फालतूपणाचा आरसा

माझी एक वाईट सवय आहे. कुठे कधी एखादा कागदाचा चिटोरा, तुकडा दिसला की तो हातात घेऊन वाचायला मी धावतो. किराणा समानाच्या पुडक्याचे कागद, किंवा इस्त्रीचे कपडे ज्यातून आणलेले असतात ते कागद, काहीही. ह्या सवयीतून अचानक वेगळी माहिती हाती लागते. असे अनेक वेळेस झाले आहे.

एकदा असेच झाले. इस्त्रीचे कपडे परिटाने बांधून दिले होते तो कागद हाती लागला. तो होता इंग्रजी वर्तमान पत्र The Times of India च्या Pune Mirror या पुरवणीचा. त्यातील एका लेखावर नजर पडली. तो अर्धवट लेख होता, कारण वेष्टनासाठी तो बांधताना फाडला गेला होता. लेखाचे शीर्षक होते The Fictional Worlds of Pune.तो लेख होता एका मराठी पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरासंबंधी. खरे तर दोन मराठी लघु कादंबरींचा एका इंग्रजी पुस्तकात रूपांतरीत केले होते. मूळ मराठी लेखक अवधूत डोंगरे. एका पुस्तकाचे नाव स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट(ह्याला 2014 वर्षासाठी साहित्य अकादमीच युवा पुरस्कार मिळाला आहे) आणि दुसरे एका लेखकाचे तीन संदर्भ. दोन्हीमध्ये पुण्याचे संदर्भ भरपूर असा त्या लेखाचा एकूण सुर होता. नदीम खान यांनी ती इंग्रजीत आणली आहेत. तो लेख आपण येथे वाचू शकता. मला मूळ मराठी पुस्तकांबद्दल उत्सुकता वाटली. मराठी कादंबरीची नावे तर वेगळी होतीच. ती मी लगेच मागवली.

त्या दोन्ही लघु कादंबर्‍यांतून इंग्रजीमध्ये ज्याला stream of consciousness in narration(संज्ञा प्रवाह) किंवा थोडक्यात स्वगत असेही म्हणतात तसा प्रकार त्यात वापरला आहे. त्या दोन्ही मधील स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट हे छोटेसे पुस्तक पटकन वाचून संपवले. कथा अशी नाहीच. पण मनाच्या अस्वस्थपणाचे चित्रण नक्कीच त्यात आहे. गोष्ट सांगणारा एक तरुण पुण्यात वास्तव्याला आहे. तेथेच वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका वर्तमानपत्रात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी करत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत भाड्याची एक खोली घेऊन राहतो आहे. कथा असलीच तर ती या वर्तमानपत्राच्या कार्यालयाच्या भोवती, त्यातील इतर काम करणारे लोक, त्यांचे जग, राजकारण, वगैरे गोष्टी त्यात येतात. ह्याच विषयावर खरे तर खूप पृवी प्रसिद्ध लेखक ह मो मराठे यांची ‘न्युज स्टोरी’ नावाची एक कथा आली होती. त्यावर आधारित आलेले नाटक देखील मी पहिले आहे. त्याबद्दल, म्हणजे दोन स्पेशल बद्दल येथे मी लिहिले आहे. त्यात देखील वृत्तपत्र व्यवसाय जगाचे, तेथील वृत्तींचे, अपप्रवृत्तींचे दर्शन घडते. लेखकाने हे पुस्तक प्रसिद्ध लेखक Jack Kerouac याला अर्पण केले आहे जो On the Road या कादंबरीसाठी प्रसिद्ध आहे.

तर हा तरुण अस्वस्थ आहे, त्यातून त्याला जीवनाची निरर्थकता, एकूणच फालतूपणा जाणवते आहे. त्याचे चित्रण आहे. पण का असे व्हावे ह्या अश्या उमेदीच्या काळात? आजूबाजूची परिस्थिति अनुकूल नसेलही कदाचित, पण निराश का व्हावे, एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्या साठी दिवसरात्र काम का करता येऊ नये. ह्याचे उत्तर मिळत नाही. पुस्तक वाचताना भालचंद्र नेमाडे यांची कोसला सारखी आठवत होती.

पुण्यातील फर्ग्सन कॉलेज रस्त्यावरील रानडे इंस्टिट्यूट मध्ये तो तरुण शिकला आहे. त्याचे, त्यातील आवराचे, वाचनालयाचे वर्णन येते. कादंबरीत बर्‍याचदा त्या तरुणाचे कधी काही तरी कामानिमित्त, तर कधी निरुद्देश असे, पुण्यातील विविध ठिकाणी भटकण्याचे वर्णन येत राहते. त्यात मग लकडी पूल, त्यावरील जुन्या पुस्तकांचा विक्रेता(त्याच्याकडील पुस्तकांच्या नावांसकट), पुणे विद्यापीठ परिसर, तेथील उपाहारगृह यांचे, तसेच तिथे दिसलेली विविध माणसे, प्राणी, विविध प्रसंग जसे आपल्या रोजच्या जगण्यात येतात तसेच, त्यांचे निवेदन, अगदी छायाचित्रण केल्यासारखे येते. रविवार पेठ, भवानी पेठ, अलका चित्रपटगृह, पुण्यातील आद्य अमृततुल्य चहाचे दुकान आर्य अमृततुल्य हे देखील येते. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, रिगल कॅफे ही स्थळे पण निवेदनाच्या ओघाने येतात. विद्यापीठाच्या एका इमारतीच्या आवारातील असलेल्या आणि कायमच तिथे दिसणारा एक तीन पायांचा कुत्रा, याचेही ठिकठिकाणी बहारदार संदर्भ लेखक देतात. एक ठिकाणी त्यांनी केलेले त्याच्या बद्दल मनात आलेले विचारांचे वर्णन, हे मलाही कितीतरी वेळेस कुत्री, मांजरी जी आपल्या भोवती फिरत वावरत असतात, त्यांचे अस्तित्व असते, त्याबद्दल आलेल्या विचारांशी मिळते जुळते आहे. ते लिहितात, ‘तीन पायांचा कुत्रा निवांत ऊन खात दगडी चौकात सुंदर बसला होता. हा कुत्रा कधी साधा भुंकताना सुद्धा दिसला नाही. डिपार्टमेंटच्या बाहेर हा कुत्रा कधी गेलेला दिसला नाही. जेवणाखाण्याची सोय आवारात भागते. इकडेतिकडे उगाच मुतत नाही. फक्त शेपटीच्या खालच्या अवयवाची सय भागवायला कधी न कधी बाहेर जाऊन येत असेल तेवढाच.बाकी त्या कुत्र्याच्या शांतातेला तोड नाही. कसल्या का चर्चा आयला त्यांचं काय कुत्र्याला देणेघेणे नाही. ‘

अधूनमधून श्याम मनोहरांच्या कादंबर्‍यांतून जसे त्या त्या काळातील घटनांचे, बातम्यांचे निवेदन येते तसेच येथेही येते. उदाहरणच द्यायचे झाले तर, गडचिरोली मध्ये झालेल्या(आणि नेहमीच होत असलेल्या) माओवादी आणि पोलिस यांच्यातील एकेमेकांवर हल्ल्यात झालेला संहार, पुण्यात कोरेगाव पार्क येथे झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटात झालेले मृत्यू इत्यादि. एकूण स्वतःभोवती घडणार्‍या घटनांना लेखकाची त्यांच्या लेखनातून प्रतिसाद देण्याची, व्यक्त होण्याची निकड ह्यातून दिसते. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने, म्हणजे अवधूत डोंगरे यांनी पुरस्कार समारंभात केलेले भाषण देखील दिले आहे. त्यावरून एकूण भूमिका समजते. तीच गोष्ट त्यांनी केलेल्या भाषणाची. तेथेही ह्या घटनांमुळे व्यथित झालेल्या मनाने, अपराधीभावाने पुरस्कार स्वीकारत आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यातून त्यांची संवेदांशीलताच दिसते.

ह्या दोन पुस्तकांव्यतिरिक्त त्यांच्या अजून एक-दोन कादंबर्‍या आहेत. त्यांनी डों बाबासाहेब आंबेडकर यांच्या Annihilation of Caste या ग्रंथांच्या नवीन आवृत्तीच्या वेळेस अरुंधति रॉय यांनी The Doctor and the Saint या शीर्षकाखाली लिहीलेल्या प्रदीर्घ प्रस्तावांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर केले आहे, त्याचे देखील पुस्तक आहे. तेदेखील वाचतो आहे. त्यांचा स्वतःच ब्लॉग देखील आहे. तो देखील विविध लेखांनीसमृद्ध आहे. तुम्ही तो येथे पाहू शकता.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s