शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला

ब्लॉगचे शीर्षक जरा विचित्र वाटते आहे ना? आहेच ते. पण ते एका नाटकाचे नाव देखील आहे. मी गेली काही दिवस वर्तमानपत्रातून या नाटकाच्या प्रयोगाच्या जाहिराती पाहतो आहे. मला पाच-साडेपाच वर्षांपूर्वीची संध्याकाळ आठवते आहे. २०१२ च्या ऑक्टोबरमध्ये मी नुकताच अमेरिकेच्या सलग ३-४ महिन्याच्या वास्तव्यानंतर भारतात परतलो होतो.  नाटकं, संगीत कार्यक्रम, आणि इतर पुणेरी गोष्टींना मी पारखा झालो होतो. मनात रुखरुख लागून राहिली होती. हे माझे नाटकाचे वेड एके दिवशी, तेही सोमवारी रात्री, या नाटकाच्या प्रयोगाला मला खेचून घेऊन गेले. मी अर्थात नाटकाचे वेधक नाव वाचूनच नाटकाला गेलो. पण प्रयोग पाहून मी जाम खुश झालो होतो. काही वर्षांपूर्वी मध्यंतरी हे नाटक करणाऱ्या कलाकारांच्या गाडीला अपघात झाला होता असे मी वाचले होते, त्यात एक कलाकार दगावला देखील होता. नंतर काही दिवस प्रयोग बंद झाले होते असे दिसते. २०१२ सालाच्या सुरुवातीला आलेले हे नाटक. त्याचे प्रयोग परत जोरात सुरु झाले आहेत असे वाटते.

तर हे नाटक नावाप्रमाणेच हटके आहेच. नावातच शिवाजी, मोहल्ला, भीमनगर असे शब्द आहेत, जे हिंदू, मुस्लीम, दलित घटकांकडे निर्देश करतात की काय असे पहिल्या नजरेत वाटून जाते. नंदू माधव हा जुना जाणता गुणी नट ह्या नाटकाचा दिग्दर्शक आहे. दूर खानदेशातील एका गावातील लोकांनी एकत्र येऊन केलेले हे नाटक आहे. मी गेल्यावर्षी कर्नाटकात शिरसी जवळील हेग्गडू गावातील निनासम ह्या संस्थेला भेट देण्यासाठी गेलो होतो. ही संस्थाच त्या गावातील नाटक-प्रेमी मंडळीनी उभी केली आहे. तेथील लोक कशी नाटकं करतात तसे हे नाटक वाटले. तर ह्या नाटकात शिवाजी महाराज यांच्या नावाखाली समाजात चालू आहे त्यावर उपहास, टीका विनोदी पद्धतीने मांडली गेली आहे. शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य, स्वराज्य स्थापना इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतात, त्याबद्दल भरपूर संशोधन झाले आहे, अजून चालू आहे, लिहिले गेले आहे. ह्या नाटकातून शिवाजी महाराज कसे धर्मनिरपेक्षवादी, दलितांच्या प्रती कळवळा असणारे, उदारमतवादी, सुधारणावादी कसे होते ह्या पैलूंवर प्रकाश झोत टाकला आहे.

पडदा उघडल्या उघडल्या एक गोंधळ सादर होते, आणि त्यात इंद्र, यम असे लोक अवतीर्ण झाल्यामुळे मी मनात म्हटले परत एखादा दशावतारी खेळासारखा बाज आहे की काय. शाहिरी, पोवाडे तर भरपूर आहेतच. तर त्याचे असे होते, एके दिवस परलोकाचा अधिपती इंद्र हा यमराजाला पृथ्वीतलावरून शिवाजीमहाराजांना घेऊन यायचा हुकुम सोडतो. यमराजाला ते सापडतात देखील. इंद्राला शिवाजी महाराजांचे विचार हवे असतात. पण ते पृथ्वीतलावर राहिले आहेत असे सांगितल्यावर शिवाजी महाराज आपला फेटा त्याच्याजवळ ठेवून ते परत पृथ्वीतलावर येतात. यम देखील त्यांच्या मागे मागे येत राहतो. आहे की नाही मजेशीर कल्पना. यमराज परत तो फेटा घेऊन परत कोण शिवाजीमहाराज असतील हे शोधत फिरतो, आणि भीमनगर मोहल्ला नामक शहरातील एका भागात दाखल होतो. तेथे त्याला शिवाजीमहाराज कसे होते, त्यांचे वेगळे स्वरूप कसे लोकांनी समजावून घेतले आहे हे त्याच्या लक्षात येते. नाटकाला नेपथ्य असे काहीच नाही. मराठी भाषेचा बाज देखील वेगळाच असा वापरला आहे.

Shivaji Underground in Bhimnagar Mohalla

नाटकातील एक दृश्य

Shivaji Underground in Bhimnagar Mohalla

नाटकाची जाहिरात

तर असे हे वेगळ्या धाटणीचे धम्माल नाटक, जसे वर सांगितले, परत जोरात चालू आहे. जरूर पहा. पाचशेच्या वर प्रयोग झाले आहेत असे ऐकतो आहे. प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचे या नाटकातील जोमदार पोवाडे हे नक्कीच आकर्षण आहे. विषय तसा वाद ओढवून घेणारा असला तरी अजूनतरी विरोध, वाद यांचा सामना या नाटकाला करावा लागला नाही. लोकांना आवडले आहे, तसेच पुरस्कार देखील बरेच मिळाले आहेत. नुकताच शिवजयंती सोहळा, नेहमीप्रमाणे, दोनदोनदा साजरा झाला. ह्या नाटकाच्या निमित्ताने थोडीफार विचारप्रवर्तक असे काही तरी ऐकायला, पाहायला चांगली संधी आहे.

Advertisements

5 thoughts on “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s