आहुपे, भाग#१(निसर्ग पर्यटन)

महाराष्ट्र हा दऱ्या-खोऱ्याने, डोंगर कडांनी नटलेला प्रदेश आहे. सह्याद्रीत किल्ल्यांची रांगच आपल्याला दिसते. पावसाळ्यात तर हा सह्याद्री आणखीन नटून जातो. हिरव्या रंगाची सगळीकडे उधळण, ठिकठिकाणी ओघळणारे छोटे मोठे धबधबे, धुके, उन-पावसाचा खेळ, असा सर्वत्र नजारा असतो. म्हणून तर गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटन, विक-एन्ड पर्यटन वाढीस लागले आहे. त्याच्या जश्या चांगल्या बाजू आहेत, तश्या वाईट बाजू देखील आहेत. मी तसा ट्रेकर, सह्याद्रीत १२-१५ वर्षांपासून खूप भटकलेला. पण ह्या गेल्या काही वर्षातील परिस्थितीमुळे, मी थोडासा ह्या अनिर्बंधित पर्यटनापासून लांबच राहिलो होतो.

आहुपे या ठिकाणाचे(किंवा अहुपे) नाव आधीपासून ऐकतो आहे. काही वर्षांपुर्वी गोरखगड, सिद्धगड ट्रेकच्या वेळेस संदर्भ आला होता. हा ट्रेक आम्ही कोकणातून केला होता. आहुपे घाट(म्हणजे घाटवाट, नाणे घाटासारखी) जी घाटप्रदेशावरून कोकणात खालीवर करायला, असलेली जुनी-पुराणी पायवाट आहे त्याबद्दलही ऐकले होते. तसे पहिले तर अश्या घाटवाटा सह्याद्रीत ठिकठिकाणी आहेत. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आहुपेत रानभाजी महोत्सव हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो असे ऐकले होते. ह्या वर्षी तेथे भेट द्यावी असे ठरवले. आहुपे हे भीमाशंकर अभयारण्यातील अगदी टोकाकडील छोटेसे गाव. तसे पहिले तर पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव. महादेव कोळी नावाच्या आदिवासी लोकांचे प्रामुख्याने वास्तव्य तेथे आहे. तसे पहिले तर अभयारण्य म्हटले की त्याची परिक्षेत्रातील बऱ्याचदा गावांचे पुनर्वसन केले जाते, किंवा, त्यांच्यावर बरेच निर्बंध लागू होतात. जंगलं, वन्यजीव, आणि मानव यांच्यातील ह्या सर्व प्रश्नाचा उहापोह काही वर्षांपूर्वी पश्चिम घाट बचावो आंदोलनाने केला होता.

आपण भीमाशंकर देवस्थान, तसेच अभयारण्यातही शेकरू पाहायला गेलेलो असतो. पुण्यापासून राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव करत भीमाशंकरचा रस्ता सुधारायचा. घोडनदीवरील डिंभे धरण ओलांडायचे आणि आहुपेच्या दिशेने जायचे. हा सर्व परिसर देखील निसर्गरम्य आहे हे सांगायला नकोच. आहुपेचा रस्ता ह्या धरणाच्या काठाकाठाने कित्येक किलोमीटर जातो. वाटेत कित्येक ठिकाणी थांबण्याचा मोह होतो.

पुढे मग डोंगरच्या कुशीत वसलेले माळीण गाव आहे, जेथे २०१४ मध्ये भूस्खलन होऊन डोंगराने ते गावच गिळंकृत केले होते. तेथे आता जीव गमावलेल्या गावकऱ्यांच्या स्मरणासाठी स्मृतीस्तंभ उभारला आहे. जवळच नवीन माळीण हे गाव वसवले आहे. गावातल्या लोकांशी थोडेसे बोललो, त्यांना रजई वगैरे करण्यासाठी असा रोजगार उपलब्ध करून दिला गेला असे कळाले. पण परवा परवाच पुनर्वसन कामाचा(घरे, रस्ते) दर्जा चांगला नाही, अश्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या. एखाद्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतरीत करण्याची संधी गमावली गेली असे वाटले. ह्या संबंधी मी नुकतेच येथे लिहिले होते.

IMG_0709

असो. ही सर्व डोंगराच्या कुशीत लपलेली कित्येक गावे, वाड्या, वस्त्या ओलांडत आपण आहुपेत दाखल होतो. आणि आजूबाजूचा नजारा पाहून आपले भानच हरपते. पण थोडेसे पायपीट करण्याची तयारी हवी. गावात आपण कोणाही गावकऱ्याच्या घरात, झोपडीत मुक्काम करू शकतो, तेथेच जेवणाची सोय करता येते. आम्ही सुनिता पारधी यांच्याकडे मुक्काम टाकला. गेल्या गेल्या आम्ही चुलीवरील गरम गरम भाकऱ्या, मऊसार पिठलं, हातसाडीच्या तांदळाचा भात यावर ताव मारला, आणि मग तडक पायपिटीकरता कुच केले.

गावातल्या एकाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतले. सभोवार नजर फेकली, स्वच्छ हवेचा छातीभरून श्वास घेतला. दुरवर ढगात लपलेले हिरवे डोंगर, हिरवे पठार, आदिवासींच्या झोपड्या, काळा डांबरी रस्ता हे सर्व विलोभनीय दिसत होते. पहिल्यांदा भैरोबाचे दर्शन आणि नंतर देवराईत जराशी चक्कर मारली. ही देवराई म्हणावी की आमराई हा प्रश्न पडावा, इतकी आंब्याची झाडे आहेत. देवराया ह्या निसर्ग संरक्षणाची कामगिरी फार छान रीतीने पार पडतात, भले मूळ उद्देश गावकऱ्यांचा, आदिवासींच्या श्रद्धेचा असू दे, पण त्यामुळे जंगल वाचते, मानवी हस्तक्षेपाशिवाय राहते. पुण्यात देखील देवराई महोत्सव घेतले जातात, त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते. आहुपेत आणखीन देखील २-३ देवराया आहेत.

भैरोबाची देवराई पाहिल्यानंतर, आम्ही मोर्चा वळवला तो सह्यकड्याच्या बाजूने फिरण्याचा. आहुपे हे गाव, त्याच्या वाड्या वस्त्या, समुद्र सपाटीपासून साधारण ३८०० मीटर उंचीवर एका विस्तीर्ण पठारावर वसले आहे. एका बाजूला सह्यकडा आहेत, आणि बाकीच्या बाजूने डोंगर आहे. ह्या सह्यकड्याच्या बाजूने फिरत, विविध नजारे पाहत फिरणे हा अतिशय सुखद अनुभव आहे जो अवर्णनीय आहे. खालच्या कोकण भागाचा विस्तृत परिसर नजरेस पडत राहतो. गोरखगड आणि बाजूलाच मच्छिंद्रगड अशी किल्ल्यांची जोडगोळी दिसत राहते. छोटेमोठे धबधबे दिसत राहतात. धुके की ढग हे न कळण्याइतके, ते आपल्या आजूबाजूला राहतात. असे तास दीडतास फिरल्यानंतर, पाय दुखायला लागले, अंधारही पडायला लागाला त्यामुळे नाईलाजाने पावले परत गावात मुक्कामाच्या ठिकाणी वळवली.

गावात पोचतो न पोचतो जोराचा पाऊस सुरु झाला, आणि सारा आसमंत ढगात आणि अंधारात बुडून गेला. गवती चहा टाकलेला वाफाळलेला चहा पिऊन सुखावलो. थोड्या वेळातच अंगणात शेकोटी पेटली. गावातली काही मुले पारधी यांच्या घरी आली. आमचे सह-मुक्कामी अमोल पंडित जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत, तेही तेथे आले होते. ते या भागात मुलांच्या साठी मदतीचे काम करतात. त्यांनी माग तास दोन तास मुलांशी गप्पा मारल्या, खेळ खेळले, आम्हीही त्यात थोडेफार सहभागी झालो. उद्या सकाळी काय काय पाहायचे आहे याची चर्चा केली. आहुपे घाट, धबधब्याचे जवळून दर्शन करायचे ठरले. आहुपेवरून भीमाशंकर हा ट्रेक आहे जो १३ किलोमीटरचा आहे तो देखील करता येतो(मी पूर्वी भोगिरी किल्ल्यावरून भीमाशंकर असा ट्रेक केला होता). अजूनही बरच काही पहायासारखे आहुपेत. गेली दोन-तीन वर्षीपासून सुरु झालेला, रानभाजी महोत्सव कार्यक्रम देखील होताच(त्याबद्दल पुढील ब्लॉग मध्ये लिहीनच). चुलीवरील जेवणाचा सुवास दरवळत होता. भुका लागल्याच होत्या. कुर्डू नावाच्या रानभाजीची परतून केलेली भाजी, शेवाळाच्या कंदाची चटणी, तांदळाची भाकरी असा बेत होता. जेवणावर ताव मारून, परत एकदा अंधारात फेरफटका मारून निद्रेच्या स्वाधीन झालो.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s