सर्कस सर्कस, भाग#1

मध्ये केव्हा तरी हा राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ हा सिनेमा पाहत होतो. तो सर्कस, विदुषक यांच्या जीवनावर आहे. खूप वर्षांपूर्वी हिंदी मध्ये शाहरुख खानची सर्कस नावाची एक मालिका देखील होती, ज्यात सर्कशीचा जीवनाचे चित्रण होते. मी स्वतः लहानपणी एक दोनदा पुण्यात सर्कस पाहिल्याचे धुसरसे आठवते आहे. भारतात सर्कस सुरु करणारी पहिली व्यक्ती मराठी होती(विष्णुपंत छत्रे) असे असले तरी मराठीत असा एखादा सिनेमा असल्याचे मला माहीत नाही. पण मराठीत सर्कशीतील जीवनावर असलेली काही पुस्तके आहेत, बालसाहित्य तर बरेच आहे. सर्कस, आणि जादू हा आपल्या सर्वांच्या भावजीवनाचा भाग असतो, प्रामुख्याने लहानपणी. सर्कस(आणि जादू देखील) पाहताना आपल्याला एका अद्भूत, अचंबा करणाऱ्या जगात घेऊन जाते. पुण्यात(किंवा कुठल्याही गावात) जेव्हा सर्कस येते(प्रामुख्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत), तेव्हा ते आपल्याला वर्तमान पत्रातील जाहिरातीमुळे, रिक्षातून भोंगा वाजवत जाहिरातीमुळे आपल्याला ते समजते. जाता येता आपल्याला तो रोषणाई केलेला मैदानावरचा, अथवा नदीकाठचा सर्कशीचा तंबू खुणावत राहतो. पण अर्थातच ह्या झगमगाटाच्या पलीकडे पडद्यामागचे जग अतिशय वेगळे आणि खडतर असते हे अश्या सिनेमा आणि पुस्तकातून आपल्याला कळते.

सर्कशीशी निगडीत दोन-तीन पुस्तकांबद्दल मी लिहिणार आहे. एक म्हणजे ‘सर्कसबरोबर चाळीस वर्षे’ आणि दुसरे म्हणजे ‘सर्कस सर्कस’. पहिले आहे बंडोपंत देवल यांचे. दुसरे आहे ते श्यामला शिरोळकर यांचे. तिसरे आहे ते दामू धोत्रे यांचे पुस्तक-वाघ सिंह माझे सखे सोबती. विष्णुपंत छत्रे यांच्या जीवनावर पुस्तक दुर्दैवाने नाही, पण पूर्वज मध्ये कानिटकर यांनी थोडेसे त्यांच्याबद्दल लिहिले आहे. बंडोपंत देवल आणि दामू धोत्रे यांची पुस्तके म्हणजे ती आत्मचरित्रे आहेत, वैयक्तिक अनुभव आहेत, तर शिरोळकर यांचे पुस्तक हे एकूणच सर्कशीचा विस्तृत इतिहास, आणि इतर बाबी सांगणारे माहितीपर पुस्तक आहे. अमेरिकन, जर्मन, फ्रेंच, रशियन सर्कस व्यवसायाचा, कलेचा इतिहास त्यानी दिला आहे. प्राचीन काळापासून भारतात होत असलेल्या विविध साहसी खेळांचा इतिहास, भारतीय सर्कशीचा इतिहास(जवळ जवळ २५-३० प्रसिद्ध सर्कस कंपन्यांची माहिती, इतिहास), सद्य-स्थिती(२००५ मधील) आणि बरेच संदर्भ असलेली सूची इत्यादींनी हे पुस्तक सजले आहे. पाश्चात्य सर्कशीचे जनक Philip Astley यांच्या बद्दल त्यांनी लिहिले आहे. सर्कस व्यवसायातील वालावलकर, दामू धोत्रे यांचे कुटुंबीय यांच्याकडून त्यांना ही माहिती, संदर्भ मिळाले. विदुषक आणि त्याच्या कलेबद्दल(जी थोडीशी अभिनय कलेकडे झुकते), त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, तसेच पानोपानी विविध छायाचित्रे, रेखाटने देखील आहेत. एक मनोरंजक माहिती पुस्तकात आली आहे, त्याबद्दल सांगतो. १९व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत शुभ-अशुभच्या कल्पना, अंधश्रद्धा समाजात होत्या-जसे की आकाशातील उडत्या तबकड्या, ग्रहण, धूमकेतू वगैरे. १८२९च्या सुमारास काही सर्कसपटू, ते जादूटोणा, चेटूक करतात या संशयाने तुरुंगात डांबले गेले. एकुणात इतिहासाचे दस्ताएवजीकरण आपल्याकडे होत नाही, त्या पार्श्वभूमीवर हे सर्कस विश्वावरील पुस्तक नक्कीच मौल्यवान आहे.

IMG_0583

बंडोपंत देवल यांच्या १९८२ मधील पुस्तकात त्यांचे स्वतःच्या सर्कस व्यवसायातील अनुभव कथन आहे. त्यांच्या काकांकडून(म्हणजे सर्कससम्राट बाबासाहेब देवल) त्यांना सर्कस मिळाली, आणि अकरा वर्षांपासून ते त्यात काम करायला लागले. सर्कशीतील राजकारण, सिंगापूर, अफगाणीस्तान, त्यावेळचे मद्रास येथे दौरे, मैसूर आणि निजामातील दरबारात सादरीकरण हे सर्व रोमांचित करणारे आहेत. मिरजेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली भेटीचे अनुभव, नंतर दुसऱ्या महायुद्धाची झळ सोसत रेटलेली सर्कस, जी अक्षरशः तारेवरची कसरतच झाली. गांधीवधाच्यावेळेस झालेल्या जाळपोळीत, लुटालूटीमध्ये सर्कस देखील लुटली गेली.  त्यानंतर देवल सर्कसची अखेर हे सर्व आपल्याला त्या काळात घेऊन जाते. सर्कसच्या जगात नावाचे एक प्रकरण पुस्तकात आहे, ज्यात लेखकाने सर्कस मध्ये काम कसे चालत असे त्याबद्दल त्यांनी लिहून ठेवले आहे. प्राण्यांना कसे कसरतीचे प्रशिक्षण कसे दिले जाई, याबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ते मराठी माणसाच्या योगदानाबद्दल  लिहितात की जसं संगीत नाटक, सांगली मिरज भागात सुरु झाले, त्याच प्रमाणे भारतीय सर्कस विष्णुपंत छत्रे यांनी सांगली मिरज भागात १८८३ मध्ये Grand Indian Circus नावाने सुरु केली. पूर्वी कश्या मराठी संगीत नाटक मंडळ्या असत, त्याच प्रमाणे मराठी सर्कस मालकांच्या सर्कस मंडळ्या असत. तो एक संगीत नाटकांप्रमाणे एक सुवर्णकाळच होता. या संगीत नाटक मंडळ्याप्रमाणे, मराठी सर्काशीची भरभराट झाली. आणि नंतर हळू हळू केरळी सर्कसवाले आले आणि त्यांनी मराठी सर्कसवाल्यांची पीछेहाट झाली. त्याचबरोबर मराठी मनोवृत्तीवर देखील बोट ठेवतात.

महाराष्ट्रातील संगीत नाटक मंडळ्या आणि सर्कस कंपन्या यांची तुलना करण्याचा मोह टाळता येत नाही. दोन्हीच्या उदय आणि उत्कर्षाचा काळ साधारण १००-१२५ पूर्वीचा. दोघांचा व्यवसाय लोकांचे मनोरंजन करण्याचा. मराठी जनच चालक, मालक. दोन्ही व्यवसाय फिरतीचे. मोठा संसार, आणि लटांबर घेऊन एका गावातून दुसरीकडे भटकंती करावी लागत असे. सर्कशीच्या कुटुंबात अर्थातच माणसांशिवाय प्राणी, पक्षी देखील असत. एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकूण जीवन, सण-समारंभ, सुख, दुःखाचे प्रसंग येथेच घडत असत. दोन्ही ठिकाणी स्त्री कलाकार आवश्यक, पण स्त्रिया त्या काळात सहज ह्या दोन्ही व्यवसायात येत नसत. चित्रपट युग सुरु झाले आणि दोन्ही व्यवसायांना उतरती कळा लागली. फरक इतकाच की सर्कस साऱ्या देशभरात आणि परदेशात देखील जात असे, पण संगीत नाटक महाराष्ट्राच्या बाहेर विशेष गेले नाही.

अशी ही दोन पुस्तके, सर्कस ह्या आता दुर्लक्षित विषयावरील आहेत. दामू धोत्रे यांच्या पुस्तकाबद्दल आणि सर्कशीबद्दल इतर गोष्टी पुढील ब्लॉगमध्ये.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s