२२ जून १८९७

काल २२ जून. पुण्यात चापेकर बंधूनी इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड याची हत्या केल्याचा दिवस. २१ जून कसा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून(आणि आता आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून) कायम लक्षात असतो, तसं २२ जून हा चापेकर बंधूंचा म्हणून मी हटकून लक्षात ठेवला आहे. त्याला आणखीन एक कारण आहे. मी पुण्याजवळ चिंचवड मध्ये राहिलो, वाढलो. चिंचवड गावातील चापेकर बंधूचा वाडा, गावातील मुख्य चौकातील दामोदर हरी चापेकरांचा पिस्तुल चालवतानाचा पूर्णाकृती पुतळा कायम जाता येता डोळ्यासमोर राही. खरे तर तो पुतळा, ते घड्याळ असलेला मनोरा म्हणजे चिंचवडची ओळख झाली होती. अर्थात अधिक कित्येक शतके आधी मोरया गोसावी समाधी, गणपती मंदिर, पवना नदीचा तो रमणीय काठ, मंदिरामागील घाट अशी ओळख होती, आणि अर्थात नंतर चिंचवडची औद्योगिक क्षेत्र म्हणून नंतर ओळख झाली.

मी दूरदर्शनवर कित्येक वर्षांपूर्वी शाळेत असताना २२ जून १८९७ नावाचा चापेकर बंधूंवर तयार केलेला चित्रपट पाहिला होता. हत्येच्या घटनेला आता १२० वर्षे होऊन गेली. चार एक वर्षात शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होईल. काल मी हा चित्रपट परत पाहिला. हा चित्रपट युट्युब वर येथे आहे. शाळकरी वयात हा पाहिलेला चित्रपट मनात खूप रुतला होता. काल तो परत पाहताना पुन: प्रत्ययाचा आनंद मिळाला, खुपच छान सिनेमा आहे, पण प्रिंट तितकीशी खास नाही. इनमीन दोन तासांचा चित्रपट. तरुण अश्या रविंद्र मंकणीची भूमिका आहे त्यात. १९७९ मध्ये आलेला हा चित्रपट अर्थात पुण्यात तसेच चिंचवड मध्ये घडतो. स्वातंत्र्यापूर्वीचा पुण्यातील तो काळ. एकोणिसावे शतक संपत आलेले. ब्रिटीशांनी हिंदुस्तानात आपले पाय भक्कम रोवले होते. टिळकांचा(चित्रपटात सदाशिव अमरापूरकर) तसेच त्यांच्या जहाल मतांचा तो उत्कर्षाचा काळ. चापेकर बंधूंवर टिळकांच्या जहाल मतांचा, सशस्त्र क्रांतीचा प्रभाव पडलेला. त्यातच पुण्यात १८९६ साली प्लेग रोगाची भीषण अशी साथ पसरली. चापेकरांचे कुटुंब म्हणजे कर्मठ सनातनी ब्राम्हण आणि शिकलेले. त्यांचे वडील कीर्तन करत, तेही चित्रपटात दाखवले आहे.

 

इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड ह्याला पुण्यात प्लेगवर उपाय योजना करण्यासाठी कमिशनर म्हणून नेमले गेले. प्लेग साथीचे निर्मुलन करण्यासाठी त्याने योजलेले काही असंवेदनशील उपाय जसे घराघरात घुसून तपासणी करणे, लोकांना बळजबरीने बाहेर काढणे, या सर्वांमुळे तसेच पुण्यातील हिंदू धर्मियांच्या भावना निष्ठूरपणे दुखावल्यामुळे, स्त्रियांशी असभ्यपणे वागल्यामुळे त्याच्या विरुद्ध असंतोष बळावत होता. चित्रपटाच्या पहिल्या तासाभरात हा सगळा मामला येतो. त्याकाळातील पुण्यातील वाडे, ब्राम्हणांची वस्ती, घरे, ब्रिटीश अधिकारी हे सगळे छान चित्रित केले आहे. धर्मांतरासाठी फूस  ख्रिस्ती मिशनरीच्या विरुद्ध असंतोष होता, त्याचे पर्यावसन एका पाद्रीवर चापेकर बंधू हल्ला करण्यात, होते असा एक प्रसंग आहे(ब्रिटीश कालीन धर्मांतराच्या संबंधित अनेक कांगोऱ्यांचा वेध घेणारी वि. ग. कानिटकर यांची एक कादंबरी आहे, त्याच्याबद्दल जरूर येथे वाचा). ब्रिटीश राणी विक्टोरिया हिच्या ब्रिटीश साम्राज्याच्या राज्यरोहण घटनेला ५० वर्षे झाली होती, यानिमित्ताने आज ज्या ठिकाणी पुणे विद्यापिठ आहे तेथे कार्यक्रम असणार होता. कमिशनर रँडला तेथून रात्री परत येताना गणेशखिंडीच्या झाडीत मारण्याचा चापेकर बंधू कट रचतात, आणि त्याप्रमाणे त्याची ते पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करतात. हा प्रसंग अतिशय छान वठला आहे. ‘गोंद्या आला रे’ अशी आरोळी, बग्गीच्या घोड्यांच्या टापांचा आवाज, रात्रीचा काळोख, झाडी हे सर्व वास्तवदर्शी वाटते पाहताना. चित्रपटाला विशेष असे पार्श्वसंगीत नाही, खरेतर कमीतकमी संवाद, साऱ्या चित्रपटभर सन्नाटा हे सर्व वातावरण निर्मिती करतात.

चित्रपटाच्या उरलेल्या तासाभरात हत्येनंतर काय काय होते हे सर्व होते. नेहमीप्रमाणे लोकमान्य टिळकांवर संशयाची सुई येते. नंतर अर्थात चापेकर बंधूंना धरपकड, चौकशी(त्यासाठी पुण्यात फरासखान्यात ठेवले गेले असा उल्लेख येतो), खटले, आणि फाशी हे सर्व विस्ताराने दाखवले आहे. चापेकर ब्रदर्स नावचा आणखीन एक सिनेमा एक-दोन वर्षांपूर्वी येऊन गेल्याचे आठवते. तो मात्र मी नाही पाहिला. नुकतेच मला समजळे की माझ्या एका मित्राचे वडील पाळंदे यांनी चापेकरांच्या पित्याची भूमिका केली होती. चापेकर बंधूंच्या या कामगिरीमुळे खरेतर इतर ठिकाणी देखील ठिणग्या पडल्या आणि ब्रिटीश साम्राज्याला धक्के बसण्यास सुरुवात झाली असे इतिहास सांगतो.

मला WhatsApp वरून मिळालेली माहिती अशी की, “वॉल्टर चार्ल्स रॅंड हा आय सी एस ऑफीसर होता. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलजवळ त्याचं आयुष्य गेलं.  १८९७ मध्ये त्याचा खून होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच – खास करून मुंबईच्या आसपास होता. रॅंडचे कागद अभ्यासत असताना त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळालं. २३ सप्टेंबर १८८३ चं त्याच्या हस्ताक्षरातलं हे पत्र. तो अंडर सेक्रेटरीला लिहीतोय की त्याने  मुंबईला जाण्यासाठी ‘व्हिक्टोरीया’ जहाजात जागा बुक केली आहे. पण त्याला अजून ऑफीशियल सेलिंग ऑर्डर्स (Sailing Orders) मिळालेल्या नाहीत. त्या डलविचला पाठविण्याची व्यवस्था व्हावी. २४ सप्टेंबरला हे पत्र इंडीया ऑफीसला मिळाले आणि २६ तारखेला त्याच्या सेलिंग ऑर्डर्स पाठवल्या गेल्यासुध्दा (हे सगळे तारखांचे शिक्के पत्रावर आहेत!)
त्याचा आणि आयर्स्टचा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत श्रीमती रॅंड व श्रीमती आयर्स्ट ह्यांना स्पेशल पेन्शन सुरु झाले. श्रीमती रॅंड ह्यांना वार्षिक £२५० व त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक £२१ मिळत होते तर श्रीमती अायर्स्ट ह्यांना वार्षिक £१५० व त्यांच्या मुलांना वार्षिक £१५ मिळत असत. दोघेही ऑन-ड्यूटी मारले गेले असल्याने ही खास वाढीव दराने पेन्शने होती. हे सगळे पेन्शनचे कागद ब्रिटीश लायब्ररीत आहेत. दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई (ज्यांचे नावही आपल्याला माहीत नसते!) १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या.  ह्या पुढे ६० वर्षे – म्हणजे १९५६ पर्यंत जगल्या – १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले ना कोणते त्यांचा नवरा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट”

हे सर्व वाचून एकूणच आपल्या वारश्याबद्दल आपली असलेली अनास्थाच समोर आली. चिंचवड गावातील मधील तो पुतळा चौकातून आता हटवून १२-१५ वर्षे झाली आहेत, फ्लायओव्हर करण्यासाठी. त्याच चौकात एका बाजूला एक वेगळे शिल्प समूह साकारले गेले आहे, इतक्याच त्याचे अनावरण झाले.

चिंचवड गावात चापेकर बंधूंचा एका वाडा आहे, तेथेही मी एकदोनदा गेलो होतो. औंध वरून पुणे विद्यापीठाकडे जात असता, सध्याच्या पुणे सेंट्रल मॉल असलेला भाग ज्याला गणेश खिंड असे म्हणत, ब्रिटिशांच्या काळात भरपूर झाडी असलेला जंगल असलेला भाग होता असे दिसते. त्या ठिकाणी चापेकर बंधूंनी पिस्तुलाने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तेथे एक नाममात्र फलक आहे, तेवढेच. जाता येता तो लक्षात देखील येत नाही. पुण्यात त्यांचे वास्तव्य कुठे होते, तेथे काही स्मारक आहे का याची माहिती मला तरी नाही, किंवा चापेकर यांचे वंशज काय करतात, कोठे असतात हे ही माहिती नाही.

चापेकर बंधू वाडा

चापेकर बंधू वाडा, चिंचवड गाव

असो. तर असा हा २२ जून, आपल्या पुण्यातील, चिंचवडमधील क्रांतीवीर,राष्ट्रप्रेमी, करारी चापेकर बंधूंनी केलेल्या कामगिरीचे स्मरण करण्याचा, अभिमान बाळगण्याचा दिवस!

ताजा कलम: आजच(जुलै ७) वर्तमानपत्रात वाचले की, उद्या रविवारी चापेकरांच्या जीवनावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. चला, देर आये, लेकिन दुरस्त आये!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s