बाकीबाब

परवा जुलै ८ रोजी, मराठी कवी बा भ बोरकर(टोपणनाव बाकीबाब) यांचा स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त परत त्यांच्या आठवणी, कविता यांचा जागर झाला. मला गेल्यावर्षी त्यांचे १९८२ मधले ललित लेखांचा संग्रह असलेले एक पुस्तक(चांदण्याचे कवडसे) रस्त्यावर जुन्या पुस्तकाच्या गठ्ठ्यात सापडले होते. त्यावेळी मी तसा थोडासा चकितच झालो होतो. बोरकर मला फक्त कवी म्हणून माहिती होते. त्यांनी गद्य लेखन केले आहे हे माझ्या गावी देखील नव्हते.  मला जाणवले कि बोरकरांबद्द्ल पूर्वी इतके ऐकूनही मी त्यांचे काही वाचले नव्हते. घेतलेले पुस्तक परत वाचले पण त्यांच्या इतर साहित्याची ओळख करून घ्यायला सवड झाली नव्हती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आकाशवाणी वर व्यंकटेश माडगुळकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी सांगितले होते कि ते महात्मा गांधी यांच्यावर महाकाव्य(महात्मायन) रचत आहेत, पण ते पूर्ण करण्याच्या आत त्यांचे निधन झाले. शोध घेता घेता असे समजले कि त्यांनी कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्र, ललित असेही भरघोस विपुल लिहिले आहे. पोर्तुगीज, कोकणी भाषेतही लिहिले आहे.

बोरकर गोव्याचे, गोमंतकातील हे माहित होते. पण बोरकर पुण्यात १४ वर्षे राहिले हे माहिती नव्हते. त्यांना सारखी गोव्याची ओढ वाटत असे. जी ए कुलकर्णी यांच्या बाबतीत तेच झाले होते. त्यांना सारखी बेळगाव/धारवाडची आठवण येत असे आणि पुणे आवडत नसे.

त्यांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम पु ल देशपांडे आणि सुनिता देशपांडे करत असत, दूरदर्शनवर पूर्वी कधीतरी पाहिल्याचे आठवत होते. आजच दूरदर्शनवर पु ल देशपांडे आणि बाकीबाब यांचा सहभाग असलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा जुना कार्यक्रम देखील अनायासे तासभर पाहता आला. त्यात बाकीबाब म्हणतात कि त्यांची कविता हि त्यांचा आत्माविष्कार आणि आत्माविस्तार असते, ते किती खरे आहे हे कार्यक्रम पाहताना आणि त्यांचे मराठी, कोंकणी काव्यगायन ऐकताना वाटत होते.

त्यांच्या निसर्ग आणि प्रेम विषयाच्या कविता यावरून त्यांना आनंदयात्री असे देखील संबोधले जाई. त्यांच्या काही कविता खूप प्रसिद्ध आहेत, जसे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती,  ​ओवीबद्ध असलेली माझ्या गोव्याच्या भूमीत  ही कविता, जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग , झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन, जीवन त्यांना कळले हो, अनंता तुला कोण पाहू शके?  इत्यादी. ही सर्व गीते आपण कायम ऐकत असतो कुठे ना कुठे!

बाकीबाब यांची जन्मशताब्दी २००९ मध्ये झाली. त्या निमित्त त्यांच्या आणि त्यांच्या योगदानावरील वाड्मयाची तपशीलवार सूची तयार करण्यात आली, ती ‘कविवर्य बा भ बोरकर जन्मशतसांवत्सरिक’ या नावाने प्रसिद्ध झाली. ती येथे आहे, रसिकांनी ती जरूर पहावी. त्यात एका पुस्तकाची नोंद  होती, ज्याचे नाव पोएट बोरकर असे होते,आणि ते प्रसिद्ध समीक्षक व दि कुलकर्णी यांनी लिहिले होते. ते ईबुक स्वरूपात मला मिळाले. त्यात त्यांनी केलेल्या बोरकरांच्या कवितांचे निरुपण, प्रेरणा याचे विवेचन भावते. त्यांच्या भक्तीपर असलेल्या कवितांविषयी त्यांनी लिहिले आहे. परवा असे वाचनात आले कि त्यांच्या पत्रांचा एक संग्रह बाकी संचित या नावाने गोवा मराठी अकादमीने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून बोरकर यांच्याबद्दल आणखीन दुर्मिळ माहिती समोर येईल.

आता चांदण्याचे कवडसे या माझ्याकडे असलेल्या ललितलेखांच्या संग्रहाबद्दल. त्यातील सुशेगाद हा लेख मला खूप आवडला. गोव्यावर पोर्तुगीज संस्कृतीचा ठसा उमटला आहे. सुशेगाद  या मूळ पोर्तुगीज शब्दाच्या अर्थाच्या आज कोण कोणत्या छटा प्रचलित आहेत ते सांगितले आहे. एक प्रमुख अर्थछटा आहे तो संथ प्रकृती, संथपणा दर्शवणारी, जी गोव्याच्या जीवनात आहे! अजून एका लेखात ते गृहस्थाश्रामाबाबत सांगताना तीन सूत्रे आपल्या हाती देतात. Sense of priorities(अग्रक्रम), sense of proportion(प्रमाण) आणि sense of propriety(औचित्य) अशी ती तीन सूत्रे! त्यांच्या पुस्तकांच्या आणि वाचनाच्या हव्यासाबद्दल दोन लेख आहेत. हायकू या मुळ जपानी काव्यप्रकाराबद्दल एक लेख आहे. स्वप्नांबद्दल लिहिताना पौगंडावस्थेत असताना त्यांना पडलेल्या एका शृंगारिक/कामुक स्वप्नाबद्दल आणि झालेल्या स्खलनाबद्दल  मनमोकळेपणाने लिहितात. आणि त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणजे निसर्गावर, त्याच्या विविध रूपावर, तन्मयतेने तीन-चार लेख आहेत. ह्या ललितलेखांच्या संग्रहाव्यतिरिक्त कागदी होड्या, पावलापुरता प्रकाश, घुमटावरचे पारवे हे त्यांचे इतर ललितलेख संग्रह देखील आहेत.

बोरकरांचे रवींद्रनाथ टागोरांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांच्यावर देखील त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. पोर्तुगीज राजवटी मध्ये ते लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांच्यावर युरोपियन संस्कृतीचे, संगीताच, सौंदर्य विषयक विचारांचे, तत्वज्ञानाचे संस्कार झाले होते.

मी कवितेच्या प्रांतात शिरलो नाही अजून, थोडा लांबच राहिलो आहे. पण या निमित्ताने का होईना कवितेच्या आस्वादाची रुची लागली तर चांगलेच आहे. कविता ऐकायला मजा येते. आवडते पण जाणून बुजून कविता वाचूयात असे क्वचित घडले आहे. दिवाळी अंकांतील कवितेची पाने मी क्वचित पाहतो. कविता वाचणे म्हणजे शास्त्रीय राग संगीत ऐकण्यासारखे किंवा अमूर्त चित्रांचा आस्वाद घेण्यासारखे थोडा अमूर्त कारभार आहे असे मला वाटते. शास्त्रीय राग संगीत ऐकण्याच्या, कानसेन होण्याच्या मार्गावर चालतो आहे, बाकीच्या दोन गोष्टींकडे वळायचे आहे अजून. काही वर्षांपूर्वी प्रा. विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कवितांचा कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. कवितेला वाहिलेल्या काव्यरत्नावली(१८८७ ते १९३५) द्वैमासिकाच्या वाटचालीवर एक संशोधनपर पुस्तक नुकतेच हाती लागले आहे. कविता-रती या नावाच्या अजून एका कवितेला वाहिलेले द्वैमासिकाबद्दल मला नुकतेच समजले आहे. हे द्वैमासिक १९८५ मध्ये बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्वकीय पुरुषोत्तम पाटील यांनी सुरु केले होते. ह्या दोन्ही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आधुनिक कवितेच्या परंपरेचा इतिहास समोर येतो. नुकतेच सुरेश भटांच्या जयंती निमित्त त्यांची मुलाखत, त्यांच्या कविता, आणि मराठी गझला ऐकल्या होत्या, जाणून घेता आले होते. त्याबद्दल देखील लिहायचे आहे नंतर केव्हातरी.

असो, तात्पुरते तरी बोरकरांच्या इतर साहित्यकृतींचा शोध घ्यायचा आहे. पाहूयात कसे जमते ते. बोरकरांच्या पोर्तुगीज भाषेतील लेखनाबद्दल मराठीत कोणी जाणकारांनी लिहिले आहे का ते माहित नाही, नसेल तर लिहिले पाहिजे. असो, पण त्यांना बाकीबाब हे टोपणनाव कसे मिळाले हे अजून कुठे सापडले नाही!