Star Party

आपण सर्वांनी लहानपणी ध्रुव बाळाची गोष्ट ऐकली असते. तो कसा आकाशात एक तारा बनून अमर रहिला. मी ही ती ऐकली होती. पण त्यामुळे काही मला या आकाशातल्या ताऱ्यांचे विशेष आकर्षण निर्माण झाले नाही. एक मात्र होते, मी जेव्हा जेव्हा आजोळी जायचो तेव्हा अंगणात रात्री अंथरुणावर पडल्यावर वर मोकळे आकाश दिसे. सभोवती गुडूप अंधार, प्रकाश प्रदूषण नावाचा प्रकार अस्तित्वात नसे. त्यामुळे लख्ख चांदण्या दिसत, आणि आम्हा  सर्व चिल्ली-पिल्ली मुलांत आकाशातील तारे, तारकासमूह, नक्षत्र ओळखण्याची चढाओढ लागे. धमाल येई, आणि असे करत करत गोष्टी ऐकत आम्ही झोपत असू.

जसे जसे मोठे होत गेलो हे आकाशदर्शन मागे पडले. मध्येच केव्हातरी अमेरिकेचा आकाशात सोडलेला Skylab हा उपग्रह कक्षेबाहेर येवून पृथ्वीवर(भारतात देखील) आदळणार आहे, त्याबद्दल झालेल्या चर्चा त्याबद्दल आठवते आहे. सकाळ मध्ये डॉ. प्रकाश तुपे यांचा प्रत्येक महिन्याला एक लेख येत असे(अजूनही येतो वाटते), जो त्या महिन्याचे आकाश कसे असेल याची माहिती, नकाशासकट येते. तरीही रात्री जागे राहून आकाश निरीक्षण करणे थोडे जीवावरच येई. डोंगर यात्रेदरम्यान आपसूकच किल्ल्यांवरून भरगच्च आकाश दिसे. बरोबर कोणी तरी असलेला काही बाही माहिती सांगे, कोणी सांगे की उपग्रह घिरट्या मारताना दिसतोय वगैरे. पूर्वी केव्हा तरी जीवाची मुंबई करायला गेलो होतो तेव्हा मुंबईच्या प्रसिद्ध असे नेहरू तारांगण(Nehru Planetarium) पाहायला गेलो होतो आणि आकाशदर्शनाच्या अद्भूत जगाची झलक पाहायला मिळाली होती.

काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर दर महिन्याला रात्री तास दोन तास पुण्यातील आयुका संस्थेचे(IUCAA) अरविंद परांजपे, जयंत नारळीकर मंडळीनी आकाशदर्शन कार्यक्रम केला होता. एकदा, मला वाटते वर्तमानापत्रातून, पुण्याच्या जवळ ताम्हिणी घाटात ज्योतिर्विद्या परिसंस्था तर्फे रात्रभर आकाशदर्शनाचा कार्यक्रम असणार आहे हे समजले. आम्ही जायचे ठरवले. मोठ्या दुर्बिणी, तज्ञ मार्गदर्शक असणार होते. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही पुण्यातील खगोलशास्त्रात(astronomy) काम करणारी बरीच जुनी संस्था आहे हे माहिती होते. त्या ऑक्टोबर मधील थंड गार रात्री, ताम्हिणी सारख्या दूरवरच्या गावात आम्ही विन्झाई देवीच्या देवळात जमलो होतो. रात्रभर तेथील मोकळ्या पटांगणात विविध तारे, ग्रह, नक्षत्र यांचे निरीक्षण करत होतो. मध्येच तज्ञ मार्गदर्शक खगोलीय घटनांबाबत, आणि दुर्बिणीबद्द्ल इतर गोष्टींबद्दल माहिती सांगत होते. मध्येच कॉफीपान देखील होते. असे करत करत रात्र केव्हा सरली हे समजले नाही. एका अद्भूत विश्वातच फेरफटका मारून आल्यासारखे झाले.

मध्ये मी अमेरिकेत गेल्यावर एक दुर्बिण(Celestron) घेऊन आलो आणि थोडीफार झटाफट करत देवढे जमेल तेवढे त्यातून पाहू लागलो. पण काही दिवसांतच उत्साह मावळला आणि हे सर्व मागे पडले. परत काही वर्षांनी पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात खगोल-विश्व संस्थेतर्फे पुसाणे नावाच्या गावातून रात्रभर आकाशदर्शनाचा(star gazing program or star party) कार्यक्रम होणार आहे हे समजले. संस्थेचे मयुरेश प्रभुणे आणि इतर जणांनी छान कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजकांनी त्या दिवशीच्या star party साठी आकाशगंगा(galaxy) हा मुख्य विषय ठेवला होता. त्यांच्याकडे संगणकावर Starry Night नावाचे एक आकाश निरीक्षणाचे सॉफ्टवेअर देखील होते. आम्हाला त्या रात्रीच्या आकाशाचा नकाशा, आकाश कसे दिसेल याची माहिती देणारे एक पत्रक देण्यात आले होते. आकाशनिरीक्षणाद्वारे हे जग, विश्व कसे आहे, आपल्या पृथ्वीव्यतिरिक्त या अथांग ब्रम्हांडात अजून कोण कोण आहे, ह्याचा वेध घेण्याची उत्सुकता मानवाला आधी पासूनच आहे. भारतात सुद्धा आर्यभट्ट, वराहमिहिर इत्यादी प्रभृतीनी आकाश निरीक्षण करून गणिताद्वारे कित्येक गोष्टींची नोंद ठेवली आहे, तेही नुसत्या डोळ्यांनी, त्या काळी दुर्बिणी वगैरे नव्हत्या. हे शास्त्र चांगलेच प्रगत होते, त्या परंपरेची माहिती मध्ये मी बंगळूरूमध्ये एका Indian Institute of Science मधील एका कार्यक्रमात झाली.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या मंगळ मोहिमेची(Mars Exploration Rover) बरीच चर्चा झाली. मध्यंतरी भारताच्या चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेचे देखील चर्चा झाली.  दर वर्षी काहीना काहीतरी खगोलीय घटना घडतच असतात. एक-दोन आठवड्यापूर्वीच अमेरिकेत सूर्यग्रहण झाले आणि ते साऱ्या देशभरात दिसले, त्याची केवढी चर्चा झाली. तर असे खगोलीय विश्व प्रत्येकाने एकदा तरी star party च्या माध्यमातून अनुभवले पाहिजे आणि मुलांनाही त्याची ओळख करून दिली पाहिजे असेच आहे.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s