आहुपे, भाग#२(रानभाजी महोत्सव)

माझ्या मागील ब्लॉग मध्ये आहुपे या आगळ्या वेगळ्या ठिकाणाच्या पावसाळी निसर्ग पर्यटनाचा अनुभव मी सांगितला होता. त्याच भटकंतीत अजून एक वेगळा अनुभव मी घेतला. वनवासी कल्याण अश्राम ही समाजसेवी संस्था गेली ५०-६० वर्षे वनवासी, आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते आहे. त्या संस्थेच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे गेली दोन वर्षे रानभाजी महोत्सव असा आगळा वेगळा महोत्सव आहुपे, जुन्नर जवळील कुकडेश्वर आणि तळेरान या तीन ठिकाणी केला जातोय. त्याबद्दल खूप उत्सुकता होतीच. महाराष्ट्र सरकारची एक Tribal Research and Training नावाची एक संस्था पुण्यात आहे, तेथे मी पूर्वी एकदा गेलो होतो.

IMG_0828

माझ्या आहुपेच्या वास्तव्याच्या दुसऱ्या दिवशी हा रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम होता. रानभाज्या म्हणजे सहसा शहरी भागात न आढळणाऱ्या भाज्या. जंगलात, शेतात, बांधांवरून आपोपाप उगवल्या जाणाऱ्या अश्या ह्या भाज्या. प्रामुख्याने पावसाळ्यात, काही महिने ह्या असतात. जसे कासच्या पठारावर पावसाळ्यातील काही दिवसच काही विशिष्ट फुले, रानफुले येतात, आणि काही दिवसातच ती नष्ट होतात, तसाच हा काहीसा प्रकार. अश्या ह्या रानभाज्यांची माहिती, अर्थात, जंगलात राहणाऱ्या,वनात शेती करणाऱ्या वनवासी, आदिवासी लोकांना माहिती असते. ती परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. नुसत्या त्या भाज्यांची माहिती नव्हे तर, त्या स्वयंपाकात, खाण्यात कशा वापराव्या याचे देखील पिढीजात ज्ञान त्यांच्याकडे असते. यातील बऱ्याच भाज्या औषधी गुणधर्म देखील असलेल्या असतात. या सर्वांचे एका तऱ्हेने दस्ताऐवजीकरण व्हावे, तसेच ह्याची माहिती इतरांना पोहोचावी, त्यातून आदिवासी लोकांना चार पैसे देखील मिळावे हा अश्या कार्यक्रमाचा उद्देश. आहुपे हा भाग देखील पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा आणि यां निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ह्या वनपुत्रांचा, त्याच्या भागाचा शाश्वत विकास व्हावा हा प्रमुख हेतू.

पुण्यातून वनवासी कल्याण आश्रमातर्फे पर्यटकांना आहुपेत ह्या कार्यक्रमासाठी, आश्रमाच्या अंजली घारपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले. वनवासी कल्याण आश्रमाची स्मरणिका सर्वाना देण्यात आली, ज्यात त्यांच्या उपक्रमाबद्दल, इतिहासाबद्दल माहिती दिली होतो. सकाळी १० वाजता आहुपेतील शासकीय आश्रम शाळेत सगळे जमले. नाश्ता आणि नाचणीचे गरम गरम असे आंबट गोड आंबील देऊन स्वागत करण्यात आले. तेवढ्यात पावसाने देखील जोरदार सरी वर सरी झाडून जणू काही स्वागतच केले. आहुपे गावातील वाड्या, वस्त्यामधून अनेक महिला(लहान मुलींपासून ते आजी/मावशीपर्यंत सर्व) नटून थटून हातात त्यांनी बनवलेली रानभाजी, भाकरी यांनी सजलेले ताट घेऊन कार्यक्रम स्थळी येत राहिल्या. हॉल मध्ये भिंतींवर २५-३० रानभाज्यांची माहिती देणारी विविध भित्तीपत्रके लावली गेली होती. आलेल्या महिला आपापल्या जागी बसून त्या चाखायला येणाऱ्यांना त्याची माहिती उत्साहाने देत होत्या. आम्ही सर्व पर्यटक, तसेच नेमून दिलेले परीक्षक, ह्या सर्व भाज्या चाखत, खात फिरत होतो. प्रत्येक ठिकाणचे भित्तीपत्रक वाचून माहिती करून घेत होतो. मला एका तऱ्हेने खूप वर्षांपूर्वी केलेली अमेरिकेतील Napa Valley मधील wine tasting ची ट्रीप आठवली.

रुखाळ, भोकर, तेरा, आबई,  काट माट, कर्दुला, कोंदर, कुर्डू, तोंडेची भाजी, चावा, टाकळा, कुसरा, करंज, भारंगी, चिंचूरडा, रताळ कोंब, गोमेटी, हळदा, महाळुंग, खुरासणी, कोंभाळा अश्या भाज्यांची माहिती देणारी पत्रके लावली होती. त्यातील बऱ्याच भाज्या महिलांनी आणल्या होत्या. कुर्डू खूप जणीनी आणली होती.  काही वेळाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. विविध मान्यवरांची भाषणे झाली. अंजली घारपुरे यांनी कार्यक्रमाची कल्पना, स्थानिक लोकांचे सहकार्य याबद्दल बोलत, सहभागी महिलांचे कौतुक केले. डॉ. भोगावकर, ज्या वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत, त्यादेखील एकूण परंपरा जपण्याचे आवाहन करत, कार्यक्रमाचे स्वागत केले. त्यांनी ह्या Wild Edibles of Vidarbha नावाचे  एक पुस्तकही लिहिले आहे. वनवासी कल्याण संस्थेतर्फे देखील रानभाज्यांच्या माहितीचे संकलन असणारे पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करत आहे. परीक्षकांतर्फे स्पर्धेचे निकाल जाहीर करून, विजेत्यांचे कौतुक, बक्षीस वितरण, मनोगत हे सर्व झाले आणि हा सोहळा पार पडला.

तेवढ्यात जेवणाची सूचना झाली. मी विचारच करत होतो की ह्या आलेल्या सर्व पर्यटकांचे भोजनाची व्यवस्था कशी होणार. पण सूचना ऐकून चाट पडलो. कल्पना अशी होती की गावातील वनवासी बंधूंकडे त्यांनी प्रत्येक ४-५ लोकांच्या समुहाची जेवणाची व्यवस्था केली होती.  अश्या प्रकारे गावातील १२-१५ जणीना त्यामुळे काही पैसे मिळाले, आणि आम्हा पर्यटकांना त्यांच्या घरात शिरकाव करून त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. बसके घर, उताराचे कौलारू छप्पर, अंधाऱ्या खिळ्या, अंगणात शेळ्या, गायी, कोंबड्या, सरपण. स्वयंपाक घरात चूल. सारवलेल्या घरात, चुलीसमोर बसून पोत्यावर बसून घरातील आजी, मावशी यांच्या सोबत गप्पा मारत गावरान भोजनाचा आस्वाद घेण्यास मिळाला. मला तर माझ्या आजोळची आठवण झाली. माझ्या सुदैवाने माझ्या बरोबर पुणे आकाशवाणीच्या प्रसिद्ध आणि वरिष्ठ निवेदिका अंजली लाळे ह्या होत्या आणि अनपेक्षितपणे त्यांच्या आकाशवाणी संदर्भात गप्पा मारता आल्या. त्यानंतर आम्ही मग गावकऱ्यांकडून स्थानिक वाणाचे  तांदूळ विकत घेतले. सर्वांचा निरोप घेऊन, भाज्यांच्या चावीच्या आस्वादाच्या आठवणी काढत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

एकूणच हा असा अनपेक्षित, आणि वेगळा अनुभव देणारी सहल ठरली. आदिवासी संस्कृती, जीचे विविध आयाम आहेत, त्यातील ही खाद्य-संस्कृती, ती पण जपली गेली पाहिजे. अंजली घारपुरे यांच्या पुढाकाराने नक्कीच हे होईल. प्राची दुबळे यांनी जसे आदिवासी संगीत जपण्यासाठी त्याचा अभ्यास करून, त्याचे रेकॉर्डिंग आणि दस्ताऐवजीकरण केले आहे, किंवा गणेश देवी यांनी भाषा लोकसर्वेक्षण करून आदिवासी बोली भाषेची माहिती संकलित केली, मुकुंद गोखले यांनी गोंडी लिपी तयार केली, तसेच हे आहे. परवाच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला, त्या दृष्टीने ही सहल औचित्यपूर्णच ठरली असे म्हणावे लागेल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s