Laughter with my father

काही वर्षांपूर्वी मी पु ल देशपांडे यांनी भाषांतरित केलेले ‘काय वाट्टेल ते होईल‘ हे विनोदी पुस्तक वाचले होते. १९४०च्या सुमारास एक रशियन(George and Helen Papashvily) माणूस अमेरिकेत जातो. तो तेथे गेल्यानंतर काय अनुभव आणि गमती जमती होतात याचे बहारदार वर्णन त्यात होते. त्याबद्दल मी येथे लिहिले होते. मीही वीसेक वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन काही वर्षे तेथे राहिलो होतो. मलाही बरेच कडू गोड अनुभव आलेले आहेत(आता मी ते कधी लिहून काढणार मला माहिती नाह!). त्यामुळे हे पुस्तक वाचून मजा आली होती. त्याच धर्तीचे अजून एक पुस्तक मला मिळाले. पुस्तकाचे नाव Laughter with my father, लेखक Carlos Bulosan. याचे भाषांतर, नव्हे रुपांतर, व्यंकटेश माडगुळकर यांनी केले आहे(१९७०च्या आसपासचे). मराठी पुस्तकाचे नाव आहे मी आणि माझा बाप(प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘आम्ही आणि आमचा बाप’ या पुस्तकाच्या नावाशी साम्य आहे, तरी गोंधळ नको. हे खूप नंतर आले आहे). तर हा कार्लोस बुलोसान फिलिपाईन्स देशाचा मूळ रहिवासी. तोही अमेरिकेत नशीब आजमावयाला, पैसा कमवायला म्हणून जातो. फार पूर्वी पासूनच अमेरिका हा तर स्थलांतरित लोकांचा देश आहे, तो काही आत्ताच Information Technology च्या लोकांमुळे झाला नाही. चीनी, फिलिपाईन्स, कोरिया, व्हिएतनाम मधील लोक १०० वर्षांपासून अमेरिकेत कामानिमित्त जात आहेत.

तर हा कार्लोस फिलिपाईन्स देशाचा, अमेरिकेत १९३० साली गेल्यानंतर परत कधीही आपल्या गावी गेला नाही. त्याने गावाकडच्या आठवणी या पुस्तकाच्या रुपाने लिहून ठेवल्या. त्या लघुकथा या स्वरूपाच्या आहेत. पूर्वी Newyorker, Time and Country, Harper’s Bazaar या मासिकात पूर्व-प्रकाशित झाल्या असे प्रस्तावनेत नमूद केले आहे. तात्यांनी हे भाषांतरित न करता रुपांतरीत केले, पद्मगंधातर्फे १९९८ मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी भाषांतारीत न करता रुपांतरीत केले हे छानच झाले. तात्या देखील मुळचे ग्रामीण कथाकार. त्यामुळे हे रुपांतर अगदी अस्सल झाले आहे. एकूण बारा कथा असलेले हे ९६ पानी पुस्तक आहे. चित्रकार रवीमुकुल यांची रेखाटने यात आहेत.

पहिल्या कथेत बेरकी बापाचे कोर्टातील युक्तीवाद, हे अगदी अकबर-बिरबल या कथेत शोभतील असे आहेत. दुसऱ्या कथेत महायुद्धाचा धामधुमीतून परत आलेल्या सैनिकांची मनस्थिती वर्णन करणारी आणि त्याचा फायदा घेऊ पाहणाऱ्या त्याच्या बापाचे उद्योग सांगितले आहेत. तिसऱ्या कथेत गावात जेव्हा तीन नटरंगी स्त्रिया शाळेतील शिक्षिका म्हणून येतात, तेव्हा काय धमाल होते याचे किस्से आहेत. नंतरच्या दोन कथेत बुलोसानच्या बापाने आपले अर्धे घर लग्नाचा आहेर म्हणून एकाला दिल्यावर, काय गहजब होते, आणि बाप कसे मरण्याचे सोंग घेऊन घर सोडून गेलेल्या आईला परत आणतो, याची हिंदी चित्रपट स्टाईल कथा येते. नंतरच्या कथेत लग्नासाठी मुली पाहणे आणि सोयरिक जमवणे हे प्रसंग आहेत, जे आपली वाटत नाहीत. बापाला एक पांढरा घोडा आवडतो, आणि तो विकत घेण्यासाठी बेरकी बाप काय काय उद्योग करतो ते येते. नंतरच्या कथेत परागंदा झालेला बुलोसानचा एक काका घरी येतो, जो देखील बेरकीच असतो. आपल्या प्रत्येकाच्या घराण्यात अशी कोणीतरी एक व्यक्ती असतेच, माझाही एक काका असा परागंदा होता, ज्याला मी आयुष्यात एकदाच पाहिले आहे.

नवव्या कथेत कार्लोस बुलोसानचा भाऊ(तो ही बेरकीच) आणि बाप कसे एकमेकांना शह-प्रतीशह देतात हे लेखक सांगतात. नंतर, टकरीच्या एडक्याची, ज्याला बुलोसानचा उलकोची बाप घरी घेऊन आल्यानंतर जो अभूतपूर्व गोंधळ होतो, त्याची गंमत येते. शेवटील दोन कथा ह्या कोंबड्यांची झुंजीशी निगडीत आहेत. कोंबड्यांची झुंज आपल्याला परिचित असते(मी तरी ही लहानपणी बऱ्याच वेळा आमच्या चाळीतील लुंग्यामधील उडपी लोक हे उद्योग करायचे). तर ही झुंज जिंकण्यासाठी हा बेरकी बाप काय काय करतो हे वाचून हसू आल्याशिवाय रहावत नाही. ह्या जिंकलेल्या कोंबड्याला आणखीन एका मोठ्या झुंजीसाठी तयार करण्यायचा उद्योगाला हा बाप असताना, घरी गरिबीमुळे खायला काही नसल्यामुळे, वैतागलेल्या आईने, ह्या कोंबड्याचे कालवण बनवते आणि ह्या बेरकी बापाला चांगलाच धडा शिकवते, हे सर्व शेवटील कथेत येते.

इंटरनेटवर कार्लोस बुलोसानचा जरा शोध घेतला तर आपल्याला असे दिसेल की त्यांनी इतर बरीच पुस्तके लिहिली आहेत. America is in the heart हे त्यातील अधिक प्रसिद्ध. त्याने सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही अमेरिकेत काम केले. २०१४ मध्ये त्याची जन्मशताब्दी साजरी झाली. अश्या या Filipino American असलेल्या कार्लोस बुलोसानचे संग्रहालय देखील Seattle यां शहरी आहे. स्थलांतरित लोकांनी अमेरिकेत केलेल्या योगदानाची माहिती देणारी बरीच संग्रहालये आहेत. त्यातील काही मी पाहिलेली आहेत. त्याबद्दल लिहीनच केव्हातरी. पण, पुढच्या अमेरिका भेटीत हे बुलोसानचे संग्रहालय पाहण्याचा प्रयत्न करायला हवा.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s