ब्रीज आणि मी

पत्त्यांचा खेळ कोणाला आवडत नाही? आपण सगळे कधी ना कधी पत्ते खेळले असतो. किमान पक्षी पत्त्यांचा बंगला तरी उभारलेला आणि उद्ध्वस्त देखील केलेला असतो. अथवा पत्त्यांची जादू नक्कीच पाहिली असते. आपल्यापैकी बरेच जण अजूनही पट्टीचे पत्तेबाज, पत्ते कुटणारे, नेहमी खेळणारे नक्कीच असतील. दिवाळीत किंवा महिलावर्गांच्या किट्टी पार्टीत (भिशी हो!) तीन पत्ती, रमी, जब्बू, बदाम सात, मेंढीकोट, पाच-तीन-दोन असे खेळ खेळत असतो. मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रांसोबत, बाहेर उन्हात उंडारण्यापेक्षा, पत्त्यांसारखा बैठा खेळ खेळत असू, पण ह्या मोबाईलच्या जमान्यात आजकालची मुले पत्ते खेळत असतील असे वाटत नाही. गेल्या काही वर्षांपासून संगणकावर, इंटरनेट वर पत्ते खेळण्याची देखील टूम निघाली आहे. पत्त्यांचा ब्रीज नावाचा एक खेळ असतो हे किती जणांना माहिती आहे? ते सोडा. इंडोनेशिया मधील जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या अशियाई खेळामध्ये भारतीय संघाला ब्रीज खेळामध्ये कास्य पदक मिळाले हे किती लोकांना माहिती आहे? मला देखील हे सगळे अगदी योगायोगाने समजले, नाहीतर अशियाई खेळासारख्या स्पर्धेत पत्त्यांचा खेळ असेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते.

Playing Cards

Courtesy Internet

मी खूप पूर्वी कधीतरी ब्रीज या पत्त्यांच्या खेळाबद्दल ऐकले होते. वर्तमानपत्रातून पूर्वी कसे, शब्दकोड्यासोबत बुद्धीबळाचे डावपेच येत असत तसे ब्रीजचे देखील येत असत. दैनिक सकाळ मध्ये असे वडनप यांचे बुद्धीबळाचे डावपेच येत असत. आणि इंग्रजी वर्तमानपत्रातून ब्रीज येत असे. पण विशेष अशी उत्सुकता वाटली नव्हती. दीड एक दशकापूर्वी एका कार्यालयीन सहकाऱ्याचा पती ब्रीज खेळतो, एवढेच नव्हे तर त्याच्या विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी भाग घेण्यास नेहमी इकडे तिकडे देशभर फिरत असतो हे समजले तेव्हा गंमत वाटली होती. त्याच्याशी त्यावेळी बोलताना ब्रीज खेळाला गोल्फ खेळासारखे वलय आहे हे मात्र उमजले होते. ब्रीज म्हणजे काय भानगड असते हे जाणून घ्यावेसे वाटू लागले. पण तेव्हा विशेष काही घडले नाही.

नंतर चार-पाच वर्षानंतर आमच्या गृहसंकुलात(सोसायटी हो!) क्लब हाउस मध्ये काही निवृत्त मंडळी ब्रीज खेळत असतात असे कळाले. गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या गृहसंकुलाची टूम निघाल्यापासून, ही क्लब संस्कृती, जी पूर्वी काही विशिष्ट उच्चस्तरीय लोकांपुरती, किंवा सैन्यातील लोकांच्या पूर्ती (ब्रिटीश राज मुळे असेल) मर्यादित होती, ती थेट गृहसंकुल संस्कृती मुळे सर्व सामन्यापर्यंत येऊन पोहोचली. त्या मंडळीतील एका सदस्याला एक दिवस पकडून ब्रीज शिकण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न तोकडा पडला, विशेष प्रगती झालीच नाही. नुसता आरंभशूर पणा झाला! नेहमीच्या इतर पत्त्यांसारखा हा खेळ नाही हे कळले. बुद्धिबळासारखे यात डावपेच आखायचे असतात, आकडेमोड, गणित, तार्किकता असते. एकूणच हलकीशी मानसिक, बौद्धिक चालना देणारा हा एक सांघिक खेळ आहे हे मात्र समजले. त्यामुळेच याच्याभोवती वलय आहे. बुद्धीबळासारखी कठोर मानसिक, बौद्धिक कसरत नाही. तो विशिष्ट्य स्तरातील (rich and famous), विशिष्ट्य वयातील लोकांनीच खेळावा असा संकेत. पण गोल्फ सारखे ब्रीज खेळणे हा काही खर्चिक खेळ अजिबात नाही, आणि तो कुणालाही कुठेही खेळता येतो खरेतर. पत्ते, सोंगट्या, आणि इतर जुगाराच्या खेळांचा इतिहास सांगणारे माझ्याकडे एक जुने, जाडजुड पुस्तक आहे. पुण्यात एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात खूप पूर्वी ते मला सापडले होते. त्या आठशे साडे आठशे पानाच्या पुस्तकात ब्रीज खेळावर The Wide World of Bridge या नावाचे एक आख्खे ४०-५० पाने असलेले प्रकरण आहे. १९७४ मधील या पुस्तकाचे नाव आहे Scarne’s New Complete Guide to Gambling.

या पुस्तकात लेखक लिहितो, ‘Bridge is third most popular card game played in the United States, surpassed only by Poker and Rummy in the millions of its followers. The principles of Bridge game goes back 400 years in England. Whist, the basic game, developed into Bridge (1896), then Auction Bridge (1904), and finally Contract Bridge (1925). Whist and Auction Bridge still has many followers, but since about 1930 Contract Bridge has been more popular’.  ब्रीज खेळाचा जुगार असतो, त्यात लबाडी करता येते, आणि पैसे लावून ब्रीज जेव्हा खेळतात तेव्हा नक्कीच लांडीलबाडी होते असेही त्याने लिहिले आहे. मी पूर्वी अमेरिकेत असताना जागतिक जुगाराची पंढरी म्हणजे लास वेगास येथे गेलो होतो (त्या बद्दल सविस्तर लिहायचे राहिलेच आहे), काही ठिकाणी पैसे लावून जुगार खेळलो देखील! तेथे विविध पत्त्यांच्या खेळांवर देखील जुगार लावता येत होता, पण ब्रीज खेळ होता की नाही हे आठवत नाही.

२०१८ जकार्ता अशियाई खेळामध्ये भारतीय संघला ब्रीज खेळामध्ये कास्य पदक मिळवून दिलेल्या विजेत्या संघामध्ये माजी खासदार मुरली देवरा यांच्या पत्नी हेमा देवरा, एका स्वीस स्टील कंपनीचे प्रमुख राजू तोलानी, उद्योजक पती पत्नी राजीव आणि हेमा खंडेलवाल, HCL Technologies या प्रसिद्ध IT company चे संस्थापक शिव नादर यांच्या पत्नी किरण नादर, तसेच IITian असलेले सत्यनारायण अशी सर्व मंडळी, त्यातील बरीचशी मंडळी पन्नाशी साठी च्या पलीकडली. ही सर्व नावे  वाचल्या नंतर नक्कीच असे पटेल की हा खेळ rich and famous लोकांसाठीच आहे. खरे तर तसे असण्याचे काही कारण नाही.

असो. पत्ते म्हटले की जुगार, मुलांनी पत्ते खेळू नये असाच एकूण कल. सर्वसाधारणपणे पत्त्यांच्या खेळात अनिश्चितता असते, आणि त्यामुळे नक्कीच मजा येते ते मात्र खरे आहे. ब्रीज सारखा बौद्धिक खेळ, ज्यात नशीब, रामभरोसे हा प्रकार नाही, त्यामुळे नक्कीच सर्वांनी खेळण्यासारखा आहे, आणि त्याची मजा वेगळी असते. या वर्षी अशियाई खेळामध्ये भारतीय संघला ब्रीज खेळामध्ये कास्य पदक मिळाले हे ऐकल्यानंतर माझ्या मनाने परत उचल खाल्ली आहे की परत ब्रीजकडे वळावे या साठी. ही अजून एक गोष्ट माझ्या bucket list मध्ये येऊन पडली आहे. पाहुया कसे जमते!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s