मस्तानीचा मुलगा

मी कायम वेगवेगळया विषयावरील, हटके पुस्तकांच्या शोधात असतो. काही दिवसांपूर्वी वाचनालयात पुस्तके धुंडाळताना मस्तानीचा मुलगा ह्या पुस्तकावर नजर खिळली. डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी लिहिलेले बरेच जुने पुस्तक होते ते. मस्तानीला बाजीरावापासून एक मुलगा झाला होता आणि त्याबद्दल सहसा कुठेच लिहिले, बोलले जात नाही. मध्यंतरी बाजीराव मस्तानी हा सिनेमा आला होता, त्यावेळेस मी एक लेख लिहिला होता. त्यामुळे मस्तानी हा विषय तसा ताजाच होता. त्याच विषयावर, आता आणखी एका पैलूवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक पाहून मी मनोमन खुश झालो.

हे पुस्तक तसे पहिले तर एक ऐतिहासिक ललितकृती. द. ग. गोडसे यांच्या मस्तानी(जे नंतर प्रकाशित केले गेले आहे) या सारखे पूर्णपणे संशोधनात्मक पुस्तक नाही. पण डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे हे पुस्तक पूर्णपणे काल्पनिक देखील नाही. त्यांनी प्रस्तावनेत तसे म्हटले आहे. पहिली आवृत्ती १९७२ मध्ये ‘समशेर बहाद्दर’ या नावाने प्रकाशित झाली. साधारण १५० पानांची ही छोटीशी कादंबरीची दुसरी आवृत्ती १९८३ मध्ये ‘मस्तानीचा मुलगा’ या नावाने प्रकाशित केली. त्यांनी ही कादंबरी जाणीवपूर्वक ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन, अवास्तव, आधार नसलेल्या गोष्टी टाळून ही कादंबरी लिहिली आहे असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांची पेशवे कालावरील अजून एक कादंबरी, ही कुप्रसिद्ध आनंदीबाई पेशवे ह्यांच्या जीवनावरील कादंबरी देखील त्यांनी अस्सल कागदपत्रांचा आधार घेऊन लिहिली होती. मस्तानी हे तसे वादग्रस्त व्यक्तिमत्व, त्यामुळे तिच्या ह्या मुलाबद्दल काय लिहिले याची उत्सुकता लागली होती.

बाजीराव आणि मस्तानी यांच्या मुलाचे नाव समशेर बहादर किंवा कृष्णसिंग असे होते. ही कादंबरी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून, पानिपतच्या लढाईत मृत्यू येईपर्यंतचा जीवन प्रवास कथन करते. कादंबरी सुरु होतेच ती मथुरेत, जेथे पानिपतच्या लढाईतून जखमी अवस्थेत हा समशेर फिरत आहे, आणि ती संपते ती नाना फडणवीस(बाळनाना) यांच्या पानिपतवरून परत ग्वाल्हेरला गेल्यानंतरचे पत्राचा मसुदा देऊन. मस्तानीचा मुलगा आपली जीवन कहाणी सांगतो आहे अशा स्वरूपात बरीचशी कादंबरी रचली गेली आहे. द. ग. गोडसे यांच्या पुस्तकात देखील ह्या मस्तानीपुत्राशी निगडीत दोन लेख आहेत. बाजीरावाच्या आयुष्यात मस्तानी आल्यापासून पुण्यातील पेशवे कुटुंबीय, आणि इतर लोकांकडून तिची कायमच अवहेलना झाली. तशी विशेष अवहेलना समशेरच्या नशिबी आली नाही. त्याचे आणि पेशेवे कुटुंबीय यांचे संबंध, अगदी लहानपणीच आई-बापाला गमावून बसलेल्या समशेर जडणघडण कशी झाली, त्याने देखील पेशवाईची सेवा कशी केली, ह्याचे सर्व गुणगान करणारी ही कादंबरी. पानिपतच्या विनाशी लढाईत बरेच मराठे सरदार पळ काढून गेले होते, तेव्हा समशेर शेवटपर्यंत सदाशिवराव भाऊ यांच्या सोबत होता. जखमी झाला. आणि शेवटी मथुरेपासून जवळ राजस्थानात भरतपूर येथे प्राण सोडले आणि त्याची कबर भारतपूर येथे आहे असे गोडसे नमूद करतात.

कादंबरीच्या सुरुवातीलाच डॉ. भीमराव कुलकर्णी हे समशेरच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या एका पोवाड्यातील अंश उद्धृत करतात:

समशेर बहाद्दर रणशूर रणगाढा, रणी वाजे चौघडा
हटकून गिलचे हाणिती धडधडा, ढाल तलवार जमदाढा
ज्याने रणी अडविला तीस घोडा, सन्मुख डावी मुखडा
रावबाजीचा पुत्र जसा हिरा, येती जखमांच्या लहरा

गोडसे म्हणतात त्याप्रमाणे, समशेरशी निगडीत काही कागदपत्रे, पुरावे, तसेच शाहिरांचे पोवाडे देखील उपलब्श आहेत. कादंबरीत लहानग्या समशेरचे शनिवारवाड्यातील दिवस, पाबळ मधील दिवस, पेशव्यांच्या घराण्यातील इतर मुलांबरोबरचे त्याचे वाढणे, त्याला मिळणारी वागणूक, त्यामुळे त्याच्या मनातील भावभावनांचा गोंधळ, मी कोण आहे अश्या विचारांची घालमेल हे सगळे लेखकाने चित्रित केले आहे. बाजीरावाची पत्नी काशीबाई हिने ह्या मस्तानीपुत्राला जवळ केले होते. पण बाजीरावाची आई राधाबाई हे मात्र मस्तानीला तसेच तिच्या मुलाला देखील अवेहरले, यांचे चित्रण त्यांनी केले आहे. चिमाजी अप्पांच्या निधनानंतर त्याला पिलाजी जाधवांच्या हाती सोपवले गेले, तसेच पुढे सरदारकी मिळाली, आणि नंतर साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांची भेट इत्यादी प्रसंग, घटना यांचे देखील वर्णन येते. पुढे त्याचा विवाह नाशिक जवळील पेठ गावच्या दळवी सरदारांच्या घरातल्या मुलीशी लालकुंवर हिच्याशी झाले त्याचे सविस्तर वर्णन देखील येते. दुर्दैवाने विवाह होऊन एका वर्षाच्या आताच तिचा मृत्यू झाला, त्याच सोबत छत्रपती शाहू महाराजांचे देखील निधन झाले. निजामाच्या बरोबर भालकी येथे झालेल्या लढाईत समशेरने सदाशिवराव भाऊ पेशव्यांसोबत गाजवलेली मर्दुमकी देखील कादंबरीत येते.

समशेरचा दुसरा विवाह मेहेरुन्निसा नामक कोणाशी झाल्याचे कादंबरीत येते. पण ती कोण, कोणाची मुलगी वगैरे तपशील येत नाहीत. निजामाविरुद्धच्या अजून एका मोहिमेत(सिंदखेद, नळदुर्ग) यांच्या मोहिमेत ती त्याच्या बरोबर होती, ती त्या मोहिमेतच प्रसृत झाली आणि मुलाला जन्म दिला. नंतर शेवटी अर्थातच दिल्ली आणि पानिपतचे तिसरे युद्ध, ज्यात त्याचा मृत्यू झाला. ईनमीन २५-२६ वर्षांचे त्याचे आयुष्य. अशी ही नाट्यपूर्ण जीवनगाथा या बाजीराव-मस्तानीच्या पुत्राची. त्यावेळची राजकीय, सामाजिक, पेशवाईतील हितसंबंध, हेवेदावे, भावभावना, शौर्य या सगळ्याची ही कथा. ह्यावर एखादे नाटक रंगभूमीवर यायला हरकत नाही असा हा विषय. नाही म्हटले तरी द. ग. गोडसे यांनी त्यांच्या पुस्तकात समशेर बहादर याची हॅम्लेट याच्या बरोबर तुलना केली आहे. त्यातच ह्या कादंबरीतील समशेर जसा स्व-संवादरूपी आपली कहाणी सांगतो, हॅम्लेट नाटक देखील तसेच आहे. एकूणच मस्तानी आणि ह्या मस्तानी पुत्राबाद्द्ल जाणून घ्यायाचे असेल तर ही दोन्ही पुस्तके जरूर वाचावी अशी आहेत.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s