डळमळले भूमंडळ

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जवळ असलेल्या माळीण गावी तीन वर्षांपूर्वी पावसाच्या दिवासात मोठी दरड कोसळून, त्याच्या कुशीत वसलेल्या छोट्याश्या गावाला गिळून टाकले. या दुर्घटनेला आता तीन वर्षे झाली. पूर्णच्या पूर्ण गाव उध्व्वस्त झाले होते, त्याचे गेल्या तीन वर्षात पुनर्वसन करण्यात आले. पण आता बातम्या अश्या येत आहेत की पुनर्वसन झालेल्या ठिकाणी बांधलेली घरे निकृष्ट दर्जाची आहेत, घरांना तडे  गेले आहेत, तसेच जमिनी, रस्ते देखील भूस्खलन झाल्यामुळे खचले आहेत, अश्या बातम्या येत आहेत. आता काय अहवाल, चौकशी, समिती ह्या दुष्टचक्रात सर्व अडकणार.

ह्या निमित्ताने यापूर्वी झालेल्या एक-दोन मोठ्या दुर्घटनेच्या आणि त्यामुळे झालेल्या पुनर्वसनाच्या संबंधी असलेल्या पुस्तकांची आठवण झाली. १९७७ मध्ये आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या प्रलयंकारी चक्रीवादळामुळे झाले होते. प्रभाकर पेंढारकर यांनी  चक्रीवादळ या पुस्तकात त्याबद्दल लिहिले आहे. फ्रेड क्युनी(Fred Cuny) याने केलेल्या आणि सुचावालेल्या उपायांचे त्यांनी वर्णन केले आहे. त्या बद्दल मी येथे लिहिले होते. त्याच प्रकारे महाराष्ट्रात देखील १९९३ मध्ये लातूर मध्ये जो विनाशकारी भूकंप झाला, त्याचे आणि त्यानंतर झालेल्या पुर्वासानाचे, तसेच लॉरी बेकर(Laurie Baker) यांनी केकेल्या कामाचा लेखजोखा अतुल देऊळगावकर यांनी  डळमळले भूमंडळ या पुस्तकात दिला आहे. लॉरी बेकर यांच्या एकूणच जीवनाचा, कार्याचा परिचय करून देणारे दुसरेही पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

डळमळले भूमंडळ हे पुस्तक १९९७ मधील आहे(म्हणजे लातूर/किल्लारी भूकंपानंतर चार वर्षांनी), ग्रंथालीने प्रकाशित केलेले आहे. अतिशय तळमळीने आणि संवेदनशील रीतीने त्यांनी हे वाचनीय पुस्तक लिहिले आहे. एकूणच भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप, मदतीच्या, पुनर्वसनाच्या कार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश, यावर प्रत्यक्ष अनुभवांवर लिहिले आहे. एकूण १५ प्रकरणे आहेत, पण प्रकरणांना शीर्षके नाहीत. लातूर/किल्लारी आणि आसपासची १५-१६ गावे या भूकंपाने बाधित झाली होती. येथे मध्ये एवढी जीवितहानी का झाली याची कारणमीमांसा, नवीन घरे बांधताना काय करायला हवे होते, काय केले गेले याचे कठोर परीक्षण येते. लॉरी बेकर यांनी सांगितले होते की नवीन गावे न वसवता, आहे त्याच ठिकाणी त्यांनी सुचववेल्या तंत्राप्रमाणे घरे बांधली असती तर, सदोष पुनर्वसनाचे कित्येक सामाजिक दुष्परिणाम टाळता आले असते. शरद पवार, विलासराव देशमुख, प्रवीणसिंह परदेशी या सारखे राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी घेतलेले निर्णय, काम यावर त्यांनी सखोल लिहिले आहे.

‘आनंदवन’चे डॉ. विकास आमटे यांनी केलेल्या घर-बांधणी प्रयोग याचीही माहिती समजते. डॉ. यंदे सारखे मानसोपचारतज्ञ यांनी त्यावेळी केलेल्या समुपदेशनाचे काम देखील ते सांगतात(post traumatic mental disorder). अश्या मोठ्या आपत्तीच्या वेळेस सरकारी यंत्रणा, सेवाभावी संस्था हे सर्व काम करण्यासाठी पुढे येतात, पण या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक असतो. तो नसेल तर काय होवू शकते याचे विदारक चित्र ते रेखाटतात. प्रभावी संवाद नसल्यामुळे अफवाना उत येतो. जसे की भूकंप परिसरात युरेनियम सापडल्याची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणाम याबद्दल अफवा पसरली आणि त्यामुळे झालेले परिणाम याचे वर्णन येते.  शेवटच्या प्रकरणातून ते ‘भूकंप: आपले आणि त्यांचे’ या प्रकरणातून जपान, अमेरिका, चीन मधील भूकंप, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन यांची तुलना भारतातील परिस्थितीशी केली ती देखील उद्बोधक आहे. माहितीपूर्ण अशी ६ परिशिष्टे देखील पुस्तकात आहेत. विस्तृत संदर्भसूची देखोल त्यांनी दिली आहे. पुस्तकात विविध पानांवर सतीश भावसार यांची रेखाटने आहेत, जी अतिशय बोलकी आहेत. सुरुवातीला असलेले ‘कल्लोळ’ असे शीर्षक असलेले मनोगत तर अतिशय भावपूर्ण आहे. त्यांच्या जीवनावर राशोमान या जपानी चित्रपटाचा प्रभाव देखील ते नमूद करायला विसरत नाहीत.  असे हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे आणि माळीण संदर्भात तपासून पहिले पाहिजे.

माळीणचे, खूप मोठा गाजावाजा करत पुनर्वसन काम पूर्ण करून झाले. स्मार्ट माळीण असे संबोधण्यात आले. पण एकूण परिस्थिती पाहता आणखी बरेच काही करता येण्यासारखे आहे असे दिसते. वरील दोन पुस्तकांसारखे माळीणवर देखील एखादे पुस्तक यावे, म्हणजे पुढील काळात त्यापासून काही शिकता येईल. माळीण काय किंवा लातूर/किल्लारी काय, आणखीन इतर ताज्या घटना काय, या सर्व नैसर्गिक(किंवा इतर मानवनिर्मित) आपत्ती आहेत. त्याचे व्यवस्थापन, त्यातून पुनर्वसन हे सर्व कठीण काम असते. सर्व अत्याधुनिक साधने असूनही, अश्या आपत्तींचे इष्टापत्ती मध्ये रूपांतर करण्याची संधी, एकूणच दूरदृष्टीचा अभावामुळे, गमावली गेली, आणि सुरु राहिले ते दुष्टचक्र(पानशेत धारण फुटल्यामुळे पुण्यात १९६१ मध्ये पूर आला. त्यावेळेस पुण्याचे स्वरूप बदलून टाकण्याची त्या काळचे आयुक्त स. गो. बर्वे यांची योजना सफल झाली नाही, हे उदाहरण याचेच आहे). माझे गेल्या काही वर्षातील काम देखील असेच आपत्ती व्यवस्थापनाचे आहे. पण क्षेत्र थोडेसे वेगळे आहे. एक आहे व्यावसायिक म्हणजे information technology मधील disaster recovery. या बद्दल लिहीन कधीतरी विस्ताराने. आणि दुसरे आहे ते सेवाभावी, म्हणजे मानसिक आजारामुळे निर्माण झालेल्या वैयक्तिक/कौटुंबिक आपत्तीमधून कसे बाहेर यायचे, त्याचे कसे व्यवस्थापन कसे करायचे, त्याच्याशी निगडीत आहे. त्याबद्दल मी माझ्या ब्लॉग वर नेहमीच लिहीत आलो आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s