कृषी पर्यटन: एक अनुभव

थंडीचे दिवस म्हटले की हुरडा आलाच. मीही गेली काही वर्षे हुरडा खायला पुण्याच्या आसपास जातो आहे. ह्या वर्षी एखाद्या कृषी पर्यटन केंद्रावर जाऊयात असा विचार केला, जेथे हुरडाही मिळेल तसेच इतर गोष्टी जसे की गावरान जेवण वगैरे मिळेल. गेल्या ५०-६० वर्षांपासून जे शहरीकरण वाढते आहे, तस-तसे ग्रामीण भागातील लोक शहराकडे येत आहेत. प्रत्येक थरातील व्यक्तींना आपल्या गतकाळातील, गावाकडच्या घराची, शेतीवाडीची, राहणीमानाची आठवण येत असते. मी लहानपणी तर प्रत्येक वर्षी एकदा-दोनदा माझ्या आजोळी, गावाकडे जायचो, आणि महिनाभर मुक्काम असे. त्याबद्दल मी येथे लिहिले आहे. ते एक प्रकारे कृषी पर्यटनच होते. आजकाल खुपच कमी लोकांच्या हे नशिबी येत असावे. बऱ्याच लोकांच्या शेतजमिनी गेल्या आहेत, पुढच्या पिढीने कसायला कोणी नाही म्हणून, तसेच इतर कारणांमुळे त्या विकून टाकल्या आहेत. पण ज्यांना शक्य आहे ते आजकाल शेतजमिनी, फार्महाउस घेतात आणि थोड्याफार प्रमाणात ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतात.

कृषी पर्यटन(Agri Tourism) ही संकल्पना सुरु झाली २००५ मध्ये Agri Tourism Development Corporation(ATDC)च्या स्थापनेने. मग हळू हळू ती शेतकऱ्यांमध्ये रुजू लागली. बेभरवशाच्या शेतीसोबत एक जोड धंदा म्हणून शेतकरी तीला स्वीकारू लागले. मला आठवते २००८ मध्ये ने कृषी पर्यटन पुस्तिका प्रकाशित केली, त्यावेळेस ती मी घेतली होती. आज १५०हून अधिक कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात आहेत आणि या व्यवसायाने चांगलेच बाळसे धरले आहे.

20170108_063626

तर मी गेलो होतो पुण्याजवळील कोकणकन्या कृषी पर्यटन केंद्रावर. आजकाल इंटरनेट, वेबसाईट, मोबाईलच्या जमान्यात सर्व माहिती काढून, विचारून जाता येते. तसेच आम्हीदेखील केले. Google Mapsमुळे रस्ता शोधणे देखील अवघड गेले नाही.

भीमा, भामा, इंद्रायणी नद्या यांच्या खोऱ्यात असलेल्या गावातून आम्ही जात होतो. काही भाग औद्योगिक तर बाकीचा प्रामुख्या उस लागवडी खाली. काही ठिकाणी कोबी देखील दिसली. मध्येच उस कटाई, साखर कारखान्यात उस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, उसशेतात काम करणाऱ्यांच्या झोपड्या दिसत होत्या. आमची गाडी डावी उजवी वळणे घेत, डांबरी रस्ता ओलांडून, कच्च्या रस्त्यावरून, सुकलेल्या नाल्याच्या बाजूने, धुराळा खात, उडवत कृषी पर्यटन केंद्रावर पोहचली. तेथील शेत-शिवार प्रथम दर्शनी जरा वेगळे वाटले. उसाच्या, तसेच ज्वारीच्या शेतावरील बांधांवर नारळाची, सागाची लागवड केलेली दिसली. असे कधी पहिले नव्हते. आंब्याची झाडे भरपूर होती. खूप अशी वाढलेली नव्हती, याचा अर्थ ती नुकतीच लावली गेली होती. पण मोहोर आलेल्या त्यांना, आणि तो सहजपणे हाताला लागत होता.

गेल्या गेल्या नष्टा, चहा झाला. नंतर एक बैलगाडी, आणि एक मधून वावराचा फेरफटका झाला. त्यात मजा आली. शेत तळी, चिंचेची झाडी नजरेस पडली. मुख्य भागात, ज्या ठिकाणी हिरवळ होती, तेथे बरीच गर्दी असल्यामुळे/झाल्यामुळे आम्ही जरा लांबवर चालत, कापलेल्या उसाच्या काळ्या मातीच्या शेतातून, चिंचेच्या सावलीत पाहुडायला म्हणून गेलो. पाहतो तर, चिंचेची झाडे चिंचानी लगडलेली, आणि तीही सहजपणे हाताला लागत होती. मग काय विचारता? पुढील १५ मिनिटे आम्ही हरखून जाऊन, वेड्यासारखे तुफान चिंच-तोड केली. नंतर जेवण आले. झुणकाभाकरी, ठेचा, वांगे वगैरे होते. पण पनीर आणि जीरा राईस देखील होते, जे नक्कीच खटकले. स्वयंपाक घरात जाऊन पाहतो तर तेथे चूल वगैरे काही नव्हती.त्याचाही विरस झाला. एका बाजूला rain dance च्या नावाखाली जोरात गाणी बजावणी चालू होती, आणि लोक पाण्यात भिजत होते. त्याऐवजी जर, शेत-तळ्यात डुंबण्याचा, पोहण्याचा जर पर्यटकांना अनुभव देता आला असता. तेथे खरे तर एक मोठी विहीरही होती, त्यात देखील उतरायला देऊ शकले असते. रहाटगडग्याचे, शेताला पाणी कसे देतात हे दाखवता आले असते. बरीच मोठा भाग उसाखाली होता, पण गुऱ्हाळ, तसेच गुळाचा घाणा असला असता आणखीन मजा आली असती. शेतावर गायी-म्हशींचा गोठा नव्हता, तो असता तर, त्याची देखील मजा आलो असती.

सर्वात शेवटी, संध्याकाळी, हुरडा पार्टी झाली. पण तेथे देखील थोडासा विरस झाला. एकतर हुरडा त्यांच्या शेतातील नव्हता(हे एक वेळ ठिक आहे, कारण तो तेथे त्यांनी लावला नसेल), पण हुरडा समोर चुलीवर भाजला जात नव्हता, त्यामुळे, कोंडाळे करून, हुरडा भाजत, सोलत, खाण्याची जी मजा असते, तो अस्सल अनुभव आला नाही. कृषी पर्यटनात देखील धंदेवाईकपणा आला आहे, त्यामुळे, दर्जा घसरला जातोय. आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो, तेथे देखील सुट्टी असल्यामुळे बरीच गर्दी होती, आणि एकूण अनुभवाचा दर्जा खाली आला. तसे होता कामा नये.

मी(आणि आजकाल अनेक जण) कित्येक वर्षे सह्याद्री डोंगररांगांमधून किल्ल्यांवर फिरत आहे. त्यावेळेस अस्सल ग्रामीण जीवनाचा अनुभव येतच असतो. कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन वगैरे ठिक आहे. बदलत्या जीवनशैली मुळे, तसेच जग जवळ आल्यामुळे, ही नवीन पर्यटन क्षेत्रं लोकांची गरज भागवत आहेत. पण मी परवा वाचले की महाराष्ट्र सरकार तुरुंग पर्यटन सुरु करणार आहे. हे म्हणजे अतीच झाले. ह्याची जनसामान्यांना काय गरज आहे. ऐतिहासिक स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने काही वस्तू ज्या तुरुंग म्हणून वापरल्या गेल्या होत्या तेथपर्यंत ठीक आहे. मी अमेरिकेत असताना कॅलिफोर्नियातील Alcatraz Island Prison या ऐतिहासिक तुरुंगाला भेट दिली होती. भारतात अंदमान येथे सावरकरांना जेथे बंदिवास घडला ते पाहणे नक्कीच प्रेरणादायी आहे. ते असो, पण कृषी पर्यटन क्षेत्र चांगलेच फोफावते आहे, पण एवढीच इच्छा आहे की शेती फक्त पर्यटनापुरतेच राहू नये.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s