Oedipus Rex Opera

आपल्या पुण्यात प्राचीन ग्रीक नाटकांचे(ज्या ग्रीक शोकांतिका म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत) प्रयोग सादरीकरण कधी झालेले ऐकले नाही(चू. भू. द्यावी घ्यावी!). शेक्सपियरच्या नाटकांचे मराठीत अथवा इंग्रजीत, कधी कधी प्रयोग होत असतात. मी तीही विशेष पाहिली नाहीत. राजा लिअर(King Lear) पाहिल्याचे आठवते आहे. सूर्य पाहिलेला माणूस हे डॉ. श्रीराम लागू यांचे ग्रीक पार्श्वभूमी असलेले नाटक पहिले आहे, पण ते मूळ ग्रीक नाटक नव्हे, ते आहे मकरंद साठे यांचे. काल सकाळी सकाळीच समजले की Oedipus Rex, हे इडिपस राजाच्या जीवनावरील प्राचीन ग्रीक नाटक होणार आहे. म्हटले जाऊयात. पु ल देशपांडे यांनी राजा ओयादिपौस या नावाने ते नाटक अनुवादित केले होते हे माहीत होते. पुण्यातील Alliance Francaise या फ्रेंच भाषा शिकवणाऱ्या संस्थेतर्फे होणार होते. गेली ७० वर्षे फ्रान्स मध्ये Aix-en-Provence Festival नावाचा एक संगीत महोत्सव होतो. त्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार होता. पुण्यातील IISER या संस्थेच्या प्रेक्षागृहात तो होणार होता. तेथे सातच्या आत गेलो, रंगमंचावर काहीच हालचाल नव्हती. रंगमंच देखील नाटकाच्या प्रयोगाला छोटासा वाटत होता. मनात पाल चूकचुकली. थोड्यावेळात आयोजक आले, आणि त्यांनी सांगितले की हा Oedipus Rex या नाटकावर आधारित ओपेरा आहे आणि ते आम्हाला त्याचे रेकॉर्डींग दाखवणार आहेत. मग सगळा उलगडा झाला.

त्या ओपेराची माहिती असलेला थोड्यावेळात आमच्या हातात एक कागद दिला गेला. त्यात त्या ओपेराचे शब्द(libretto) होते. तो ओपेरा Igor Stravinsky या संगीतकाराने बसवला होता. ओपेराचे शब्द मूळ नाटकावरून फ्रेंच आणि मग लॅटिन भाषेत आणले होते, त्यावर आधारित तो ओपेरा असणार होता. त्याबद्दल सांगताना निवेदिकेने आधीच कल्पना दिली की हा ओपेरा लॅटिनमध्ये असल्यामुळे तो समजणार नाही. त्यामुळे ओपेराच्या मूड मध्ये जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा लागेल. आधी दिलेल्या libretto च्या कागदावरून थोडेफार समजेल. त्यात लॅटिन, आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत शब्द होते. काहीतरी वेगळे पाहायला मिळेल म्हणून आसनावर सरसावून बसलो.

नुकतेच मी मुंबई भेटी दरम्यान परत नव्याने सुरु झालेले Royal Opera House पाहून आलो होतो. अर्थात त्यावेळेस तेथे ओपेरा नव्हता. पण आतील कलात्मक, वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासारखी आहे. Pretty Woman सारख्या सिनेमातून ओपेरा म्हणजे काय असतो याची झलक आपल्याला झाली असते. मराठी संगीत नाटक ओपेरावरून आले असे म्हणतात. ओपेराचा आकृतिबंध संगीतीकेचा. निवेदन आणि संवाद दोन्ही पद्य रूपात साधारण असते, जोडीला बऱ्याचदा नृत्य(ballet) देखील असते. साधारण प्रेम, विरह, सूड, दुःख अश्या भावना तार स्वरात गाऊन, नृत्य, आणि पाश्चिमात्य कंठ आणि वाद्य संगीत, प्रामुख्याने ग्रीक, लॅटिन शब्द, उंची पाश्चिमात्य पोशाख असे सर्व त्यात असते. श्रीकृष्ण पंडित यांचे एक ओपेराच्या गोष्टी म्हणून एक पुस्तक आहे, ज्यात त्यांनी तीन ओपेरांच्या संहितेचे अनुवाद दिले आहेत. मी २०१४ मध्ये फिलाडेल्फिया मध्ये गेलो असता, तेथील The Barnes Foundation मध्ये एक ओपेराची झलक A Taste of Opera(Ainadamar) दाखवणारा कार्यक्रम पाहिला होता. त्यात लोर्का या स्पेनच्या नाटककाराच्या जीवनाची कथा सांगितली होती. या सर्वामुळे ह्या ओपेराची चित्रफीत पाहायला मी उत्सुक होतो.

Oedipus Rex या सोफोक्लेसकृत ग्रीक शोकांतिकेची कथा, अगदी थोडक्यात, साधारण अशी आहे. एका ग्रीक पुराणककथेवर आधारित हे नाटक आहे. राजा इडिपसला आपले पिता म्हणजे राजा लुईस आहेत हे माहीत नसते. राजा लुईस यांच्या मरणाला तो कारणीभूत झालेला असतो. तसेच गंमत म्हणजे अजाणतेपणी त्याचा दिवंगत राजा लुईसच्या पत्नीबरोबर, म्हणजे आईबरोबर विवाह होतो. काहीतरी धार्मिक अनाचारामुळे प्लेग रोगाच्या साथीने प्राचीन ग्रीसमधील थेब्सला ग्रासले असता, याला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी राजा इडिपस फर्मान काढतो. प्रजेच्या आवाहनानुसार तो ते करत असता, त्याला उमजते की तो स्वतःच याला जबाबदार आहे. त्याला हेही समजते की राजा लुईसच्या मृत्यूला देखील तोच जबाबदार आहे तसेच त्याची आई म्हणजे त्याची पत्नी जोकोस्टा आहे, हे समजल्यावर तर तो भ्रमिष्ट होतो, आणि आपले स्वतःचे डोळे काढून घेतो आणि अंध होतो. ही त्याची नियती आणि शोकांतिका.

Oedipus Rex Opera

Oedipus Rex Opera

हा ओपेरा(Oedipus Rex/Symphonie de Psaumes ) जो मी व्हिडियो स्क्रीनिंग रूपात पाहिला हा दोन अंकी होता, आणि २०१६ मध्ये Paris च्या Grand Theater de Provence झालेल्या प्रयोगाचे ते रेकॉर्डींग होते. निवेदकाने ह्या ओपेराच्या इतिहासाबद्दल थोडसे कथन केले. यांचे प्रयोग १९२७ पासून सुरु आहेत. संवाद, जे पद्य रूपात आहेत ते लॅटिन भाषेत आणि निवेदन(narration) हे फ्रेंच भाषेत आहे. हा ओपेरा असल्यामुळे मूळ नाटकातील काही महत्वाच्या घटनांचेच चित्रण यात केले गेले आहे. नाटकात आणि ह्या ओपेरात प्रजाजन हा महत्वाचा घटक असल्यामुळे, येथे सुद्धा जवळ जवळ ४०-५० जणांचा कोरस आहे, आणि त्यांचे गाणे देखील बऱ्याच वेळेस येते. नेपथ्य अगदी जुजबी, वेशभूषा तर आजच्या जमान्यातील. प्रजा शर्ट, जीन्स आशा रूपात, आणि राजा तर सुट, बूट, टाय अश्या रूपात. इतर काही पात्रे जसे की जोकोस्टा गाऊन परिधान करून आले होते. मी हा पाहिला अंक पाहिला, दुसऱ्या अंकांचा सुरुवातीची काही मिनिटे पाहिला आणि भूक लागली म्हणून उठून निघून गेलो. अर्थात शब्दतर काही कळत नव्हते, कथा थोडीशी मोघम माहिती होती, म्हणून थोडेफार काय चालू आहे हे समजत होते. नेपथ्य, वेशभूषा देखील प्रेक्षणीय नसल्यामुळे नेत्रसुख विशेष नव्हते. कंठ आणि वाद्य संगीताचे श्रवणसुख घेण्याचा प्रयत्न केला, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे समजत न्हवते, गाढवाला गुळाची चव ती काय येणार! त्यातल्या त्यात अभिनय(प्रामुख्याने राजाची भूमिका केलेल्या अभिनेत्याचे ), भावभावना यांचा अविष्कार थोडाफार उमजत होता, ही जमेची बाजू.

पुण्यात Alliance Francaise च्या निमित्ताने बरेच असे कार्यक्रम आखले आहेत. ते त्यांच्या संकेतस्थळावर जाणता येतील.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s