जांभळाचे दिवस

ह्यावर्षी उन्हाळा जरा लवकरच सुरु झाला. मार्च महिन्यापासूनच धरती तापू लागली. उन्हाळा म्हणजे आंबे, फणस, तसेच रानातील करवंदे आणि जांभळे. त्यातच मी व्यंकटेश माडगुळकर यांचे  जांभळाचे दिवस पुस्तक वाचले. हे पुस्तक म्हणजे पन्नास-साठ वर्षापूर्वी(१९५७) प्रसिद्ध झालेला कथा संग्रह आहे. त्यात दहा कथा आहेत, काही ग्रामीण, तर काही शहरी. त्यातील पहिलीच कथा जांभळाचे दिवस या नावाची आहे. आणि ती वाचून मला रानावनात जाऊन करवंदे, जांभळे खावेसे वाटू लागले. खूप दिवसात सह्याद्रीमधील जंगलात, डोंगरावरील किल्ल्यावर भटकायला गेलेलो नाही. पूर्वी जायचो आणि उन्हाळ्यात हा रानमेव्यावर ताव मारत भटकंती करत असू.

तर पुस्तक आणल्यावर मी सर्वात आदी सायकल ही कथा वाचली. ही पुस्तकात सर्वात शेवटी आहे. मग या पहिल्या कथेकडे आलो. व्यंकटेश माडगुळकर शिवाजीनगर भागात अक्षर बंगल्यात राहायचे(त्यांचे बंधू ग. दि. माडगुळकर हे वाकडेवाडी भागात पुणे-मुंबई रस्त्यावर पंचवटी नावाच्या बंगल्यात राहत असत). सायकल आणि इतर दोन-चार कथा याच भागात घडतात. सर्वच कथा ह्या मानवी मनाच्या अथांगतेचा ठाव घेतात. सायकल कथेत आपल्या मुलास सायकल घेवून देण्यातील असमर्थता आणि जुन्या सायकलीचा इतिहास समजल्यावर मनाची होणारी घालमेल याचे वर्णन आले आहे.

जांभळाचे दिवस ही पाहिली कथा अशीच रानात घडते. लेखक सुट्टीनिमित्त गावी गेला असता, नदीकाठी असलेल्या रानात, जांभळाच्या झाडीत भटकत, जांभळे मनसोक्त खात, सामोरे गेलेल्या प्रसंगाभोवती कथा फिरते. बालपणी गावात रहात असलेली आणि ओळखीची असलेली मुलगी चमन रानात पाहून त्यांच्या मनात आलेले विचार म्हणजे ही कथा. ह्या कथेत जांभळे झाडावरून तोडून खाणे ह्या गोष्टीचे बहारदार, रसपूर्ण वर्णन केले आहे.

सकाळची पाहुणी या कथेत त्यांनी भास आणि सत्य यांचा खेळ मांडला आहे. माणसाचे सुप्त मन झोपेत गेल्यावर जागे होते. सकाळी जाग आल्यावर सुप्त मन आणि जागृत मन यांच्या सीमारेषेवर मनात होणारा खेळ त्यांनी या कथेत दाखवला आहे. सकाळी उठल्यावर मनात रुतलेल्या एखाद्या स्त्रीचे समोर असल्याचा भास होणे, आणि त्यातून होणाऱ्या घटना, होणारा संवाद, आणि तीला अगदी रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी म्हणून जाणे इथपर्यंत तो खेळ होतो. मानसिक आजारी असलेल्या, विशेषतः स्किझोफ्रेनियाने ग्रासलेल्या व्यक्तींना असे भास(hallucination) होत असतात, हे मी त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला समजले होते. ही कथा त्याच धर्तीवरील आहे की काय अशी शंका येते.

बाजारची वाट ही ग्रामीण कथा आहे. ती सुद्धा स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रण करते. त्यात एक ग्रामीण स्त्री आठवडे बाजारातून रात्री उशिरा आडवाटेवरून आपल्या गावी येतना तिच्या मनात आलेले, तसेच तिला वाटेत भेटलेल्या एका गड्याचे विचार हे सर्व अनादी काळापासून चालू असलेल्या स्त्री-पुरुष आकर्षणावर प्रकाश टाकते. बाई ही कथा सुद्धा अशीच आहे. मुंबईतील नोकरी करून चाळीत एकट्या राहणाऱ्या एक मध्यमवयीन विधवा स्त्रीला वाटणारी असुरक्षितता, पुरुषांबद्दल असणारा संशय, आणि त्याच बरोबर कार्यालयातील एक विदुर गृहस्थ यांच्या बरोबर कसे सुत जुळते हे कथेत दाखवले आहे. मुंबईतील ५०-६०च्या दशकातील पांढरपेश्या समाजातील, चाळीतील समाजजीवन कसे होते याचीदेखील झलक दिसते. लोणी आणि विस्तू ही कथा पण एका तरुण उफाड्याच्या स्त्रीचीच आहे. गावाकडून मुंबईत येवून राहत असलेली ही स्त्री, लिहिता वाचता न येणारी. पोस्टात जाऊन रघूकरवी पत्र लिहून घेत असते. राघू तिच्यावर भाळलेला आहे, झुरतो आहे. पण कथेचा शेवट असा अनपेक्षित होतो की ती स्त्री तीला आलेली पत्रे ज्या गिरणीतील मास्तराकरवी वाचून घेत असते, त्याची झाली असते हे त्या बिचाऱ्या रघूला समजते. एकूण ग्रामीण भाषायामुळे कथा वाचनीय होते. पंच्याण्णव पौंडाची मुलगी ही एका वयात येणाऱ्या मुलाच्या असफल स्त्री-आकर्षणाची कथा आहे. ही सुद्धा एका अनपेक्षित वळणावर येवून थांबते.

उतारावर ही कथा एका वय वाढत चाललेल्या गृहस्थाची, वामान्रावांची आहे. एके सकाळी पुण्यातील एका टेकडीवर फिरायला गेलेल्यावर त्यांना उपरती होते, जाणीव होते, की आपले तारुण्य संपले आहे, आणि आपल्या आयुष्याच्या उतारावर लागलो आहो. अनवाणी ही कथा थोडीशी वेगळी आहे. ती आहे एका लहान पायाने अधू असलेल्या मुलीची कथा. घरी टपाल टाकायला येणाऱ्या पोस्टमनच्या पायात वहणा नाहीत हे पाहून त्या संवेदनशील मुलीने त्याच्यासाठी वहणा देणे याचे वर्णन आहे. शाळातपासणी ही ग्रामीण धमाल विनोदी कथा आहे. ही मी पूर्वी त्यांची कथाकथन ही ध्वनीमुद्रिका ऐकली होती, त्यात होती. गावातील शिक्षणव्यवस्थेचे, अनास्थेचे, आणि गावातील लोकांचे बेरकीपण नेमके मांडले आहे.

तर असे हे जांभळाचे दिवस पुस्तक. बऱ्याच दिवसांनी व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक वाचले. पूर्वी त्यांचे ऑस्ट्रेलिया भेतीवरील पांढरी मेंढरे हिरवी कुरणे वाचले होते, तेही खूप भावले होते.

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s