करुणाष्टक

पूर्वी केव्हा तरी पुणे आकाशवाणी वर मी व्यंकटेश माडगुळकर(तात्या) यांच्या करुणाष्टक या पुस्तकाचे अभिवाचन ऐकले होते. तेव्हापासून हे पुस्तक मिळवून वाचावे असे मनात होते. तो योग नुकताच आला. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या पुस्तकाच्या संदर्भात देखील असेच झाले होते. कोसलाचे अतिशय प्रभावी अभिवाचन आकाशवाणी वरून प्रसारीत होत असे तेव्हा मी न चुकता ते ऐकत असे. त्यानंतर मग केव्हातरी कोसला मिळवून वाचली, नंतर कोसालाबद्द्ल असे शीर्षक असलेल्या बाबा भांड यांनी संपादित केलेले  पुस्तक देखील वाचले. पुणे आकाशवाणी मुळे असे विविध अनुभव मिळाले, हे सर्व मी पूर्वी लिह्लीलेल्या माझे आकाशवाणी ऐकणे या लेखात लिहिले आहे.

करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर यांचे पुस्तक म्हणजे लहानपणीच्या आठवणी कथन, तेही प्रामुख्याने त्यांच्या आईच्या आठवणी जाग्या करणारे पुस्तक आहे. आत्मचरित्रात्मक म्हणा हवे तर. त्यांचे काही कथासंग्रह, व्यक्तीचित्रण संग्रह(उदा. घराकडच्या गोष्टी) यातून पुस्तकातील यातील काही भाग प्रसिद्ध झाला आहे. तसेच ग दि माडगुळकर(गदिमा) यांच्या काही पुस्तकातून देखील लहानपणीचे, तसेच आईचे काही अनुभव पूर्वी वाचल्याचे आठवते. उदाहरणार्थ, गदिमा यांच्या तिळ आणि तांदूळ या पुस्तकात माझी आई हा विस्तृत लेख आहे. गांधीवध आणि त्यानंतरच्या घटनांचे वर्णन करणाऱ्या व्यंकटेश माडगुळकर यांच्याच वावटळ या पुस्तकात आलेले काही घटना/अनुभव यातही आहेत. गदिमांच्या आणखी एका पुस्तकात(वाटेवरच्या सावल्या) बालपण आणि प्रामुख्याने आईवरच एक विस्तृत लेख आहे. पण करुणाष्टकचा मुख्य विषय आहे तो त्यांची आई हाच.

पुस्तक सुरु होते ते वडिलांच्या बदली मुळे परक्या गावी(म्हणजे कुंडल नावाच्या गावी) जाणे आले या घटनेपासून. आणि थांबते ते त्यांच्या आईच्या मृत्यूपर्यंत. या दोन्ही घटनांच्या दरम्यान कित्येक गोष्टी घडतात. प्लेगची साथ, गांधीवध झाल्यामुळे गावातील तणाव, मुलांच्या मृत्यू, तात्यांच्या आजीचा, वडिलांचा मृत्यू, हे सर्व कसे झेलले याचे वर्णन येते. अतिशय दारिद्र्य असलेली परिस्थिती, त्यातून निभावून नेताना, आईची, तसेच इतर व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये तात्या त्यात सांगतात. गदिमा यांच्या मृत्यूच्या प्रसंगाचे वर्णन देखील आहे. गदिमा यांनी त्यांच्या पुस्तकात स्वतःच्या आजारपणाबद्दल एक विस्तृत लेख लिहिला होता, त्याचे तपशील या करुणाष्टक पुस्तकातून परत वाचताना, पडताळून पाहताना गंमत वाटत होती. असे बऱ्याच प्रसंगाबद्दल करता येते.

त्यांच्या वडिलांच्या बद्दल देखील बरेच व्यक्तिचित्रण, आईच्या दृष्टीने ते कसे होते, त्यांच्या दोघांमधील स्वभावातील अंतर, त्यामुळे उडणारे खटके हे देखील विविध पुस्तकांतून विखुरलेल्या स्वरूपात आले आहे. माणदेशातील भौगोलिक परिस्थिती, औंध संस्थानातील कारभार याचे वर्णन यामुळे एक वेगळाच काळ डोळ्यासमोर उभा राहतो. तात्यांना जंगलांची, वनाची गोडी कशी लागली, हेही अनेक प्रसंगातून करुणाष्टक मध्ये त्यांनी रेखाटले आहे. आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग लक्षात राहतात-तात्या लहानपणी काही कारणाने विहिरीत पडले होते, तेव्हा ते कसे बचावले किंवा त्यांचे थोरले बंधू अर्थात गदिमा दहावी परीक्षेत नापास झाले, आई त्यांना बोलबोल बोलली, आणि त्यामुळे ते वर्षभर घरातून परागंदा झाले होते, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती इत्यादी. एकुणात काय तर आलेले प्रखर आणि दाहक अनुभव तात्या आपल्याला सांगतात.

रामदास स्वामी यांनी करुणाष्टक हे काव्य रामाच्या प्रार्थनेसाठी रचली. माडगुळकर यांचे करुणाष्टक आईची थोरवी गाते. आठ मुलांच्या रुपाने आठ समस्या त्यांच्या आईपुढे कशा उभ्या ठाकल्या, त्यांच्या दृष्टीकोनातून आईने कसा सामना केला याची कथा हे पुस्तक सांगते. हे पुस्तक तसे छोटेखानीच आहे. या दोघा माडगुळकर बंधूनी आत्मचरित्र असे लिहले नाही, पण आत्मचरित्रात्मक लेख, किंवा करुणाष्टक सारखे पुस्तक, यात त्यांच्या जीवनातील प्रसंगच आहेत. त्यामुळे बरेचसे प्रसंग, घटना यांची या पुस्तकांतून पुनरावृत्ती होते, पण त्याला नाईलाज आहे. पुस्तकात खास तात्यांच्या शैलीतील रेखाटने देखील आहेत. या सर्वामुळे माझे तरी झपाट्याने पुस्तक वाचून झाले, आणि एका वेगळ्या दुनियेत जाऊन आल्यासारखे वाटून गेले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s