गुरुदत्त कोण?

हा गुरुदत्त कोण बुवा, असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहीत नाही असाच होऊ शकतो. पण तुम्हाला जर गुरुदत्त हा हिंदी सिनेमाचा एक संवेदनशील फिल्ममेकर होता हे माहीत आहे, पण तरीही तो कोण होता, कसा होता, आणि इतर प्रश्न त्याच्याबद्दल असतील तर, ते नक्कीच वाजवी आहेत. गुरुदत्त म्हणजे प्यासा, कागज के फूल आणि साहिब बीबी और गुलाम हे चित्रपट, त्यातील प्रसिद्ध गाणी माहिती असतात. माझे देखील तसेच होते. त्याच्या निधनाला पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. दोन पिढ्या दरम्यान होऊन गेल्या. त्याची चित्रपट कारकीर्द वादळी होती. त्याच्याबद्दल अनेक वर्षात अनेक प्रकारे लिहून झाले आहे.

मी २-३ वर्षांपूर्वी सुरु केलेले गिरीश कर्नाड यांच्या पुस्तकाचे, आगोम्मे इगोम्मे या कन्नड पुस्तकाचे भाषांतराचे, काम तसे अजून अर्धवटच आहे, त्यात एक कर्नाडांचा गुरुदत्तविषयी लेख आहे, तो मी वाचला, आणि बरेच दिवस विसरून गेलो. का आणि कसे पण अचानक मला गुरुदत्तच्या आईने(वासंती पदुकोण, १९७६, प्रकाशक-मनोहर ग्रंथमाला, धारवाड) लिहिलेल्या ‘नन्न मग गुरुदत्त’ हे चरित्रात्मक कन्नड पुस्तक हाती पडले. कर्नाडांचा तो लेख म्हणजे ह्या पुस्तकाची त्यांची प्रस्तावना होती. हे पुस्तक गुरुदत्तच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी प्रकाशित झाले होते. गुरुदत यांचे कुटुंब कर्नाटकातील, त्यांच्या जन्म देखील कर्नाटकातील, पण शिक्षण कलकत्ता येथे, आणि त्यांची कर्मभूमी अर्थात मुंबईची चित्रपटसृष्टी.

एक-दोन वर्षांपूर्वी, मी चित्रपट रसास्वाद शिबिराला गेलो होतो. तेथे गुरुदत्तचा उल्लेख झाला, तसेच सत्यजित राय यांचा अर्थातच देखील झाला. खोपकरांचे गुरुदत्त:तीन अंकी शोकांकिका हे पुस्तक होते माझ्याकडे, ते परत बाहेर काढले. सुधीर नांदगावकर यांनी संपादित केलेले गुरुदत्तवरील पुस्तक मागवले. आणि कर्नाडांच्या त्या कन्नड लेखाचे मराठी भाषांतर केले. ते मी येथे देत आहे. वासंती पदुकोण यांच्या त्या पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर सुरु केले आहे. गुरुदतच्या आयुष्यावर आणखी प्रकाश त्यामुळे पडणार आहे; गुरुदतचे वेगळेपण परत नव्या पिढीला समजण्यास मदत होईल असे मला वाटते.

Guru Dutt

The back cover of the book by Vasanti Padukone. Biography of Guru Dutt

एखाद्या आईने आपल्या मुलाचे चरित्र लिहावे असा मला माहिती असलेला पहिलाच प्रसंग आहे. नाही चुकलो. सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरचे चरित्र त्यांच्या आईने(मीनल गावसकर) देखील लिहिले आहे, पुत्र व्हावा ऐसा या नावाने ते पुस्तक आहे. पण ते नंतरचे आहे, १९८७ मधील. गुरुदत्तवरील पुस्तक १० वर्षे आधी आले. असो.

अनुवाद: माझा पुत्र गुरुदत-प्रस्तावना(गिरीश कार्नाड)

श्रीमती वासंती पदुकोण यांच्या बरोबर माझी पहिली भेट त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार सुरु झाल्यावर दीड वर्षांनी झाली. असे असले तरी पहिले पत्र वाचतातच त्या माझ्या अतिशय परिचयाच्या असल्याचा भास झाला. मुंबई मध्ये ‘संस्कार’ चित्रपट पाहून आल्यावर त्यांनी मला पहिले पत्र लिहिले होते. ‘मी गुरुदत्तची आई’ असे सुरुवात केलेले पत्र चित्रपटाबद्दल प्रशंसा करणारे होते, आणि काहीश्या अनिवार्यपणे त्यांनी गुरुदत्तबद्दल बरेचसे लिहिले होते. असे चित्रपट पाहिल्यावर पुत्राच्या आठवणी, त्याचे कलात्मक अभिनय, अर्थपूर्ण चित्रपट करावे असा त्याला असलेला ध्यास,त्याच्या अकाली मृत्यूमुळे अर्ध्यावरच थांबलेल्या कित्येक योजना, असे त्यांनी बरेच काही पत्रातून लिहिले होते.

ते पत्र आता माझ्याकडे नाही. तरी पण त्या पत्रात शेवटी आलेला मजकूर अजून लक्षात आहे. ‘मी लहान असताना मला नीट शिक्षण मिळाले नाही. मार्गदर्शन मिळाले नाही. काहीतरी करायला जावे तर त्यात खोडा घालणारे लोकच जास्त. त्यावेळी माझ्या पाठीशी राहून, मला उत्तेजन दिले असते तर, मी अजून बरेच काही केले असते. काही तर नक्कीच मिळवले कमावले असते.

हि गोष्ट मला अतिपरिचयाची वाटली. त्या पत्रातील त्यांच्या भावना. कळकळ हि एका पिढीची होती. त्या काळी विशी-एकविशीच्या उंबरठ्यावर असलेल्या समस्त सारस्वत स्त्रियांचीच ती मनोव्यथा त्या सांगताहेत असे मला वाटून गेले.

ह्या पुस्तकाचा विषय म्हणजे गुरुदत्त जो चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आहे. मी चित्रपट जगतात वावरत असल्यामुळे किंवा माझे चित्रपट श्रीमती पदुकोण यांना आवडत असावेत, त्यामुळे त्यांनी मला हि प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली असावी. असे असले तरी मी हि ‘स्मृतिचित्रे’ वाचल्यावर मला भावलेली गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकात आढळणारे सामाजिक प्रश्न.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ‘चित्रापूर’ सारस्वत समाज हा कुमटा-मंगळूरू दरम्यानच्या प्रदेशात भूभागात एकवटलेला होता. काही एक अपवाद सोडले तर, बहुसंख्य सारस्वत समाज हा आर्थिकदृष्ट्या गरीबच होता. उद्योग धंदा करण्याएवढी चतुरता त्यांच्या जवळ नव्हती. जमीन कसण्याची शारीरिक क्षमता जवळ नाही. ब्रिटीशांनी भारतात घट्टपणे पाय रोवल्यावर, कारकुनाची नोकरी करण्याला त्यांना जमले होते, त्यावेळेस हि सर्व मंडळी, मोठ्या शहरांकडे, विशेषतः पुण्या मुंबईकडे स्तायिक होऊ लागले.

ह्या समाजाची लोकसंख्या तशी फार मोठी नाही, त्यामुळे हा नवीन पेशा आणि त्याच्याबरोबर आलेली नागरीकरणामुळे ह्या समाजावर पटकन परिणाम झाला. वरिष्ठ पदाची नोकरी हे ध्येय ठरल्यामुळे, त्याच्या आड येणाऱ्या सारस्वत समाजाचे संस्कार त्या आड आले तरी ते नाकारायला, ओलांडायला कठीण गेले नाही. हे सपष्ट करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. समुद्र प्रयाण हे त्यांच्या मठाने बहिष्कृत केले होते. पण चांगल्या पदावरील नोकरी मिळवण्याकरिता इंग्लंडला जाणे आवश्यक झाले होते. पाहता पाहता बरेच जन परदेशगमन करून आले, आणि त्याचा परिणाम म्हणून अर्धाहून अधिक सारस्वत समाज मठाने बहिष्कृत केला. पण त्यामुळे झाले काय तर, मठाची सारी आर्थिक गणिते फिस्कटली. जाती बाहेर गेलेल्या मंडळीनी काही प्रयशित्त देखील घेतले नाही. शेवटी मठाने बहिष्कार मागे घेऊन त्यांना सामावून घेतले.

नवीन विचार नवीन आचार ह्या समाजात पसरू लागला, हे खरे आहे, पण समाज याचा अर्थ येथे त्यातील पुरुषमंडळी असा घ्यावा लागेल. बदलाचे वारे जरी पुरुषांना निर्भयपणे आपलेसे करण्यात काही अडचण आली नाही, पण स्त्रियांना तसे करायचा अधिकार नव्हता. दोन ‘बुकं’ शिक्षण, वयाची तेरा वर्षे ओलांडायच्या आताच झालेले लग्न, पंचविशीच्या आत कमीतकमी अर्धा डझन मुले पदरी पाडून, तारुण्य कुस्करले जाऊन, उरलेले सारे जीवन पत्नी म्हणून, आई म्हणून जगण्याचे भागदेय काही बदलले नाही.

महाराष्टात त्या काळी तीव्र वेगाने सामाजिक क्रांती सुरु झाली होती. कर्वे, गोखले वगैरे मंडळीनी स्त्री शिक्षण, विधवाविवाह या करिता आंदोलने सुरु केली होती. लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे ह्या सारख्या समाजसुधारक महिला पुढे येऊन एक नवीन आदर्श समाजापुढे ठेऊ पाहत होत्या. त्यामुळे गाव मागे टाकून शहराकडे पुरुषांबरोबर आलेल्या सारस्वत महिलांना हे सर्व दिसत असल्यामुळे, त्यांच्या आशा-आकांक्षाना नवीन धुमारे फुटू लागले यात आश्चर्य ते काय. असे असले तरी सामाजिक जीवनात हे नवीन बदल अंगीकारत असताना, मानसिक बदल, विचारांतील बदल अजून म्हणावे तितके झाले नव्हते.

वासंतीबाईंच्या पहिल्या पत्रात मला दिसलेली ही तळमळ मी त्या पिढीतील इतर स्त्रियांकडूनही पूर्वी ऐकली होती.

‘त्यावेळी स्त्री शिक्षण नुकतेच सुरु झालेले होते. माझ्या शाळेची मुख्याध्यापिका घरी येऊन वडिलांच्या पाया पडून विनंती करत होत्या कि हिला शाळेत पाठवा, ती अतिशय हुशार आहे, पुढे ती काहीतरी नक्कीच करेल. पण त्यांनी ते ऐकले नाही, आणि माझा वयाच्या पंधराव्या वर्षीच विवाह लावला’. १९१४ मध्ये घडलेला हा प्रसंग साठ वर्षानंतर देखील आठवून डोळ्यात पाणी काढलेल्या महिला मी पहिल्या आहेत.

सामाजिक विरोधाला न जुमानता तसेच परिणामांची पर्वा न करता आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास, आपल्या कर्तृत्व शक्तीवर असलेला विश्वास त्या वेळच्या स्त्रीयांकडे होता: स्वतःहून अथवा भाऊ असेल, किंवा पती असेल यांची मदत घेऊन शिक्षण पूर्ण करून, विणकाम शिकणे, संगीत शिकणे, नर्स, शिक्षिका किंवा समाज सेविका यांचे प्रशिक्षण घेणे, कथा, कविता, भजन, कीर्तन लिहिणे, उतार वयात आकाशवाणी वर कोकणी कार्यक्रमात भाग घेणे, अश्या अनेक उपक्रमातून त्या कार्यरत राहत असत.(चित्रपट शृष्टी म्हटले कि मध्यमवर्ग अजूनही नाक मुरडत असे, घाबरत असत. असे असताना चाळीस वर्षांपूर्वी भावाने वासंतीबाई यांना ‘तू काही काम का करत नाहीस?’ असे दिवचाल्यावर त्यांनी चित्रपटासाठी एक हिंदी पटकथा लिहून, मुंबईला जाऊन त्यावेळचे चित्रपट सम्राट चंदुलाल शाह यांच्या ती देऊन त्या आल्या होत्या हे येथे नमूद केले पाहिजे). असे सगळे असले तरी, त्यावेळी, शेवटी ह्या स्त्रीयांच्या नशिबी पुढे विशेष काही आले नाही.

अशी अतृप्त, अस्वस्थ मनोवृत्ती झाल्यामुळे. हि अपूर्ण महत्वाकांक्षा त्यांनी आपल्या मुलांच्या जीवनात पाहिली. आपल्याला जे जमू शकले नाही त्यांच्या हातून घडावे ह्या करता त्या आग्रही राहिल्या. त्यामुळे ‘माझा पुत्र गुरुदत्त’ हे जरी वैयक्तिक चरित्र न राहता, त्या वेळच्या सामाजिक प्रतिक्रियेचे विस्ताराने केले चित्रण आहे असे म्हणू शकतो.

तरीसुद्धा असा परकाया प्रवेश सोपा नसतो, त्यात धोके असतात. वैवाहिक जीवनात सुख असे नव्हतेच. त्यांचे पती, जे त्या पिढीच्या साऱ्या पुरुषांचेच प्रतिनिधी करणारे असे होते, मध्यमवर्गीय मुल्यांवर विश्वास असणारे, जीवनात सुस्थिती, स्थैर्य असावे असे वाटणारे, सरकारी नोकरीच्या गुंगीतून येणारी निष्क्रियता, या मुळे विकासाला पोषक असे वातावरण नव्हते आणि आवश्यक असा संयम असाही नव्हता. याहुनही विशेष म्हणजे स्वतःची मुले यशस्वी होऊन पुढे ती त्यांना सोडून गेली याचे दुःख त्यांना झेलावे लागले. आपला मुलगा आयुष्यात मोठा होत आहे, यशस्वी होत आहे, नाव कमावत आहे, या विषयी असलेले समाधान होतेच, पण त्याच बरोबर तो आपले असे वेगळे स्वातंत्र्य जीवन जगणार आहे, आपल्या दुःखाभोवती तटबंदी निर्माण करतो आहे, अश्या अनुभवांना देखील त्यांना सामोरे जावे लागले. शेवटी आपल्या जीवनात आपल्याला जे साधले नाही ते आपल्या मुलांत पाहत असताना, ते शक्य झाले नाही, हा व्यक्त केलेला विषाद असे सर्व या पुस्तकात येते.

आधी सांगितल्याप्रमाणे, हा सर्व अनुभव हा काही याच पुस्तकाच्या निमित्ताने आलेला नाही. किंवा त्या पिढीच्या साऱ्या स्त्रियांच्या नशिबी असेच जीवन आले होते असेही मी म्हणत नाही. पतीची नोकरी, त्याहून वरची मुलांची नोकरी, सुसंकृत, शिष्टाचारी मुलगी, सासू, लहानपणापासून मनी जपलेले स्वप्न, मनातील रेडियो, मोटार-कार, संगीताच्या रेकॉर्ड्स, या सगळ्यात संतृप्त अश्या ह्या स्त्रीया जीवनात मागे राहिल्या. त्या सर्व स्त्रिया पुण्यशील होत्या.

असे असले तरी ‘माझा पुत्र गुरुदत्त’ मध्ये मला जाणवलेले म्हणजे रोष, आंतरिक पिशाच्च या विरुद्ध त्यांचा लढा दिसतो. श्रीमती पदुकोण यांनी माझ्या बद्दल, आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्याबद्दल काही न लपवता, न विसरता लिहिले आहे. बहुशः, विविध यातना सहन केल्यामुळे, त्या पिढी मध्ये अशी प्रामाणिकता, धैर्य दिसून येते.

(फेब्रुवारी १९७६)

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s