मीआणि कन्नड चित्रपट

मी ह्या ब्लॉग वर कन्नड नाटकांविषयी आणि इतर कर्नाटकाशी/कन्नड भाषेशी निगडीत अनेक विषयांवर लिहिले आहे. पण कन्नड चित्रपटांच्या माझ्या अनुभवांविषयी लिहिले नव्हते. कन्नड चित्रपटसृष्टीला Sandalwood असे म्हणतात आणि तिला देखील मोठा इतिहास आणि परंपरा आहे. मी प्रामुख्याने मराठी किंवा इंग्रजी मध्येच लिहितो, कारण मला तसे जमते असे वाटते, कन्नड मध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता लिहिले नाही. माझ्या मराठी वाचकांना, रसिकांना मराठीची भाषा भगिनी असलेल्या कन्नड भाषेच्या, संस्कृती विश्वाबद्दल माहिती करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न मी ह्या माझ्या ब्लॉग्स मधून, अनुवाद प्रकल्पांतून करत असतो. असो.

तेरा चौदा वर्षांपूर्वी एप्रिल २००७ महिन्यात बंगळूरूला गेलो असता कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार(१९२९-२००६) याची पहिली पुण्यतिथी शहरातील रस्त्यांवर चौका चौकात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात होती ते मला दिसले. राजकुमारचे कन्नड भाषा प्रेम प्रसिद्ध होते तेहि कारण असेल(कन्नड भाषेला राज्यात प्रथम दर्जा मिळायला हा या साठी झालेल्या गोकाक चळवळीत १९८० च्या दशकात त्यांनी सक्रीय भाग घेतलेला होता). कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याने राजकुमार ह्यांनाच पळवून नेऊन ओलीस ठेवले होते कित्येक दिवस. त्यादिवशी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्याचीच गाणी, त्याचेच चित्रपट दाखवले जात होते, ते मी दिवसभर पहिले. आणि मी  खरे तर त्या दिवसापासून कन्नड चित्रपटांकडे शोधक नजरेने पाहू लागलो. हा राजकुमार खरे तर एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे, लिहीन नंतर कधीतरी.

फार वर्षांपूर्वी जेव्हा सरकारी दूरदर्शन हि एकच दूरचित्रवाणी वाहिनी भारतात होती तेव्हा रविवारी दुपारी (आणि रात्री देखील) देखील प्रादेशिक चित्रपट दाखवत असत. तेव्हा एक कन्नड चित्रपट पाहिल्याचे आठवते, त्याचे नाव काडीना बेन्की(Forest Fire). गिरीश कार्नाड त्यात होते. अतिशय प्रक्षोभक शृंगारिक चित्रपट होता, पण मानसिक समस्येवर(Oedipus Syndrome) आधारित होता. चित्रपट रंगीत होता(१९८७), पण आमच्याकडे कृष्ण धवल संच होता त्यामुळे कृष्ण धवल रुपात तो पहिला होता. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी कर्नाटकात विजापूर जवळ निंबाळ येथे जात असू. अधून मधून विजापुरास देखील जाणे होई. तेथे त्यावेळी(१९८०-९०)दोन-तीन चित्रपटगृहे होती, पण मी कधी तेथे लागणारे कन्नड चित्रपट पाहण्यास आम्हाला कोणी नेल्याचे, किंवा स्वतःहून गेल्याचे आठवत नाही. अमीर चित्रपटगृहे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील १९०४-५० मधील प्रसिद्ध गायक-नटी अमीरबाई कर्नाटकी हिने उभारले होते.

बंगळूरूहून पुण्याला परत आल्यानंतर मी राजकुमारचे बरेचसे चित्रपट मागवून पाहण्याचा सपाटा लावला(त्यात अनेक ऐतिहासिक, पौराणिक, आणि सामजिक, प्रेमकथा अशी सर्व प्रकारचे चित्रपट आहेत) आणि त्याच्या अभिनयाच्या आणि मुख्य म्हणजे याच्या आवाजावर(त्यांच्या बहुतेक चित्रपटात तेच गाणी गात असत), गाण्यांवर फिदा झालो, मला नवीनच काही तरी गवसल्यासारखे झाले होते. त्याचा गन्धद गुडी(ಗಂಧದ ಗುಡಿ) नावाचा प्रसिद्ध सिनेमा पहिला, त्यावरून हिंदीमध्ये धर्मेंद्रचा कर्तव्य हा सिनेमा आला होता. हे चित्रपट पाहिल्यामुळे  माझी  कन्नड भाषा देखील त्यामुळे(आणि माझ्या इतर समांतर उद्योगांमुळे जसे कन्नड नाटकं आणि साहित्य यात मुशाफिरी) सुधारत चालली, बरेचसे उमगत गेले. त्यातच असे माझ्या ऐकण्यात आले कि आमच्या कुटुंबातील  नात्यातील एक जण कन्नड चित्रपट क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचे नाव सुनीलकुमार देसाई. त्यांची एक दोनदा ओझरती भेट झाली होती, पण तो पर्यंत  सुनीलकुमार देसाई यांचे कर्तृत्व माझ्या खिजगणतीतही नव्हते!  त्यांचे चित्रपट अतिशय वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे देखील चित्रपट पाहण्याचा उद्योग सुरु केला जसे बेळदिंगळा बाळे(ಬೆಳದಿಂಗಳ ಬಾಲೆ).

पुढे पुढे मी काहीना काही कारणाने बंगळूरूला प्रत्येक वर्षी जाऊ लागलो आणि कन्नड नाटकांचा, पुस्तकांचा माहोल अनुभवू लागलो, प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन कन्नड चित्रपट नाही पाहिले, कारण गेल्या १०-१५ वर्षांपासून कन्नड चित्रपटांचा दर्जा तसा खूपच घसरला आहे. पण बंगळूरूमध्ये तरी ठिकठिकाणी नवीन कन्नड चित्रपटांचे मोठाले पोस्टर्स लागलेले दिसतात, हिंदीचे क्वचितच. कन्नड चित्रपटांना चित्रपटगृह न मिळण्याचा प्रश्न आपल्याकडील मराठी चित्रपटांच्या बाबतीत जसे होते, तसे तेथे होत नाही. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता गणेश याचा २००६ मधील सुपरहिट चित्रपट(जो त्याचा पदार्पणातील चित्रपट) मुन्गारे मळे(ಮುಂಗಾರು ಮಳೆ) हा देखील मी पहिला नव्हता काल परवा पर्यंत. एकच चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याचे आठवते तो म्हणजे अभिनेता उपेंद्र आणि सुदीप यांचा मुकुंद मुरारी हा चित्रपट जो २०१६ मध्ये आला होता आणि तो अक्षय कुमारचा हिंदी चित्रपट OMG-Oh My God यावर आधारित होता. त्यामुळे थोडी उत्सुकता होती कि कन्नड मध्ये कसा केला असेल त्याची.

मला सुरुवातीला नवीन, हल्लीच्या कन्नड चित्रपटांत विशेष रस नव्हताच. समांतर चित्रपट, आणि १९७०/८० मधील राजकुमार, विष्णूवर्धन, अनंत नाग, शंकर नाग यांचे चित्रपट पाहण्यात रस होता आणि मी जमेल तसे मी ते पाहिले देखील.शंकर नाग याचा एक चित्रपट ऑटो राजा, ज्यात त्याने एका रिक्षावाल्याचे काम केले आहे, तेव्हा पासून बंगळूरू मधील सगळ्या रिक्षांच्या मागे त्याचे छायाचित्र लागले होते. त्याचाच Accident नावाचा, अमली पदार्थ प्रश्नाच्या विषयी असलेला, चित्रपट, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला, तो पाहिला. गिरीश कर्नाड दिग्दर्शित कान्नुरू हेग्गाडीथी(ಕಾನೂರು ಹೆಗ್ಗಡಿತಿ), भारत स्टोर्स, बी जयश्री यांचा बनदा नेरेळू(ಬನದ ನೆರೆಳು, वृक्षांची सावली), दाटू(ದಾಟು), बेट्टद जीव(ಬೆಟ್ಟದ ಜೀವ), मौनी, प्रकाश राज अभिनित नागमंडला, कूर्मावतार, नायी नेरेळू(ನಾಯಿ ನೆರೆಳು), पुट्टण्णा कंगल दिग्दर्शित रंगनायकी, शरपंजर(ಶರಪಂಜರ) असे छान छान  चित्रपट पांहिले. समांतर चित्रपटांच्या काळाचा अनुभव घेण्याची माझी सुरुवात दिग्दर्शक पी एन श्रीनिवास यांच्या स्पंदन पासून सुरुवात झाली जो १९७८ मध्ये आला होता. त्यानंतर गिरीश कासारवल्ली आणि गिरीश कर्नाड यांचे कित्येक चित्रपट पाहता आले. गमतीची गोष्ट हे दोघे हि पुण्यातील FTII शी संबंधित आहेत. कासारवल्ली हे तेथे शिकले आहेत, तर कार्नाड तिथे संचालक म्हणून काही वर्षे काम केले आहे. पुण्यात गिरीश कर्नाड यांचा सोनाली कुलकर्णी अभिनित चेलुवी हा सिनेमा पहिला तसेच चिदंबर रहस्य आणि ओंदानुवंदू कालदल्ली (ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ) हे देखील पाहिले. पण काही नावाजलेले समांतर सिनेमे पहायचे राहिले आहेत, जसे घटश्राद्ध, संस्कार, काडू(अर्थ-अरण्य), गुलाबी टॉकीज इत्यादी तसेच इतरही जुने नवे अजून बरेच चित्रपट पाहायचे आहेत!

गेल्या काही वर्षात जरा वेगळे कन्नड चित्रपट येत आहेत असे दिसते आहे, आणि मला वाटते हे भारतातील प्रत्येक  प्रादेशिक भाषेत, तसेच हिंदीत देखील होत आहे. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये मी असे नवीन, वेगळे काही पाहून चित्रपट घेतले. जसे कि मालगुडी डेज, प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही यांच्या तीन कथांवर आधारित कुंदापूर कन्नड बोली असलेला अम्माची येम्बा नेनेपू(ಅಮ್ಮಚಿಯೆಂಬ ನೆನಪು), सुमन नगरकरचा बब्रु, जो संपूर्णपणे अमेरिकेत तयार केला गेलेला पहिला कन्नड चित्रपट आहे,  गीता ज्याला १९८० च्या गोकाक चळवळीची (कन्नड भाषेच्या अग्रक्रमासाठी) पार्श्वभूमी असलेला सिनेमा, कथा संगमा(सात कथांचा मिळून एक चित्रपट), India Vs England जो family funded cinema आहे, आणि बराचसा भाग इंग्लंड मध्ये चित्रित केला गेला आहे. असे विविध प्रयोग इतर देमार चित्रपटांच्या भाऊगर्दीत होत असताना दिसत आहेत.

२०१८ मध्ये आलेला सर्वात प्रसिद्ध चित्रपट KGF पाहायचा राहिला आहे. हा कर्नाटकातील  कोलार गोल्ड फिल्ड्स(१९९२ च्या सुमारास मी तेथे गेलो होतो) जेथे सोन्याच्या खाणी आहेत, त्यावर आधारित आहे. हा पाहायचा विचार आहे इतक्यातच. जुन्या नव्या कन्नड चित्रपटांचा हा प्रवास माझ्या जीवनात निरंतर असणार आहेच. मी पुण्यातच असल्यामुळे मराठी विश्वात सहज मुशाफिरी होत असते(त्याबद्दल तर मी उदंड लिहीतच असतो कायम), पण कन्नड विश्वातील मुशाफिरी जरा मुश्कील आहे, पण ती मी करत असतो जसे जमेल तसे.हा सर्व खटाटोप आपापल्या जाणीवा आणखीन समृद्ध करण्यासाठीच असतो, नाही का? नुकताच चित्रपट रसास्वादाचा अभ्यास केल्यावर एकूणच चित्रपट कलेबद्दल, इतिहासाबद्दल, भारतातील विविध भाषांतील(फक्त मराठी, कन्नड, हिंदी नाही इतरही भाषेतील जसे बंगाली, मल्याळम) चित्रपटांबद्दल उत्सुकता निमण झाली आहे. असो.

जाता जाता, एक गमतीची गोष्ट. आज काल चित्रपटांसाठी crowd-sourced funding माध्यमातून पैसा उभा करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. चांगला आहे तो, पण कधी कधी फसवणूक होऊ शकते. भारतीय तत्वज्ञानातील/दर्शनातील एक परंपरा ज्याला द्वैत वेदांत असे म्हणतात त्याचे प्रवर्तक म्हणजे कर्नाटकात जन्म झालेले तेराव्या शतकातील मध्वाचार्य हे होत. त्यांच्यावर एक कन्नड चित्रपट करायचा असे सांगत आमच्या कन्नड संघातील एक जण पैसे घेवून गेला, आणि ७-८ वर्षे झाली, काही पत्ता नाही, कि काही प्रगती नाही!

असो, शेवटी एक आवाहन. मी कन्नड नाटकांबद्दल काही ब्लॉग्स लिहिले आहेत, ते तुम्ही येथे जरूर पहा आणि अभिप्राय कळवा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s