नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#२

प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचा परिचय करून देणारा पहिला ब्लॉग आपण येथे पाहिला असेलच. आता हा त्याचा दुसरा हप्ता. मराठी अनुवाद असलेल्या या पुस्तकाचे शीर्षक ‘खेळता खेळता आयुष्य’ असे आहे, ज्याचा पटकन बोध होत नाही. शेवटी अनुवादाबद्दल थोडे मांडणार आहे. आता गिरीश कर्नाड इंग्लंड वरून उच्चशिक्षण संपवून, भारतात नोकरी मिळवून परत आले आहेत. यापुढील आयुष्याचे जे तत्कालीन मद्रास येथून कथन ते आता करतात.

त्यांची मद्रास मध्ये Oxford University Press(OUP) मध्ये नोकरी सुरु आहे. मद्रास मधील त्यांचे आयुष्य देखील समृद्ध करणारे असे होते, नाटक, संगीत, चित्रपट, स्त्रिया, मद्यपान, विविध मित्र, सहकारी यांचे अनुभव, इत्यादी इत्यादी! मद्रासचे School of Arts, जे पुढे चोळामंडल नावाच्या कलेसाठी वसवलेल्या भागाचे देखील वर्णन आले आहे. तसेच मद्रास प्लेयर्स(Madras Players) ह्या हौशी नाट्य संस्थेविषयीचे त्यांचे अनुभव देखील वाचनीय आहेत. माझ्या चेन्नईच्या दोन वर्षांपूर्वीच्या भेटीत या दोन्ही ठिकाणांना भेटी दिल्या नाहीत, कारण मला माहितीच नव्हते. अजून एक वैशिष्ट्य, मला माहीत असलेले, जे संगीत क्षेत्राशी निगडीत आहे, ती म्हणजे Madras Music Season. हे सर्व पुढील चेन्नई भेटीदरम्यान पाहायला हवे. मद्रास मध्ये एका उच्च वर्गातील विवाहित महिलेशी आलेले लैंगिक संबंध यांचे वर्णन चकित करणारे आहे. उमा कुलकर्णी यांनी एक-दोन ठिकाणी इंग्लिश documentary film ला मराठी साक्षी-चित्र असा पर्याय वापरला आहे. मी तरी हे पहिल्यांदाच पाहतो आहे. माहितीपट असा सुपरिचित शब्द आहे की याला मराठीत. OUPचा सात वर्षांचा करार संपता संपता त्यांना दोन महिन्यासाठी लंडनला जायला मिळाले. त्यावेल तेथे त्यांनी Thomas Mann याच्या The Transposed Heads लघुकथेवरून हयवदन हे भारतीय नाट्यसृष्टीला कलाटणी देणारे नाटक कसे लिहिले याची कहाणी सांगतात.

Girish Karnad autobiography

मद्रास मध्ये OUPचे काम करत असताना असताना प्रसिद्ध कन्नड लेखक यु. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी संस्कार यावर सिनेमा कसा केला, यांचे सविस्तर वर्णन ‘शृंगेरी:संस्कार’ नावाच्या एका स्वतंत्र प्रकराणातून केले आहे. चित्रीकरण शृंगेरी, आगुम्बे या निसर्गरम्य परिसरात झाले आहे. मी तेथे गेलो आहे, खुपच छान परिसर आहे. कन्नड माध्व संप्रदाय(जो माझा देखील आहे!) यातील प्रथा, कडक सोवळे, कर्मकांड या सगळ्यावर हा सिनेमा टीका-टिप्पणी करतो. पण हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. भैरप्पा यांच्या प्रसिद्ध वंशवृक्ष कादंबरीवर त्याच नावाच्या सिनेमाची कथा, जिचे चित्रीकरण मैसूर मध्ये झाले, त्या सर्वांची कथा ‘जुने मैसूर:नवे प्रयोग’ यात येते. हा चित्रपट त्यांनी प्रसिद्ध कन्नड रंगकर्मी बी. व्ही. कारंत यांच्या बरोबर केला. हाही सिनेमा मी पाहिला नाही अजून, पण कादंबरीचे मराठीतील नभोवाणी रुपांतर ऐकले आहे. त्याच सुमारास आणखीन एका चित्रपट काडू ह्याचे देखील काम सुरु कसे झाले यांचे विवरण येते. हे सर्व वाचून त्यांच्यातील फिल्ममेकर, अभिनेता कसा फुलत गेला हे समजते. मी गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबीराला गेलो होतो, त्यावेळेस चित्रपट निर्मिती, प्रक्रिया याबद्दल जे सांगितले होते, त्याची थोडीफार प्रचीती या वर्णनातून आली. या दोन तीन कन्नड चित्रपटांमुळे त्यावेळेस कन्नड चित्रपटसृष्टीत वेगळी लाट आली यांचे श्रेय त्यांना जाते.

पुस्तकाच्या शेवटी पुण्यात FTII चे संचालक म्हणून झालेले त्यांचे आगमन, त्याविषयी ते लिहितात. पुण्यात ते दोन वर्षे राहिले. FTII चा अनुभव, परिसर, प्रभात स्टुडिओची असलेला इतिहास इत्यादी बद्दल ते आत्मीयतेने लिहितात, ते वाचून छान वाटते. मी नुकतेच FTII चा अनुभव घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात FTII मध्ये घडलेल्या घडामोडी, जसे की तेथील संप, शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणे, प्रभात स्टुडिओचे संस्थापक दामले यांचा पुतळा दर्शनी भागात आणणे, भारतीय चित्रपटसृष्टी आणि FTII यांत नसलेला संबंध, हे सर्व त्यांच्या अभिरुचीची, दूरदृष्टीची साक्ष देतात. तेथेच त्यांच्या आणि हेमा मालिनी प्रेम प्रेकरणाबद्दल मोकळेपणाने माहिती देतात. दोन वर्षानंतर तेथून लगेच मंथन या हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी राजीनामा देऊन राजकोटला निघून जातात. आणि सर्वात शेवटी त्यांच्या वयाच्या चाळीशीत त्यांच्या विवाह होतो त्याची ते माहिती देतात.

तर असा गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचा संक्षिप्त परिचय. आता चांगले आत्मचरित्र कशाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. लेखकाने अगदी प्रामाणिकपणे सर्व गोष्टी नमूद केले आहे याला पुरावा काय? तसेच सर्वच्या सर्व गोष्टी मांडल्याच पाहिजेत का? त्यांच्या आत्मचरित्रात प्रांजळपणा आहे हे नक्की. त्यातून शिकण्यासारखे, वाचक म्हणून समृद्ध करणाऱ्या गोष्टी देखील भरपूर आहे. पण हाच प्रांजळपणा बऱ्याचदा वादविवादाचे, चिखलफेकीचे कारण बनते. या पुस्तकातील बरेच प्रसंग, उल्लेख हे अश्या वादासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, होती. पण त्यांच्या आत्मचरित्राबाबत असे अजून तरी झालेले दिसत नाही.

थोडेसे अनुवादाबद्दल, जो नक्कीच वाचनीय आहे, बहुधा मूळ पुस्तकातील, कथानातील ओघवतेपण टिकून आहे. पण बऱ्याच ठिकाणी शब्दयोजने मुळे रसभंग होतो. अय्यो हा शब्द पक्का कर्नाटकी आहे, तो मराठीत का वापरावा? प्रचोदन, सांद्र अनुभव, साक्षी-चित्र, खेळता खेळता आयुष्य हे असे शब्दप्रयोग थोडा त्रास देतात. मी कन्नड जाणतो, कर्नाटकाची संस्कृती, भूभाग जाणतो, म्हणून मी तेथील बऱ्याच गोष्टी ज्या पुस्तकात आल्या आहेत त्या समजू-उमजू शकलो, पण इतर भाषिकांना तो भाग कितपत भावेल याची मला शंका आहे. कन्नड मधून मराठी भाषांतर करण्याचा मला देखील छोटासा अनुभव आहे, उमा कुलकर्णी यांनी अर्थात कितीतरी पुस्तके केली आहेत. पण हे भाषांतर प्रकरण अवघडच असते हे मात्र नक्की. पुस्तकात छायाचित्रे आहेत, पण ती छोटी छोटी का आहेत हे समजले नाही. मुखपृष्ठावर त्यांचे एक छायाचित्र आहे, जे आगोम्मे ईगोम्मे या आधी उल्लेख केलेल्या त्यांच्याच कन्नड पुस्तकाच्या मलपृष्ठावर आहे. ते रूहशाद गार्दा यांनी काढले आहे असे त्यात नमूद केले आहे. पण ते काय आहे हे कुठेच सांगितले आहे. मला वाटते ते हयवदन नाटकाच्या संदर्भातील दोन मस्तकं ही जी संकल्पना आहे, ती त्यांनी त्यातून दर्शविली आहे. गिरीश कार्नाड यांच्या कामाची यादी पुस्तकाच्या शेवटी सूची रूपात दिली आहे, ती एकदम उपयुक्त आहे.

असो. गिरीश कार्नाड किती वैविध्यपूर्ण, समृद्ध आयुष्य जगले आहे, असेच म्हणावे लागेल. आपण त्यांना आजही अधून मधून हिंदी चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका करताना पाहत असतोच. त्यांच्या आयुष्याचा पुढील भागाचे आत्मचरित्र लवकर यावे हीच सदिच्छा!

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s