असलेल्या गृहसंकुलात देखील कर्नाटक राज्योत्सावानिमित्ताने कार्यक्रम होता. सुरुवातीला झेंडा वंदन झाले(लाल आणि पिवळा रंग असलेल्या कर्नाटकाचा झेंडा), सभासदांनी, मुला-मुलींनी कर्नाटक राज्यगीत(‘जय भारत जननिया तनुजाते जाते’ हे कर्नाटक माते), आणि इतर राज्य-स्तुतीपर गाणी म्हटली. वातावरण एकूण भरून गेले होते. बऱ्याच जणांनी वेशदेखील त्याच रंगसंगती मध्ये परिधान केला होता.

संध्याकाळी बाहेर पडलो, तर ठिकठिकाणी, चौकाचौकात कर्नाटक माता म्हणजे भुवनेश्वरी देवीची प्रतिमेचे पूजन, फडफडता झेंडा, पताका यांनी सजवलेले मंडप दृष्टीस पडले. रस्त्यांवरील रिक्षा देखील ह्या निमित्ताने सजल्या होत्या. सरकारी कार्यक्रम तर होतेच(ज्यात भाषणे, कर्नाटक राज्य कला, संस्कृती, जानपद यांचे दर्शन देणारे कार्यक्रम), पण त्याच बरोबर प्रमुख आकर्षण म्हणजे राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या सेवेबद्दल दिला जातो. त्याचीदेखील माहिती ठिकठिकाणी आली होती. आम्ही नंतर जवळच असलेल्या मॉलमध्ये चर्चेत असलेला एक कन्नड सिनेमा पाहायला गेलो, ज्याचे नाव मुकुंद मुरारी, जो परेश रावळ अभिनित हिंदी सिनेमाची कन्नड आवृत्ती होती. तर मॉलमध्ये, सिनेमागृहात देखील राज्योत्सावानिमित्त सजावट दिसली. जाहिराती  दाखवणाऱ्या इलेक्ट्रोनिक फलकावर देखील कर्नाटक राज्योत्सव, राज्याचा नकाशा जो पिवळा आणि लाल रंगात दाखवला जातो, तसा आणि राज्यातील आजी माजी प्रसिद्ध व्यक्ती यांचे छायाचित्रे झळकत असलेली दिसली. दुसऱ्या दिवशी मी रेल्वेने चेन्नईला जाणार होतो, त्यामुळे रेल्वे स्टेशनवर गेलो असता, तेथेही मला कर्नाटक राज्याचा झेंडा झळकत असलेला दिसला. संपूर्ण नोव्हेंबर महिना राज्यभर काहीना काहीना कार्यक्रम ह्या निमित्ताने होत असतात. बेंगळुरच्या विधानसौधा भागात जावू नाही शकलो, पण तेथेही रोषणाई, सजावट असते.

महाराष्ट्रात मी अशा तऱ्हेने महाराष्ट्र दिन साजरा केलेला मला तरी दिसत नाही. आपापल्या सहकारी गृह्संकुलातून महाराष्ट्र दिन साजरा करायला काय हरकत आहे. मुंबई आणि इतर मोठ्या शहरातून मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची गळचेपी होत असताना, त्याबद्दल जनजागृती करायला हा नक्कीच चांगला मार्ग आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s