बोस्टनची वारी

मला अमेरिकेहून परत येऊन आज आठवडा झाला. अजून jet-lag आहेच. पहाटे खूप लवकर जाग आली आणि बसलो लिहायला. ह्या वेळेस अमेरिकेतील बोस्टन येथे जायला मिळाले. पहिल्यांदाच तेथे गेलो. बोस्टनचे आकर्षण खूप आधीपासून, म्हणजे शाळेपासूनच होते. सातव्या इयत्तेत असताना इतिहासाचा धडा होता त्यात बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. ते मनात कुठेतरी कायम राहिले होते.  अधून मधून मला माझ्या कामाच्या स्वरूपामुळे फिरायला मिळते, प्रामुख्याने अमेरिकेत. ह्या वेळेस बोस्टनबरोबर फिलाडेल्फिया येथेही गेलो. पूर्वी बरेच फिरल्यामुळे फिलाडेल्फियाचे नाविन्य नव्हते, जास्त दिवसही राहता नाही आले. त्यामुळे नेहमीच्या Reading Terminal Market मध्ये देखील चक्कर मारता नाही आली. फिलाडेल्फियामध्ये इतक्यातच नवीनच एक संग्रहालय उभारले आहे, तेही पाहायचे राहून गेले. असो. ह्या ब्लॉगवर ऐतिहासिक शहर असलेल्या बोस्टनच्या वारीबद्दल लिहायचे आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत पूर्व भागात, उत्तरेकडे, जोरदार वादळी बर्फवृष्टी झाली होती. त्याला त्यांनी bomb cyclone असे नाव दिले. नेमक्या त्याच सुमारास माझे प्रयाण निश्चित झाले. दिल्ली, न्यूयॉर्क करत बोस्टनला पोहोचलो. न्यूयॉर्क विमानतळावरील मधील मी अनुभवलेली गंमत एक वेगळा विषय असल्यामुळे मी येथे विस्ताराने लिहिले आहे. बोस्टन हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले अमेरिकेतील आद्य शहर. विमानातून खाली पाहत होतो. निळेशार पाणी, बऱ्याच ठिकाणी पाणी गोठून बर्फ झालेले, जे अजून तरंगत होते. अनेक लहान मोठी बेटे नजरेस पडत होती. छान उन पडले होते, पण तापमान शून्याखालीच होते. खाली तो अथांग अटलांटिक महासागर आणि त्यावरून हळू हळू विमान उतरत उतरत अलगद असे बोस्टनचा लोगन विमानतळावर उतरले. विमानतळाच्या बाहेर येऊन मोटारीत बसेपर्यंत पार गारठून गेलो होतो. मुक्कामचे ठिकाण खुद्द बोस्टनमध्ये नव्हते. मार्लबोरो(Marlborough) नावच्या उपनगरात पश्चिमेकडे साधारण ४० मैल लांब होते. मोटार शहरातून बाहेर पाडून हमरस्त्याला लागली, आणि भरधाव धावू लागली. चोहीकडे साचलेले बर्फच बर्फ नजरेस पडत होते. पानगळ झालेली निष्पर्ण, काळीशार अशी झाडे अधूनमधून दिसत होती.

कामाची पाच दिवस संपवून, शनिवारी बोस्टन शहरात फेरफटका मारून यावे म्हणून सकाळी लवकरच बाहेर पडलो. शहर दर्शन बसचे(Old Town Trolley tour) तिकीट काढून ठेवले होते. मार्लबोरोवरून Interstate Highway 90 ज्याला Mass Pike/Massachusetts Turnpike असेही म्हणतात, त्यावरून बोस्टनकडे निघालो. शहराच्या परिघावर ह्या हमरस्त्याला लागूनच Boston University ची इमारत दिसते. Boston Common जवळ असलेल्या Cheers Bar या जुन्या आणि प्रसिद्ध ठिकाणी tour सुरु होणार होती. शेजारीच Gibson House नावाचे १८६० मधील घर होते. हे आता संग्रहालय म्हणून पाहायला मिळते. बस अजून यायची होती. सकाळची वेळ असल्यामुळे बार सुरु नव्हता, त्यामुळे आत जाता नाही आले. मग समोरच असलेल्या जुन्या Boston Public Park बागेत फेरफटका मारून आलो. त्यात George Washington चा अश्वारूढ पुतळा, झाडांवर असलेल्या मोठ्याल्या, धीट अश्या खारी यांनी लक्ष वेधून घेतले. बस आली. ही बस आम्हाला दिवसभर बोस्टन शहरात फिरवणार होती, साधारण पंधरा एक प्रसिद्ध ठिकाणी ती थांबणार होती, तशी ती त्यामुळे hop-on, hop-off अश्या प्रकारची बस होती. बस मध्ये बसचा चालकच आमचा गाईड होता.

चार्ल्स नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या, आणि एका बाजूला(पूर्वेला) अटलांटिक महासागर पसरलेल्या ह्या शहराचा इतिहास मोठा आहे. अमेरिकेच्या क्रांती मध्ये सक्रीय ह्या शहराचा सहभाग होता. ठिकठिकाणी जुन्या इमारती, वास्तू, चर्च, विविध संग्रहालये आहेत. तसेच औद्योगीकरण झाल्यानंतर झालेल्या प्रगतीमुळे नवीन इमारती, मोठाले रस्ते, दुकाने ही देखील दिसतात. बसचा पहिला थांबा होता Trinity Church भागात. तेथे उतरून चर्च बाहेरून फेरा मरून पाहिले. हे चर्च बोस्टनच्या प्रसिद्ध Copley Square जवळच आहे. तेथून Boston Public Library दिसत होती, प्रसिद्ध कवी खलील जिब्रानचे छोटेसे स्मारक देखील आहे. पलीकडे Old South Church होते तेथे जाऊन आलो. हवेत अतिशय गारवा होता, वारा झोंबत होता, त्यामुळे फिरणे थोडेसे त्रासदायक होत होते. लवकरच दुसरी बस आली आणि त्यात मी चढलो.

बोस्टनच्या जुन्या भागातून, अरुंद रस्त्यांमाधून बस चालली होती, चालक प्रेक्षणीय स्थळांची, इतिहासाची माहिती सांगत होता. Fenway Park नावाचा भाग आला, जेथे अमेरिकन बेसबॉल स्टेडियम(ballpark) आहे. प्रसिद्ध अश्या बोस्टनच्या Red Sox Team चे ते मैदान आहे. बस पुढे चार्ल्स नदी Harvard Bridge वरून ओलांडून केम्ब्रिज या उपनगरात आली. येथे जगप्रसिद् शैक्षणिक संस्था Massachusetts Institute of Technology(MIT) तसेच Harvard University आहेत. आमची बस ही प्रसिद्ध Kendall Square मध्येच थांबली. या भागात बऱ्याच संगणक, तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध startups आधीपासून आणि आताही आहेत. तेथे एक अणुशक्ती केंद्र(nuclear reactor) देखील आहे. मी मनात म्हटले या भागात अशी संस्था कशी काय. नंतर कळाले की ती MIT ची संशोधनासाठीची प्रयोगशाळा आहे. बराच वेळ या भागात फिरत होतो. विविध संस्था दिसत होत्या, पुढे MITचा भव्य घुमट दिसला आणि आत शिरलो, आणि माझे MIT ला पाय लागले! पुढे Harvard University भाग होता पण नाही गेलो. परत येऊन बस पकडली.

बसने Longfellow Bridge वरून चार्ल्स नदी परत ओलांडून बोस्टनच्या मुख्य भागात परत आली. दुपार होऊन गेली होती. बोस्टन टी पार्टीचे संग्रहालयाला जाण्याचे वेध लागले होते. मग मध्ये कुठे न उतरता थेट तेथेच जायचे ठरवले. वाटेत बऱ्याच गोष्टी दिसत होत्या-Massachusetts State House ची इमारत, Granary Burying Ground, Boston Fire Museum(जसे पुण्यात fire brigade museum आहे तसे) वगैरे.  बोस्टनच्या financial district मधून शेवटी आमची बस Boston Tea Party Ship Museum जवळ आली. बोस्टन बंदराचे विहंगम दृश्य दिसत होते. Boston Tea Party हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना आहे. माझ्या Boston Tea Party च्या अनुभवाबद्दल वेगळे लिहिले आहे, येथे पाहता येईल. बोस्टनमध्ये अजून बरेच पाहायचे राहिले होते, वेळ कमी होता, जीवघेण्या गरठ्यामुळे बाहेर जास्त फिरता देखील येत नव्हते. परत बस पकडली. बोस्टन मधील Masonic Temple ची इमारत पाहायची होती(तशी फिलाडेल्फिया, आणि चक्क पुण्यात देखील आहे, त्याबद्दल सविस्तर कधीतरी). The Freedom Trail नावाने प्रसिद्ध असलेली self-guided tour आहे, ज्यात काही महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती चालत चालत होऊ शकते. त्यातील काही दृष्टीस पडली होती, पण Faneuil Hall, USS Constitution Warship राहिले होते, ते बसमधून ओझरते पहायाला मिळाले.

मार्लबोरोला परत जाण्यासाठी Massachusetts Bay Transport Authority(MBTA) च्या रेल्वेगाडीने जायचे ठरवले होते. त्याप्रमाणे ऐतिहासिक South Station येथे जाऊन गाडी पकडायची होती. त्यामुळे tour bus मधून शेवटी Boston Common नावाच्या ऐतिहासिक पार्क जवळ उतरलो. ही बाग म्हणे अमेरिकेतील सर्वात जुने city park आहे म्हणे.  चालत चालत South Station ला गेलो. वाटेत Boston Masonic Building दिसली. तिचे फोटो काढले, आत नाही गेलो. छानसा असा ४०-४५ मिनिटे रेल्वेने प्रवास करून पुढे मार्लबोरोला हॉटेलला जाताना कॅब केली, तर तिचा चालक(Michael Giobbe त्याचे नाव) Old Trolley Tour चा trainer निघाला, तसेच त्याने media ecology ह्या अनोख्या विषयात शिक्षण घेतले होते, आणि तो त्यावर पुस्तक लिहितो आहे असे बोलण्याच्या ओघात समजले. अमेरिकेत असे विचित्र(eccentric) लोक खूप भेटतात. पूर्वी केव्हा तरी साहित्याचे परिसरविज्ञान(म्हणजे literature ecology) नावाचे पुस्तके पाहिल्याचे आठवते. असो.

फिलाडेल्फिया सारखेच बोस्टन हे तसे पायी फिरण्याचे शहर. दोन्ही शहरात कोपरान् कोपरा इतिहासाने व्यापलेला आहे. खरं तर माझी ही बोस्टनची वारी ही धावतीच भेट होती. माझ्या मार्लबोरो मधील कार्यालयातील एकाने असे सांगितले होते की बोस्टन मध्ये Berlin Wall चे काही अवशेष एके ठिकाणी ठेवले आहेत. ते काही मला पाहायला मिळाले नाही, तसेच अजूनही बरीच ठिकाणे पाहायची राहून गेली आहेत. परत बोस्टनला येण्यास हे नक्कीच कारण आहे! पाहुयात, पुढे मागे, कसे जमते ते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s