कानसेन व्हायचंय?

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”. मी तरी आजपर्यंतचे जीवन या उक्ती प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. ही ब्लॉग साईट देखील त्याचाच एक भाग आहे. संगीत, नाटक, चित्रपट, पुस्तके, डोंगरावर, किल्ल्यांवर, जंगलात भटकणे, इतिहास(Indology), भाषा हे सर्व माझे आवडीचे विषय आहेत. अर्थात त्याबद्दल काहीबाही खरडणे, लिहिणे हाही उद्योग आहेच.

आपल्याला गाणी, भावगीतं, किंवा इतर ज्याला सुगम संगीत असे म्हणतो ते सर्वसाधारणपणे भावते, आणि बऱ्याच अंशी शब्द असल्यामुळे समजते. पण भारतीय शास्त्रीय संगीत, किंवा राग संगीत/कलासंगीत जे आहे, ते आपल्याला काही वेळा आवडते, पण समजले असे होत नाही. त्यात शब्द हे अतिशय कमी, किंवा बऱ्याचदा नसतातच. काही वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीत काय आहे, इतिहास काय, त्याचे शास्त्र काय, हे जाणून घेण्याची उर्मी निर्माण झाली. त्याच दरम्यान, ‘शोधा म्हणजे सापडेल’ या वाक्प्रचाराप्रमाणे, एके दिवशी प्रसिद्ध गायक समीर दुबळे यांची संगीत कार्यशाळेची जाहिरात पाहिली. ती होती ३-४ दिवसांची संगीत परिचय कार्यशाळा होती, ज्यात शास्त्रीय संगीताची मूलतत्वे, विविध घराणी, परंपरा, काय आणि कसे ऐकावे, याचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन असणार होते. थोडक्यात काय तर, ज्यांना तानसेन न होता कानसेन कसे व्हावे या बद्दल तो सगळं खटाटोप असणार होता. त्याबद्दल आज लिहायचे आहे.

समीर दुबळे आणि बासरीवादक नितीन अमीन यांनी स्थापन केलेली SPECTRUM(Society for Performing Entrepreneurs and Conscious Training towards Understanding Music) ह्या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होता. स्थळ होते, पुण्यातील गांधर्व महाविद्यालय. दररोज २ तास असे तीन दिवस हा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी कार्यशाळेचे स्वरूप सांगून, सूर संकल्पना, ध्वनी, नाद, याबद्दल माहिती करून देण्यात आली. अर्थात, बरीच प्रात्यक्षिके, सोदाहरण स्पष्टीकरण यामुळे आकलन वाढले. पाश्चिमात्य संगीताची देखील थोडीशी माहिती सांगण्यात आली. भारतीय संगीतातील वेगवेगळे forms त्याबद्दल माहिती करून देण्यात आली. Classical western music आणि popular music मधील फरक कळण्याकरता Strauss, BonyM ह्यांच्या काही रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी ताल, लय पासून सुरुवात करून भारतीय संगीतात राग ही संकल्पना काय आहे याचे विवेचन केले गेले. बंदिश म्हणजे काय, आणि बंदिशीचे महत्व, ब्रज बोली(हिंदी भाषेची एक बोली, जी मथुरा भागात बोलली जाते) याबद्दल देखील चर्चा झाली. त्यानंतर ख्याल गायन जे सध्या प्रचलित आहे, त्याचा इतिहास, अगदी वेदकालीन सामगायन, नंतरचे धृपद गायन पर्यंत कसे संगीत बदलत गेले. तेराव्या शतकापासून मोगल साम्राज्यामुळे झालेली देवाणघेवाण, यामुळे संगीत कसे ख्याल गायनापर्यंत येवून थांबले हे समजले. इतर उपशास्त्रीय गायन प्रकार, जसे की ठुमरी, कजरी, टप्पा याची तोंडओळख करून देण्यात आली.  राग संगीत सादर करण्याची जी सध्याची पद्धत प्रचलित आहे, जसे की बडा ख्याल, छोटा ख्याल, साथीला तबला, पेटी इत्यादी, हे प्रात्यक्षिकासहित समजावले गेले.

तिसऱ्या दिवशी, प्रसिद्ध बासरीवादक नितीन अमीन यांनी शास्त्रीय वाद्य संगीत याबद्दल विवेचन केले. बासरी वर एखादा राग कसा सादर केला जातो, तसेच जुगलबंदी, एकल तबला वादन कसे केले जाते हे दाखवण्यात आले. भारतीय संगीतातील विविध वाद्ये, प्रकार, त्यांची गुण-वैशिष्ट्ये याबद्दल ही माहिती झाली. एकूणच संगीत विश्वाची झलक नक्कीच मिळाली आणि पुढील अभ्यासासाठी कवाडे किलकिली झाली. त्यानंतर थोडे जाणीव पूर्वक ऐकणे, मैफिलींना जाणे, संगीताबद्दल वाचन वाढणे, अश्या गोष्टी सुरु झाल्या आणि माझ्या जाणीवा विस्तारू लागल्या.

संगीताच्या, गाण्याच्या मैफिली, संगीत महोत्सव पुण्यात तर कायम होतच असतात, प्रत्येक वेळी जाणे जमतेच असे नाही. पण पुणे आकाशवाणी वर शास्त्रीय संगीताचे बरेच कार्यक्रम असतात, ते मात्र ऐकू लक्ष देऊन लागलो. हा एक प्रवासच आहे, जो अजून चालूच आहे. संगीत ही प्रयोगक्षम कला असल्यामुळे, काही प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि ऐकण्यात गुणात्मक फरक पडावा म्हणून, मध्ये काही वर्षे पेटी(Harmonium, संवादिनी) शिकण्याचा उद्योग केला, दोन-तीन परीक्षाही दिल्या. हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत अशी जी समृद्ध परंपरा आहे, त्याची थोडीशी झलक पाहायला मिळाली. संगीतज्ञांची चरित्रे, शास्त्र, आणि इतर musicology वरील पुस्तके गोळा करणे, तसेच माझी अजून एक खोड अशी की भारतीय परंपरा आणि पाश्चिमात्य परंपरा यातील फरक, साम्य धुंडाळणे, हेही संगीताच्या बाबतीत सुरु झाले, आणि अजून सुरूच आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जसे हे कालासंगीत आहे, तसेच पाश्चिमात्य देशात, देखील कलासंगीत आहे. त्याला इतिहास आहे, त्याचे शास्त्र आहे, आणि मुख्य म्हणजे तेही शब्दांच्या पलीकडे जाणारे आहे. मागील आठवड्यातच पुण्यात Western Classical Music Appreciation Workshop या नावाची एक कार्यशाळा होती. Music Shack तर्फे Shantanu Datta हे ही कार्यशाळा घेणार होते. प्रामुख्याने Western Classical संगीताचा इतिहासाबद्दल असणार होते. कार्यबाहुल्यामुळे नाही जाऊ शकलो. तर असे आहे. ही कार्यशाळा असेल, किंवा इतर गोष्टी आहेत, त्यासर्वामुळे संगीत रसास्वादाची क्षमता निर्माण होते. ही सर्व अलीबाबाची गुहा आहे, ज्यात फक्त पुढे जात राहायचे, अंत नाही, आणि परत फिरणे देखील अवघड!

शेवटी एक खंत व्यक्त करावीशी वाटतेच. आजकालच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या कलासंगीताचा(किंवा एकूणच) समृद्ध वारसा, परंपरेची आजच्या मुलांना साधी ओळखही आपण करून देत नाही. मी असे ऐकले होते काही पाश्चिमात्य देशात शाळेत आणि घरोघरी एखादे वाद्य किंवा गायन मुलांना शिकवले जाते, आणि नवीन पिढीला त्यामुळे त्याची ओळख होते आणि पुढे ती कला त्यांच्या जीवनात त्यांची साथीदार बनते.

मी अनुभवलेले संगीत कार्यक्रम आणि त्यावर लिहिलेले जरूर माझ्या ब्लॉग वर पहा आणि प्रतिक्रिया कळवा!

ता. क. डिसेंबर ६, २०१९. पुण्यात सालाबादाप्रमाणे सवाई गंधर्व होत आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध संगीततज्ञ आणि संवादिनी वादक डॉ. चैतन्य कुंटे यांनी कलासंगीत कसे अनुभवावे या निमित्त केलेले मार्गदर्शन खालील ध्वनीचित्रमुद्रिकेत फेसबुकवर आहे. त्यांची पूर्वानुमती घेवून येथे ती देत आहे.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s