समाजस्वास्थ्य

भारताचा ७१वा स्वातंत्र्यदिन  सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शंभर एक वर्षांपूर्वी भारतात जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले होते, तेव्हा काही मंडळी समाजसुधारणेला प्राधान्य देऊन त्यात काम करत होते. स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी हा प्रश्न होता. या अनुषंगाने टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेद प्रसिद्ध आहेत. समाजसुधाराण्यांचा भर शिक्षण, समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन, जाती व्यवस्था, समानता, वैज्ञानिक दृष्टीकोन, स्त्रीमुक्ती, विधवा विवाह, आणि इतर अनेक विषयांवर काम करणे हा होते. त्यांचा जोर अर्थातच बुद्धीवादावर. सगळ्या समस्यांकडे, परिस्थितीकडे बुद्धिनिष्ठ पद्धतीने पाहणे हे वैशिष्ट्य. समाजसुधारणा विषयात काम करणाऱ्यांमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे एक अग्रणी समाजसुधारक होते. त्यांचे पुत्र राधुनाथ हे देखील अश्याच एका वेगळ्या विषयात समाजमन ढवळून टाकत होते. त्यांच्या जीवनपट उलगडणारा ध्यासपर्व हा मराठी चित्रपट २००१ मध्ये मी पाहिला होता. अमोल पालेकर यांचा तो चित्रपट. त्यात किशोर कदम याने रघुनाथ कर्वे यांची भूमिका केली होती.

गेल्या वर्षीच रघुनाथ कर्वे यांच्या वरील एक नाटक आले, ज्याचे नाव समाजस्वास्थ्य,  तेव्हा माझी उत्सुकता ताणली गेली होती. त्यातच अजित दळवी हे नाटककार, आणि अतुल पेठे हे प्रमुख कलाकार, आणि दिग्दर्शक सुद्धा. हे नाटक मी नुकतेच पाहिले. रघुनाथ  धोंडो कर्वे उर्फ रधों हे त्यावेळेस, किंबहुना आजही, अतिशय दुर्लक्षित, घोर अज्ञान असलेल्या लैंगिक शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात या विषयात काम करत होते. त्यांना खरेतर लैंगिक बुद्धिवादाचा प्रणेते असेच संबोधले जाते. अमोल पालेकरांचा चित्रपट त्यांच्या एकूणच जीवनाचा वेध घेतो, तर हे नाटक रधों वरील विविध खटल्यांचा, न्यायालयीन वादविवादाचा मागोवा घेते. रधोंचे प्रमुख कार्य म्हणजे ते लैंगिक विषयाशी, आणि प्रामुख्याने कुटुंबनियोजन अथवा संततीनियमन या विषयांशी निगडीत प्रबोधन करणारे समाजस्वास्थ्य हे मासिक चालवत असत. त्यातील लेखांवर आक्षेप घेणारे, प्रामुख्याने त्याकाळच्या कर्मठ, सनातनी लोकांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. खटले उभे राहिले, कारावासाची शिक्षा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रघुनाथ कर्वे यांच्या बाजूने खटले लढवत. हे सर्व या नाटकातून मांडण्यात आले आहे. या अनुषंगाने त्यांच्या क्रांतिकारक, काळाच्यापुढील विचारांचा प्रेक्षकांना परिचय होतो.

प्रसिद्ध मराठी साहित्य अभ्यासक, समीक्षक अनंत देशमुख यांनी रधोंच्या लेखनाचा, त्यांच्याविषयी उपलब्ध लेखन सामग्रीचा अभ्यास करून, त्यांनी संपादन केलेल्या आठ पुस्तकांचा संच प्रकाशित पद्मगगंधा प्रकाशन तर्फे काही वर्षापूर्वी झाला होता. रधोंबद्दल आणखीन माहिती करून घेण्यास तो वाचायला हवा. पण हे नाटक नक्कीच त्या काळात आपल्याला घेऊन जाते. अतुल पेठे यांचा जबरदस्त अभिनय, स्पष्ट संवाद हे सर्व नक्कीच जमेची बाजू आहे. समाजस्वास्थ्य हे मासिक त्यांनी १९२७ पासून पंचवीसहून अधिक वर्षे चालवले. अनेक लेख लिहिले, इतरही समकालीन मासिकांतून लेख लिहिले, बरेच वाद ओढवून घेतले, मनस्ताप सहन करावा लागला. नाटक प्रामुख्याने अर्थात कोर्टात घडते, पण तसेच ते त्यांच्या घरात देखील घडते. अतुल पेठे यांच्या अभिनयातून रधोंचे करारी व्यक्तीमत्व, अभ्यासू वृत्ती, हाती घेतलेल्या कार्याप्रती समर्पण इत्यादी त्यांचे गुण नक्कीच प्रकट होतात. नाटकघर संस्थेतर्फे हे वैचारिक नाटक सादर करण्यात आले आहे.

ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मिळून स्वतःच्या मुंबईतील घरातच संततीनियमन केंद्र सुरु केले, त्याची झलक नाटकात सुरुवातीच्या पहिल्या काही प्रसंगातच दिसते. तसे पहिले तर भारतात प्राचीन काळापासून लैगिक विषयांवर मोकळेपणाने विचार करण्याची परंपरा होती हे कामशास्त्र सारख्या विविध कृतींमधून, तसेच इतिहासाचार्य राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास सारखे पुस्तक, यातून दिसते. पण मधल्या काळात सनातनी, कर्मठ संस्कृती मध्ये अंधश्रद्धेमुळे असेल, अज्ञान असेल, किंवा पुरुषी वर्चस्वाच्या वृत्तीमुळे असेल, हे विचार कुठेतरी लुप्त झाले. ते का व कसे झाले याचा अभ्यास करायला हवा.  पण जवळ जवळ एक शतकापूर्वी भारतात जेव्हा स्वातंत्र्य चळवळ जेव्हा ऐन भरात होती तेव्हा रधों यांनी हे समाजप्रबोधनाचे कार्य सुरु केले.

जाता जाता अजून एक. आजच हा ब्लॉग लिहिताना अमेरिकेत पंचवीस वर्षानंतर रंगमंचावर परत आलेले Angels in America या Tony Kushner लिखित नाटकाबद्दल एक वृतांत पाहण्यात आला. Andrew Garfield ची प्रमुख भूमिका त्यात आहे. हे नाटक(खरे तर महानाटक, कारण दोन भागात, एकूण ७ तासांचे आहे असे समजले), १९८० च्या दशकात अमेरिकेत AIDS मुळे उठलेल्या वादळाचा, समलैंगिक संबंधाचा, त्या संबंधी असलेल्या अज्ञानाचा, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचा वेध घेते. आज समाजस्वास्थ्य बद्दल लिहीत असताना हे पाहण्यात आले, या योगायोगाचा मला अचंबा वाटला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s