माझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय

आज(९ जुलै) प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांची जयंती. १९२५ मध्ये आजच त्यांचा जन्म कर्नाटकात बंगळूरू येथे झाला. अजून पाच वर्षांनी जन्मशताब्दी! गुरुदत्तच्या आईने, म्हणजे वासंती पदुकोण ह्यांनी गुरुदत्तचे चरित्र, त्याच्या अकाली मृत्युनंतर कन्नड भाषेत लिहिले होते. मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. लॉकडाऊन मुळे ते कधी प्रकाशित होईल माहित नाही. एकेक प्रकरण मी या  ब्लॉग वर टाकत जाईन. गेल्या महिन्यातच मी त्या पुस्तकाची गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना ब्लॉगरुपात, मराठीत येथे प्रसिद्ध केली होती. आज त्याच्या जयंती निमित्त पुस्तकाचे संपादक असलेले मनोहर ग्रंथमालेचे प्रथितयश संपादक जोशी यांचे संपादकीय आणि गुरुदत्त यांचे सुपुत्र आत्माराम यांनी परिचयात्मक लिहिले शब्द देखील येथे देत आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

संपादकीय

“नडेदु बंदा दारी”(मी चाललेली वाट) च्या वेळेस (१९५६-५७) मुंबईला गेलो असता कन्नड कलाकारांचे व्यक्तीचित्रण प्रकाशित करावयाच्या उद्देशाने अनेकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्री ना देसाई आणि श्री व्ही के मूर्ती यांच्या बरोबर बोलताना दिग्दर्शक गुरुदत्त बद्दल लिहिले गेले पाहिजे असे समोर आले. त्यावेळी श्रीमती वासंती पदुकोण यांची मुलाखत घेतली. श्रीमती ललिता आझमी(गुरुदत्तच्या भगिनी, प्रसिद्ध चित्रकार) यांनी काही छायाचित्रे देखील पाठवली होती, पण ती त्या पुस्तकात देता आली नाही. नंतरही आमचा पत्र-व्यवहार सुरु होता. त्या दरम्यान गुरुदत्त यांचे आकस्मिक निधन झाले. मग शेवटी वासंतीबाईनी मुलाचे चरित्र लिहून पाठवले. प्रकाशित होण्यास विलंब झाला. गेल्या ऑक्टोबर मध्ये(गुरुदत्त यांचा ऑक्टोबर मध्ये निधन झाले होते) प्रकाशित करायचे ठरले होते. सर्व काही होण्यासाठी वेळ यावी लागते. वासंतीबाई अतिशय संयमाने वाट पाहत राहिल्या, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदत्त यांचे बंधू श्री आत्माराम यांनी त्यांच्या विषयी चार शब्द लिहून आपली स्नेह प्रगट केला आहे. त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री गिरीश कार्नाड यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून देण्याचे कबूल केले होते, पण त्यांना लगेच वेळ झाला नाही. शेवटी त्यांनी कशीतरी फुरसत काढून प्रस्तावना लिहून दिली. हि त्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकासाठी तिलक लावल्यासारखे शुभ झाले आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

श्री आर्य यांचे मुखपृष्ठ तयार करून दिल्याबद्दल, भारत प्रिंटींग प्रेस यांचे ते छापून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ह्या पुस्तकाच्या दरम्यान अनेकांचे सहाय्य झाले आहे, त्या सर्वांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.

-संपादक

परिचय

माझ्या आईचे सामर्थ्य आठवले कि मला कायमच कौतुक वाटते. एक तर, ती शाळेत गेली नाही; गेली असेल तर एक-दोन इयत्ता शिकली असेल. बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला. चौदा मुलांना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिने शिक्षिकेचे काम सुरु केले. शिकवता शिकवता ती देखील शिकली. परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखवले. हिंदी भाषा विशारद झाली. कलकत्ता विश्व विद्यालयातून  matrick केले-१९४१ मध्ये; ते देखील तिच्या मुलासोबत, गुरुदत्त बरोबर! त्यावेळी गुरुदत्तचे वय सोळा वर्षांचे होते. १९४३ मध्ये रुईया कॉलेज मधून टीचिंग डिप्लोमा तिने केला. शाळेत शिक्षिकेचे काम करत, कमावत, पाच मुलांचे पालन पोषण केले. वेळ मिळाला तसा थोडेफार समाजकार्य देखील केले. तिला सात भाषा येत-बंगाली, मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ, इंग्लिश, कन्नड. त्यात वर कोकणी देखील तिला येत असे. विमल मित्र, जरासंध(चारू चंद्र भट्टाचार्य), आणि बानी रे यांच्या पुस्तकांचे भाषांतर केले. हे सर्व बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार.

आता तिचे वय सदुसष्ट आहे, पण तिचा उत्साह चकित करणारा आहे. पुस्तके वाचते, सिनेमा, नाटकं पाहते; संगीत मैफिलींना जाते, न कंटाळता ती ऐकते. ती नेहमी काही ना काही करत असते. बंगाली, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश, पुस्तके ती वाचत असते, आवडले असेल तर त्यावर चित्रपट करता येईल असे ती मला सांगत राहते. परवा परवा आमच्या घरी असताना, करायला काही नसल्यामुळे, गुरुदत्त बद्दलच्या आठवणी का लिहून काढू नये असे मी तिला सुचवले. तिने लगेच काम हाती घेतले, लिहायला सुरुवात देखील केली. ते पाहून मला अतिशय आनंद झाला.

गुरुदत्त हा सर्वात मोठा मुलगा, त्यावर तिचे प्रेम देखील अनोखे. त्याच्या जीवनाबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल निःसंकोचपणे, उघडपणे, वस्तुनिष्ठ भाषा शैलीत, निर्हेतुक भावनेने आपली प्रतिक्रिया स्मृती-रूप-चित्र स्वरूपात रेखाटले आहे. गुरुदत्तवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याच्याबद्दल आणखीन आपुलकी वाटायला लावणारे असे हे लेखन आहे. गुरुदत्त आता इतिहासजमा होऊन दंतकथा बनून राहिला आहे. त्याच्यावर इतक्यातच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझ्या आईचे त्याच्यावरील हे तिसरे पुस्तक, पण तितकेच वेगळे असणार आहे.

माझे गतदिवस आणि बालपण आठवल्यावर मी देखील बैठक मारून हे सर्व लिहून काढावे असे वाटू लागते. ते सर्व मी केव्हातरी लिहीनच. पण १९४० मध्ये निर्वतलेले माझ्या वडिलांच्या बद्दल येथे दोन शब्द सांगितले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कुसूर केली असे समजेन. माझ्या वडिलांना व्यवहार ज्ञान असे जवळ जवळ नव्हतेच. जीवनभर ते कारकून म्हणून जगले. असे असले तरी त्यांच्या जवळ आश्चर्यकारक अशी लेखन-शक्ती होती. त्यांनी कविता केल्या, इंग्रजीत लेख लिहित, गुरुदत्त त्याच्या वडिलांचा आदर्श, तसेच आईची कलेची आवड आपल्यात असावे यासाठी धडपडत असे. गुरुदत्तने तयार केलेले सिनेमे तो गेल्यावरही अजूनही आहेत, नंतरही राहतील. तो जनमानसातदेखील राहील. त्यामुळे, वाचकहो, माझ्या आईने लिहिलेले हे तिच्या आवडत्या मुलाचे स्मृती-रूप-लेखन या पुस्तकात वाचा, आणि त्याचे व्यक्तित्व त्याने तयार केलेल्या चित्रपटातून पहा.

आत्माराम

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s