दिलीप कुलकर्णी: पर्यावरणाचे कृतीशील विचारवंत

पश्चिम महाराष्ट्रात, सांगली कोल्हापूर भागात, नुकत्याच झालेल्या पुरामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती ही तसे पाहिले तर बऱ्याच अंशी मानवनिर्मित आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे अक्षम्य दुर्लक्ष हे त्याचे कारण आहे. एकीकडे जरी आजकाल पर्यावरण विषयाबाबत जागृती हा परवलीचा शब्द बनला असला, तरी सुद्धा दुसरीकडे असे त्या दुष्परिणामाचे चित्र आपल्याला वारंवार दिसते. या विषयावर समाजातील अनेक संस्था, अनेक लोकं, त्यांचे काम करत असतात, अनेक चळवळी आजूबाजूला होत असतात. जागतिक पातळीवर या सर्वाची सुरुवात सुरु झाली ती अमेरिकेत, Rachel Carlson यांच्या Silent Spring या १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामुळे. आधुनिक काळात आपल्याकडे, भारतात, त्याचे लोण यायला थोडा वेळ लागला, असे असले तरी आपल्याकडे पंधराव्या शतकात राजस्थानात वनातील झाडे वाचण्यासाठी बिष्णोई आंदोलन नावाचे आंदोलन झाले होते. गेल्या ३०-३५ वर्षांपासून या विषयाकडे लक्ष जाऊन चिपको, पश्चिम घाट बचावो आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन अशी मोठी आंदोलने आणि इतरही लहानसहान, स्थानिक पातळीवरील अनेक विचारमंथन, प्लास्टिक बंदी सारखे उपाय वगैरे झाली. मुख्य म्हणजे पर्यावरण रक्षण कायदा देखील झाला. हे अर्थातच अतिशय तोकडे आणि तात्पुरते उपाय आहेत.

मला स्वतःला गेली दोन-अडीच दशकांपूर्वी सुरु झालेल्या किल्ले पदभ्रमणाच्या निमित्ताने निसर्गात, दऱ्या-खोऱ्यात, खेडेगावातून, जंगलातून भटकण्याचा बराच योग आला. माझे त्यामुळे एकूणच पर्यावरण ह्या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष जाऊ लागले. त्य विषयावरील विविध पुस्तके वाचण्यात येऊ लागली, एक दोन देवरायांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी जायला मिळाले आणि जाणीवेच्या कक्षा रुंदायला लागल्या. प्रबोधनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. अतुल देऊळगावकर यांची, जगदीश गोडबोले यांची, माधव गाडगीळ, अनुपम मिश्र यांची पुस्तके वाचनात आली. पर्यावरण या विषयाचा आवाका समजू लागला, खरा विकास म्हणजे काय हे देखील उमजू लागले. आत्ता अलीकडेच निसर्गायण हे दिलीप कुलकर्णी यांचे पुस्तक वाचनात आले. खरे तर हे तीस वर्षे जुने पुस्तक आहे, १९८० च्या दशकात आलेले. त्यांनी इतर पुस्तकांप्रमाणेच उपलब्ध माहितीच्या आधारे बऱ्याच गोष्टी मांडल्या आहेत, पण एक तत्वज्ञानात्मक विश्लेषण देखील करण्याचा प्रयत्न केला आहे. हेच पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

निसर्गायण या पुस्तकातून त्यांचा विचारवंताचा पैलू दिसतो. पर्यावरण साक्षरता असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक पातळी काही तरी करायचे असते. आपण ते करतोही, जसे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण किंवा सेंद्रिय भाज्या, धान्ये यांचा वापर करणे, पाणी जपून वापरणे वगैरे आले. पण दिलीप कुलकर्णी याही पुढे जाऊन आपल्या मानसिकतेचा, समाजव्यवस्थेचा, गेल्या २५० वर्षांपासून औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले प्रश्नांचा विविध अंगाने आढावा घेऊन सूत्रे ते आपल्या पुढे मांडतात, आणि वैयक्तिक पातळीवर काय काय करू शकतात हे सांगतात. आनंद म्हणजे काय, उपभोगता म्हणजे काय, गरज, चैन यांतील फरक, चंगळवाद आणि त्यामुळे निर्माण झालेला अनर्थ, वापरा आणि फेका मानसिकता आदी पैलूंवर विवेचन करतात. विकासाच्या नावाखाली निसर्गावर मात करण्याच्या नादात निसर्गाची हानी समाज करतो आहे, आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो आहे हे ते स्पष्ट करतात.  ग्राहक केंद्रित अर्थव्यवस्था,  अधिकाधिक वापरा, उपभोगा, अधिकाधिक निर्माण करा हे तत्व, आणि ते कसे चुकीचे आहे आणि त्यातून निसर्ग, पर्यावरण यांचे नुकसान कसे होते आहे हे सांगतात. निसर्ग आपल्याला कायमच दोन्ही हाताने देत असतो, पण आपण ते ओरबाडून घेतो, हाव संपत नाही.  सगळीकडे जो eco-friendly गोष्टींचा बोलबाला आहे, त्या वरवरच्या उपायांच्या पलीकडे जाऊन मुळातून वृत्ती बदलली पाहिजे असे ते ठामपणे प्रतिपादन करतात, आणि आपल्या जगण्यातून त्यांनी ते दाखवून दिले आहे. आपले जीवन हे जास्तीत जास्त निसर्गस्नेही कसे करता येईल ते सांगतात. समस्या कोणतीही असो, त्यांचे मूळ अखेरीस, ‘व्यक्तीचे वाढलेले/वाढणारे उपभोग’ ह्या एका करणात आहे. हे न उमगल्याने, त्या समस्या एकात्मिक रीतीने मुळातून सोडवायच्या ऐवजी, तुकड्यातुकड्यातून, प्रत्येक स्तरावर स्वतंत्रपाने उपाय केल्यामुळे परिस्थिती बिकट होत राहते, मूळ प्रश्न न सुटता, तो फक्त दुसरीकडे सरकतो, हे ते दाखवून देतात.

त्यांचे अजून एक पुस्तक नुकतेच(म्हणजे २०१८ मध्ये) आले आहे, ते म्हणजे स्वप्नामधील गावा. त्यात दिलीप कुलकर्णी(आणि त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी) यांनी असे निसर्गस्नेही जीवन गेली पंचवीस वर्षे कसे जगात आहेत, ते अनुभव आपल्यासोबत वाटून घेतात. त्यामुळे मी त्यांना पर्यावरणाचे कृतीशील विचारवंत असे म्हणतो. उक्ती आणि कृतीने ते वावरतात. पंचवीस वर्षांपूर्वी हे जोडपे कोकणात पुणे सोडून कायमचे निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गस्नेही जीवन जगण्यासाठी कुडावळे ह्या गावी ते राहायला आले. हिंदू धर्मात गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे, पण त्यांनी गृहस्थाश्रमात असतानाच वानप्रस्थान स्वीकारून निसर्गस्नेही जीवन जगत आहेत. (हेन्री डेविड थोरो याने, त्याच्या वाल्ड्न पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, त्याने देखील तसेच केले, पण काहीच वर्षे. प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे यांनी सुद्धा असाच प्रयोग केला होता, पुण्याजवळ फलटणपासून काही अंतरावर असलेल्या विंचुर्णी या गावात घर बांधून त्या ८-१० वर्षे राहिल्या, त्याचे अनुभव त्यांनी विंचुर्णीचे धडे या पुस्तकात दिले आहेत). तर हे अनोखे, जगावेगळे  जोडपे तेथे राहून, विविध पुस्तके लिहून, शिबिरे घडवून आणून, गतिमान संतुलन नावाचे नियतकलिक चालवून, पर्यावरण जागृतीचे, निसर्गस्नेही जीवन जगण्याचा म्हणजे आपले उपभोग संयमित ठेवण्याचा मार्ग समाजाला दाखवत, राहत आहेत.

मी तर त्यांना एका दृष्टीने गांधीवादीच म्हणेन. त्यांचे, म्हणजे, त्यांनी संपादित केलेले, गांधी उद्यासाठी हे राजहंस प्रकाशनचे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्यातील बरेचसे लेख त्यांचे आणि पौर्णिमा कुलकर्णी यांचेच आहेत. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जन्मवर्षानिमित्त ते केलेले विचारमंथन आहे. त्यांचे हे सर्व लेख आजची जीवनशैली, खरा विकास या सारख्या गांधींच्या मार्गावरील विचार आहेत, आणि त्याची आज निकड किती आहे हे दाखवणारे आहेत. हे इतर मान्यवर लेखकांच्या लेखातून देखील, त्या पुस्तकातून, आले आहे, फक्त विषय इतर आहेत इतकेच. महात्मा गांधी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे-The world has enough for everyone’s needs, but not everyone’s greed, त्याचेच भान दिलीप कुलकर्णी आपल्याला परत एकदा करून देतात.

दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी यांची काही व्याख्याने, मुलाखती यांचे व्हिडीओ देखील पाहायला मिळाले. त्यातून हे सर्व विचार आणखीन स्पष्ट होतात. तुम्ही देखील ते येथे पाहू शकता.

वैयक्तिक पातळीवर तथाकथित प्रगती, जी प्रामुख्याने आर्थिक विकास आहे, अश्या भ्रामक प्रगतीच्या मागे न लागता, प्रगतीच्या इतर आयामांचे जसे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याचे ते सुचवतात, आणि तसे आणि तत्सम असे अनेक  जीवनशैली प्रवाह समाजात आपल्याला दिसतातही. जसे कि Minimalists, FIRE(Financial Independence, Retire Early) चळवळ, Four Rs(Refuse, Reduce, Reuse, Recycle). वैश्विक पातळीवर, निसर्गाच्या मर्यादांचे भान ठेवून (म्हणजे निसर्गातील संसाधनांच्या उपलब्धतेची, उर्जेच्या उपलब्धतेची, प्रदूषणाचे शुद्धीकरण करण्याची, कचऱ्याचे विघटन करण्याची, जीव-विविधता टिकून ठेवण्याची), उपभोग आणि उत्पादन म्हणजे सम्यक विकास असे ते प्रतिपादतात. त्यांची इतरही पुस्तके आहेत. त्यांच्या कुडावळे ह्या गावी ते त्यांचे राहणीमान अनुभवण्यासाठी, विचार प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांच्या घराची दारे उघडी असतात. तिथे देखील जायचे आहे. मी अर्थात माझ्या पद्धतीने, जमेल तसे त्या गोष्टी जास्तीत जास्त अंगीकारायाचा प्रयत्न करतोच आहे. पण अर्थातच त्याला मर्यादा आहेत. आपण सर्वांनीच तसे केले तर परिस्थिती आशादायक नक्कीच आहे. निसर्गायण म्हणजे निसर्गाकडे जाणे. उपभोग हे साध्य नसून, जीवनाचे उद्दिष्ट नसून आत्मदर्शन हे आहे. उपभोग हे साधन आहे हे जेव्हा समजेल तेव्हा निसर्गायण सुरु होईल असे ते सांगतात, ते पटायला काही हरकत नाही. आणि ह्यातूनच पर्यावरणाचे, निसर्गाचे रक्षण, संवर्धन होणार आहे.

अच्युत गोडबोले यांचे नुकतेच आलेले नवीन पुस्तक अनर्थ, तसेच त्यांचेच एक जुने पुस्तक चंगळवादाचे थैमान सुद्धा साधारणपणे हीच तत्वे म्हणजे संयमित उपभोग, सम्यक विकास विषद करतात.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s