चले जाव चळवळ आणि गांधीवधानंतरची दंगल

१९४२ची चले जाव चळवळ जी ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकाराचे धोरण म्हणून सुरु झाली त्याला ह्या वर्षी(अगदी उद्याच, म्हणजे ऑगस्ट ८ ऱोजी) ७५ वर्षे होत आहेत. ह्याला छोडो भारत असेही नाव आहे. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी खरे तर चले जाव चळवळीच्याही आधी प्रतीसरकार स्थापन केले. अनेक जण या चळवळीत सहभागी झाले आणि भूमिगत होऊन काम केले. त्यावेळच्या, काळाच्या परिस्थितीचे दस्ताऐवजीकरण मराठी तरी विशेष झालेले माझ्या ऐकिवात नाही. त्याच प्रमाणे गांधीवधानंतर जी दंगल, जाळपोळीची, हत्याकांड अशी परिस्थिती उद्भवली तीचे देखील अभावानेच दस्ताऐवजीकरण झालेले दिसते. मात्र फाळणीचे अनेक तऱ्हेने(चित्रपट, साहित्य इत्यादी) झाले आहे.

चले जाव चळवळीच्या पंचाहत्तरीनिमित देशभर बरेच कार्यक्रम होतील, पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या वेगळ्या शैलीत हा दिवस कसा साजरा करता येईल याबद्दल सूचना केल्या आहेत, तेही योग्यच आहे म्हणा. योगायोगाने मी नुकतेच व्यंकटेश माडगुळकर यांचे कोवळे दिवस हे चले जाव चळवळीचे अनुभव कथन करणारे पुस्तक वाचले. तसेच त्यांचेच वावटळ हे देखील गांधीवधानंतरच्या परिस्थितीचे दाहक अनुभव सांगणारे पुस्तक पाठोपाठ वाचले. दोन्ही पुस्तके वैयक्तिक अनुभव कथन करणारी असल्यामुळे खूप परिणामकारिक झाली आहेत. दोन्हीही छोटी पुस्तके आहेत, पण खिळून ठेवणारी आहेत. दोन-तीन बैठकीत वाचल्याशिवाय चैन पडत नाही अशी ती आहेत.

तसे पहिले तर दोन्ही पुस्तके व्यंकटेश माडगुळकर यांच्या आयुष्यातील विशिष्ट कालखंडातील घटना सांगते, त्यामुळे आत्मचरित्रात्मक, आत्मनिवेदनात्मक अशी ती आहेत. त्यांनी चले जाव चळवळीमध्ये भाग घेतला तेव्हा ते १९-२० वर्षांचे होते, म्हणून पुस्तकाचे नाव कोवळे दिवस. आपल्याला माहिती आहेच लेखक माणदेशातले. पुस्तकातील अनुभव हा सर्व त्याच परिसरातील-सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज भागातील. काही भाग संस्थानिकांच्या ताब्यात, तर काही ब्रिटिशांच्या. पहिल्या काही पानातील अनुभवकथन जबरदस्त आहे. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागलेला असतो, तो चुकवत, कोल्हापूर भागातील त्यांची लपाछपी त्यांनी चित्रित केली आहे. क्रांतीकारकांची मानसिकता कशी असावी लागते याचेही ते विविध दाखले देऊन विवेचन करतात. स्वातंत्र्य लढ्यात पडण्याआधी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न फसला होता. खादी भांडार आणि भूमिगत कार्यकर्त्यांच्या संपर्काने ते लढ्यात ओढले गेले, जवळ अडीच वर्षे त्यात होते, सामान्य लोकांकडून सोनेनाणे चोरून स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केले. कसे तरी ते पोलिसांपासून निसटले, आपल्या गावी आले. नंतर प्रतीसरकारचे लोण गावी पोहचले त्याबद्दल लिहितात. प्रतीसरकारला पत्रीसरकार असे म्हणत असत हे समजते. निवेदनाच्या ओघात त्या कोवळ्या वयात झालेल्या आकर्षणाचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. त्याचे वर्णन वावटळ या पुस्तकात येते. तसेच चित्रकारीतील उमेदवारीबद्दलही ते लिहितात. आणि शेवटी ते त्या कोवळ्या दिवसांच्या कोवळ्या आठवणींचे स्मरणरंजन काव्यात्मरीत्या करून थांबतात.

लगेच काही वर्षानंतर त्यांनी गांधीवधाच्या नंतरच्या परिस्थितीचा अनुभव अचानक एका प्रवासात असताना घेतला. त्याचे साद्यंत वर्णन वावटळ या कादंबरीत येते. गांधीवधाच्या दिवशी लेखक पुण्यात असतात, त्यांचे शिक्षण सुरु असते. पुण्यात लगेच कर्फ्यू लागलेला असतो. सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण असते. त्यामुळे लेखक, आणि त्यांचे गावाकडचे दोन मित्र गावी जाण्यास निघतात. त्यानंतरची कादंबरी म्हणजे वाटेत आलेले दाहक, आणि द्वेषाच्या वातावरणाचे अनुभव कथन आहे. ह्या घटनेनंतर समाजमनाचे झालेल्या संक्रमणाचे चित्रण म्हणजे हे पुस्तक. सगळेच लोक एकमेकांवर अविश्साने पाहत असतात. मजल-दरमजल करत जात असता, मिळेल त्या वाहनाने, कधी चालत घरची वाट त्यांनी धरलेली असते. बेफान झालेले लोक, कशाचाही विधीनिषेध न बाळगणारे लोक हे सर्व पाहून त्यांचे मन उद्विग्न होते. तिन्ही मित्रांचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच. ह्या प्रवासात त्यांनी एका वावटळीचाच अनुभव घेतला असे म्हणता येईल. ह्यातील काही घटनांचे संदर्भ दोन्ही माडगुळकर बंधूंच्या इतर पुस्तकातूनही आहेत.  उदाहरण द्यायचे झाल्यास करुणाष्टक मध्ये ते येते, ज्यात आईच्या करारी स्वभावाचे दर्शन दंगलीच्या वेळेस निर्माण झालेल्या परिस्थितीस तोंड देत असता घडते.

ह्या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे समाजावर झालेले परिणाम खोल आहेत. देशातील इतर भागात, इतर भाषेतून याचे चित्रण झाले असणार. ते जर मराठी अथवा हिंदी/इंग्रजीमध्ये असेल तर नक्कीच वाचायला आवडेल.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s