Aside

पं. विजय कोपरकरांचा संगीताचा तास

जानेवारीत होणारा पुण्यातील वसंतोत्सव हा संगीत महोत्सव अतिशय लोकप्रिय झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका मोफत वाटल्या जातात. आणि त्या काही तासांत संपतात देखील. दुर्दैवाने ह्या वर्षी मला मिळाल्याच नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाला हजर राहता येणार नव्हते. मुख्य संगीत महोत्सवाबरोबर संगीतावर चर्चा, विचार मंथन घडवणारा वसंतोत्सव विमर्श हा देखील एकदिवसीय कार्यक्रम होत असतो. तोही मोफत असतो. त्याला मात्र मला जायला मिळाले. हा कार्यक्रम होता पंडित विजय कोपरकर या प्रसिद्ध गायकाच्या संगीत शिकवणीचा. म्हणून संगीताचा तास असे शीर्षक!

हा कार्यक्रम होता पुण्यातील घोले रस्त्यावरील नेहरू कला दालनाच्या सभागृहात. हे छानसे कला दालन नव्यानेच उभे राहिले आहे. तेथे व्याख्याने, नाट्यप्रयोग(प्रामुख्याने प्रायोगिक रंगभूमीवरील), संगीताचे कार्यक्रम इत्यादी होत असतात. या सभागृहात जायचा कधी योग आला नव्हता. पुणे बिनालेच्या वेळेस कला दालनात गेलो होतो. ह्या वर्षी विमर्शसाठी फक्त पंडितजी एकटेच होते. पूर्वी एक-दोनदा गेलो होतो तेव्हा ४-५ वक्ते असलेले कर्यक्रम झाले होते. त्याबद्दल मी येथे पूर्वी लिहिले आहे. सकाळी ११चा कार्यक्रम, मला पोहचायला जरा उशीरच झाला. आत गेलो ते पाहतो काय, सभागृह पूर्ण भरलेले, रंगमंचावर पंडितजींच्या समोर संगीत शिकणारे विद्यार्थी बसलेले दिसले. पहिल्या सत्रात पंडितजी रियाजाबद्दल सांगणार होते. आणि तेच सुरु होते.

20170119_141141

त्यांनी सुरुवातीला रियाज करताना नुसता स्वरांचा न करता, एखाद्या रागातील स्वरांच्या लागावाचे, श्रुतीचे काव वेगळेपण आहे, ते जाणून त्या स्वरांचा रियाज करावा असे त्यांनी मत मांडले. आवाजासाठी ओंकार साधना कशी करावी हे त्यांनी सांगितले. पंडित विजय कोपरकर यांनी पंडित वसंतराव देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीत शिकले आहे असे उल्लेख आले. ओंकार साधना , त्यांनी जशी अभिषेकीबुवांकडून शिकली ती त्यांनी सांगितली. ओम् श्री अनंत हरी नारायण हे वाक्य वेगवेगळया तऱ्हेने म्हणून, स्वर-रियाज कसा होतो हे सांगितले, त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले. ओंकारातील मकारच्या गुंजनामुळे, तसेच खर्जात केलेल्या रीयाजामुळे स्वरतंतूंचा व्यायाम होतो. दीर्घ श्वास कसा घ्यावा, जेणेकरून दमसास वाढेल याबद्दल बोलले. रियाज म्हणून इतरांचे गाणे ऐकणे किती महत्वाचे आहे हे ते वारंवार सांगत होते. स्वरयुक्त आलाप आणि त्यानंर आकारयुक्त आलाप कसे करावेत हे दाखवले. सामुहिक ओंकार गुंजन ऐकताना मी खूप पूर्वी तळेगावाजवळील घोराडेश्वर गुहेत ऐकलेल्या गुंजानाची आठवण झाली.  नंतर त्यांनी तानेविषयी सांगितले. तानेमध्ये स्वर सुटे आणि स्पष्ट लागले पाहिजे, जे अलापात उलटे आहे, जेथे, स्वरांचा प्रवास तुटक न जाणवता, मिंडकामामुळे तो सलग झाला पाहिजे. आरोही, अवरोही तान, सरळ आणि गमक तान, तसेच सुरुवातीला दोन स्वरांनी, नंतर चार स्वरांनीयुक्त अशी तानांची प्रात्यक्षिके दाखवली.

दुपारी दुसऱ्या सत्रात ख्याल सादरीकरणाचे प्रात्यक्षिक दाखवले. बंदिशींबद्दल देखील बोलले. एका रागाच्या दहा-एक बंदिशी तरी शिकल्या पाहिजे आहे त्यांनी मत व्यक्त केले, जेणे करून रागाचे, रागांच्या स्वरांचे वेगवेगळे लगाव, बारकावे समजात. त्यांनी एका बंदिशीच्या अस्थाई आणि अंतरा भागाचे नोटेशन करून, ख्यालाचे विविश भाग दाखवले.   प्रश्नोत्तराच्या काळात काही प्रश्नदेखील आले. त्यातील एक तंबोरा(अथवा तानपुरा) आणि त्याच्या डिजीटल अवताराच्या वापराविषयी होता. खऱ्या तानपुऱ्याच्या ताराखाली येत राहतात, आणि हवे ते स्वर येत नाहीत हे विषद केले. दुसरा प्रश्न संगीत गुरुमुखी विद्या का आहे याबद्दल होता. काही रागांचे स्वर-लगाव हे गुरूकडून ऐकूनच शिकावे लागतात, इतर पद्धतीने त्याचे नेमकेपण आत्मसात होत. आवाजाची पट्टी कशी असावी याबद्दल देखील एक प्रश्न होता, ज्याबद्दल त्यांनी सांगितले की खालचा प(पंचम) आणि वरचा म(मध्यम) ज्या पट्टीत आवाज लागतो, ती पट्टी असावी.

अश्या कार्यक्रमांचा संगीत शिकणाऱ्याना, शिकाऊ तानसेनांना तर फायदा होतोच, पण शिकाऊ कानसेनांनादेखील फायदा होतो. मला सुदैवाने, मुख्य कार्यक्रमाची एक प्रवेशिका मिळाली. बरेच लोक नको असलेल्या प्रवेशिका आणूनही देतात, जी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी शनिवारच्या सत्राला हजर होतो.

20170121_204323

रेखा भारद्वाज यांचे सुफी गाणे, आणि त्यानंतर रोणू मुजुमदार यांची बासरी आणि राहुल देशपांडे यांच्या गायनाची जुगलबंदी ऐकली. जवळ जवळ अर्धातास सुरु असलेली आलापकारी, आणि त्यातील जुगलबंदी श्रवणीय होती. रमणबागेतील वसंतोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असते ते त्यांचा रंगमंच. ह्यावेळेस कर्नाटकातील हंपी येथील काही मंदिराची प्रतिकृती असलेला रंगमंच होता. एकच सूचना अशी करावीशी वाटते की, भारतीय बैठक-व्यवस्थेत बसलेल्या रसिकांना रंगमंचावरील कलाकार, इतर गोष्टी दिसत नाही. जर त्याची उंची काही फुटांनी वाढवली तर रंगमंच, त्यावरील बसलेले कलाकार आणि इतर गोष्टी दृष्टीक्षेपात येतील, आणि अनुभवात आणखी भर पडेल.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s