नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#३

प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची वाडा चिरेबंदी ही तीन नाटकांची मालिका आहे, तिचा नुकताच अनुभव मी घेऊन आलो. चंद्रकांत कुलकर्णी यांनी ती दिग्दर्शित केली आहे. हा असा सलग तीन नाटकांचा प्रयोग ते दुसऱ्यांदा करत आहेत. १९९४ मध्ये तो प्रथम त्यांनी रंगभूमीवर आणला. वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी ही पहिली दोन नाटके, त्याबद्दल लिहिले आहेच. आज ह्या त्रिनाट्यधारेतील तिसरे आणि शेवटचे नाटक युगान्त, याबद्दल लिहायचे आहे. दुपार पासून पाहिली दोन नाटके पाहून शारीरिक आणि मानसिक शिणवटा आला होता. रात्रीचे ८.३० वाजले होते. युगान्त सुरु होण्यास अजून एक तासभर होता. जेवलो आणि जंगली महाराज रस्त्यावर शीतल गारव्यात फिरून आलो. थंडीच्या दिवसांत रस्त्यांवरून रात्री गवळी मसाला दुधाचे ठेले सुरु करतात, अश्याच एकाचा आस्वाद घेऊन ताजातवाना होऊन, युगान्त साठी सज्ज झालो. पूर्वीच्या काळी संगीत नाटकं, तसेच लोकनाट्य ही रात्रभर चालत, ती कलाकार कशी करत आणि प्रेक्षक कशी पाहत ह्याचे आश्चर्य आज वाटते. मी असेही वाचले होते की महाभारत ह्या महाकाव्याचा नाटक या स्वरूपात Peter Brook हे सलग १२ तास असा प्रयोग करत असत.

या तिसऱ्या नाटकाचे नाव युगान्त असे आहे. मोठा वजनदार, गुढ अर्थ असलेला शब्द, ह्या धरणगावच्या देशपांड्यांच्या कहाणीच्या संदर्भात का वापरला असावा हा प्रश्न पडतो. युगान्त तशी ती एकांकिका आहेच, जवळ जवळ दीड तास. पडदा उघडला, आणि समोरचे दृश्य(तसेच सोबतचे भयाण पार्श्वसंगीत) पाहून धक्काच बसला. वाडा पार कोसळला आहे, दुर्दशा झाली आहे. एखाद्या पडीक स्थानाचे स्वरूप आले आहे. स्वयंपाकघरात एखाद्या झोपडीमध्ये असतात तशी भांडी मांडून ठेवली आहेत. अशा वाड्यात आपला स्वीडन-निवासी(पूर्वी अमेरीकेत होता) अभय प्रवेश करतो. त्याची वाहिनी एकटीच घरी असते. त्यांच्या बोलण्यातून कळते की गेली आठ वर्षे त्या भागात पाऊस झाला नाही. पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अवर्षण आहे, भयानक उन आहे. रस्ता नाही, गावात यायला पाच मैल अलीकडे बसमधून उतरून चालत यावे लागते. गावातले लोक गाव सोडून निघून गेले आहेत(गावाला एक प्रकारे ghost town चे स्वरूप आले आहे, जे अमेरिकेत gold rush च्या वेळेस झाले होते, पण त्याची कारणे वेगळी होती, मी अशी एक-दोन पाहिली होती). पण पराग, त्याची बायको, आणि त्यांचा लहान मुलगा हे अजूनही तेथेच आहेत.

त्या दोघांच्या आजीचे निधन झाले असते, अभय त्यासाठीच भेटायला म्हणून आलेला असतो. पण हे असे आठ वर्षात गावाची एवढी वाईट परिस्थिती व्हावी हे पटत नाही. आजीचे श्राद्धकर्म करायला सुद्धा पाणी नाही, म्हणून पराग काशीला गेलेला असतो. तो ही थोड्याच वेळात वाड्यावर अवतरतो. पहिल्या दोन नाटकात जशी समृद्धी होती, घर भरलेले, खाऊन पिऊन सुखी होते, तशी परिस्थिती अजिबात नव्हती. अवर्षणामुळे पीक पाणी जवळ जवळ नाहीच, गावात राहणारे कोणी नाही, जे आहेत ते देखील हळू हळू मरणपंथाला लागले आहेत. अशा वेळेस पराग आणि अभय यांची भेट होते. त्या दोघांचे भावनिक अनुबंध असलेले गावातील ते तळे देखील पार सुकून, आटून गेले आहे. पराग मध्ये पूर्णपणे बदल झाला आहे. तो प्रामाणिकपणे  आहे ती परिस्थिती स्वीकारून त्याच गावात राहत आहे. त्याच्यामध्ये हा बदल कशामुळे झाला हे समजत नाही, दुसऱ्या नाटकाच्या शेवटी परागला तुरुंगवास होतो(आणि त्यामुळे आत्मपरीक्षण, प्रायश्चित्त वगैरे झाले असावे की काय) हे खरे असले तरी, तो एवढा संतासारखा वागू लागणे, त्याची बायको देखील तशीच,  हे वास्तवाला धरून मला तरी वाटत नाही.

हे नाटक पाहताना आपण काय पाहतो आहे असे वाटत राहिले मला. तीन पात्रे, आणि पराग/नंदिनी यांचे मूल. भास्करचे निधन झाले आहे, त्याची पत्नी(वाहिनी) मुलीच्या घरी राहत असते. प्रामुख्याने संवाद हा पराग आणि अभय यांत जे स्मरणरंजन आहे, चिंतन आहे, loud thinking आहे. एकमेकांत झालेले बदल सांगणारे आहे. आणि हे सगळे प्रतीकात्मक, तात्विक अविष्कार असल्यासारखे वाटू लागते. अभय गावातील भयानक दृश्य, परिस्थिती, मृत्यूचे दर्शन पाहून भयचकित होतो. ह्या त्यांच्या बोलण्यातून असे समजते की अमेरिकेत राहून देखील अभय आपल्या कामात, संसारात सुखी-समाधानी नाही. तर पराग ह्या असल्या वैराण गावात राहून, सर्वांना मदत करत, अध्यात्मिक विचारांचा हा अतिशय तृप्त आहे असे दिसते. का हा असा विरोधाभास?  तर असे हे beginning of an end , अर्थात युगान्त, हे नाटक आहे. नाटक संपता संपता, अभय परत स्वीडनला जातो, पराग आणि त्याचे कुटुंब गावातच राहतात, अर्थातच अत्यंत हलाखीची परिस्थितीशी झगडत राहावे लागणार, हे उघड आहे. दिवस उगवतो, मावळतो, महिने, वर्षे सरतात, वय वाढत जाते, आपण का जगतो आहोत, जन्म, मृत्यू बद्दल मुलभूत प्रश्न पडतात, बोलतात. हे असे सगळे प्रश्न त्या दोघांना पडतात. त्याबद्दल ते बोलतात. ह्या पातळीवर ते येण्याचा त्यांचा प्रवास कसा झालाहे समजत नाही. अशी पातळी गाठायला कित्येकांनी किती कष्ट केले आपल्याला माहिती असते.

अजून एक मुद्दा. बऱ्याच वेळेस असे होते की मूळ नाट्यसंहितेतील बारकावे, तपशील हे नाटकाचा प्रयोग पाहताना जाणवतातच असे नाही. ह्या महत्वाच्या नाट्यत्रयी बद्दल आहे नक्कीच झाले असणार, नाटककारने(अर्थात महेश एलकुंचवारांनी) असे तपशील जागोजागी सुचन म्हणून नमुद केले असणार, त्यातील काही उमगले असेलही, पण बरेच काही निसटले असेलही. त्यामुळे ह्या तीनही नाटकांची मूळ संहिता वाचायला हवी असे वाटू लागले आहे, हे मात्र नक्की.

नाटक संपता संपता रात्रीचे अकरा वाजून गेले होते. सगळे कलाकार एकत्र जमा झाले, आणि त्यांनी प्रेक्षकांचे , टाळ्यांच्या कडकडाटात, अभिवादन स्वीकारले. व्यावसायिक नाटकांना असे करत नाहीत खरे तर, प्रायोगिक नाटकांना नक्कीच करतात. असो. एक नाट्य-यज्ञ पार पडला होता, जो दुपारपासून चालू होता. मनात काय चालू होते, काय वाटत होते, हे सांगणे अवघड आहे. बहुधा काहीच चालू नव्हते, कारण प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा. पण राहून राहून माझ्या आजोळची(निंबाळ) आठवण येत होती; ३५-४० वर्षांपूर्वीचे तेथील गजबजाट, माणसे, त्यांचे संवाद हे सर्व मनात येत होते, हे मात्र नक्कीच. तश्याच अवस्थेत मी माझ्या वाड्याकडे(म्हणजे पुण्यातल्या घराकडे!) प्रस्थान केले.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s